२९ मे २०२३ रोजी भारताने NVS-01 या कृत्रिम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. NVS-01 हा कृत्रिम उपग्रह IRNSS-1G या जुन्या भारतीय उपग्रहाची जागा घेणार आहे. भारतीय उपखंडात दिशादर्शक म्हणून या उपग्रहाचा वापर होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) यापूर्वी अनेक उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या पाठविले आहेत. परंतु पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या आण्विक घड्याळासह (अॅटोमिक क्लॉक) दिशादर्शक प्रणालीसह उपग्रह २९ मे रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. त्यामुळे या घटनेकडे ऐतिहासिक घटना म्हणून पाहिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या घटनेची सविस्तर माहिती घेणे महत्त्वाचे ठरावे.
आणखी वाचा : विश्लेषण : ‘हनी ट्रॅप’ का ठरत आहे भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी डोकेदुखी ?
कृत्रिम उपग्रह (सॅटेलाइट) म्हणजे नेमके काय ?
कृत्रिम उपग्रह हे एक खगोलीय किंवा कृत्रिम यंत्र असते. पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेले मानवनिर्मित यंत्र, जे पृथ्वी, सूर्य, आणि इतर ग्रह किंवा त्याचे उपग्रह यांच्या भोवती फिरत रहाते. या कृत्रिम उपग्रहांचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी करण्यात येतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो ही भारतासाठी अंतराळ संशोधनाशी संबंधित सर्व बाबी हाताळणारी संस्था असून त्यांचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. भारतीय इतिहासात १९७५ साली पहिल्यांदाच आर्यभट्ट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर भारताने अनेक कृत्रिम उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले आहे. याच इतिहासात हा नव्याने प्रक्षेपित करण्यात आलेला स्वदेशी दिशादर्शक प्रणाली असलेला कृत्रिम उपग्रह महत्त्वाचा मानला जात आहे.
भारतीय दिशादर्शक प्रणाली
सध्या भारतीय प्रादेशिक नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (IRNSS) या समूहात सात कृत्रिम उपग्रह आहेत, त्यांचे वजन प्रत्येकी १४२५ किलो इतके आहे. IRNSS ही प्रादेशिक उपग्रह दिशादर्शक प्रणाली ही नावआयसी NavIC या व्यावसायिक नावाने कार्यरत आहे. ही प्रणाली अचूक रिअल-टाइम पोझिशनिंग आणि वेळ या सेवा प्रदान करते. त्यात भारत आणि त्याच्या सभोवतालचा तब्बल दीड हजार किमीचा प्रदेश समाविष्ट आहे. या मालिकेतील पूर्वीच्या सर्व उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला. आजवर पीएसएलव्हीच्या माध्यमातून इस्रोने अनेक देशी-विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
आणखी वाचा : विश्लेषण: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?
जीएसएलव्ही कशासाठी?
भारताच्या दिशादर्शक प्रणालीसाठी यापूर्वी पाठविण्यात आलेले सात उपग्रह हे पृथ्वीच्या ‘भूस्थिर कक्षे’मध्ये आहेत. म्हणजेच पृथ्वीपासून ३५ हजार ७८६ किलोमीटर उंचीवर आहे. नव्याने प्रक्षेपित करण्यात आलेल्या दुसऱ्या पिढीच्या उपग्रहाचे एकूण वजन २,२३२ किलो इतके आहे. या उपग्रहासाठी जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेइकल (जीएसएलव्ही) हा प्रक्षेपक वापरण्यात आला. जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. अधिक वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी मुख्यत्त्वे क्रायोजेनिक इंजिन असलेल्या जीएसएलव्हीचा वापर करण्यात येतो. यापूर्वी IRNSS-1 हा पहिला उपग्रह, २०१८ सालच्या एप्रिल महिन्यात प्रक्षेपित करण्यात आला होता. या उपग्रहाने जुन्या निकामी झालेल्या उपग्रहाची जागा घेतली. म्हणजेच आजपर्यंत इस्रोने एकूण नऊ उपग्रह या योजनेंतर्गत प्रक्षेपित केले. त्यातील २०१७ साली पाठविण्यात आलेला उपग्रह अपयशी ठरला. म्हणूनच त्याच्या जागी IRNSS-1 चे प्रक्षेपण २०१८ साली करण्यात आले. या उपग्रहांना देखील वयोमर्यादा असतात. त्यांचे आयुर्मान उलटले की, ते निकामी होतात म्हणूनच त्यांच्या जागी नवे उपग्रह पाठविणे गरजेचे ठरते.
दुसऱ्या पिढीच्या उपग्रहाचे महत्त्व काय ?
मूलतः हे नव्या पिढीतील उपग्रह वजनाने अधिक आहेत आणि आधीच्या तुलनेत अधिक प्रगतदेखील. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे यात भारतात तयार करण्यात आलेल्या अॅटोमिक घड्याळाचा वापरही यात करण्यात आला आहे. यापूर्वीच्या काही उपग्रहांमध्ये त्यांचा वापर करण्यात आला होता; परंतु, त्यांची निर्मिती भारतात झालेली नव्हती. विदेशातून त्यांची आयात करण्यात आली होती. परंतु आता अहमदाबाद येथील ‘स्पेस अप्लिकेशन सेंटरने’ पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या आण्विक घड्याळाची निर्मिती केली. नवे रुबिडियम अॅटोमिक क्लॉक तयार करून ते या उपग्रहामध्ये वापरण्यात आले. त्यात L1 फ्रिक्वेन्सी असलेला सिग्नल आहे. या आधीच्या उपग्रहांमध्ये केवळ L5 व S फ्रिक्वेन्सी असलेले सिग्नल्स वापरण्यात आले होते. परंतु या नव्या उपग्रहात L5 व S फ्रिक्वेन्सी असलेल्या सिग्नल्ससोबत L1 फ्रिक्वेन्सी असलेला सिग्नल समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे दळणवळण विनाखंड असेल. L1 फ्रिक्वेन्सी सिग्नलचा वापर जीपीएसमध्ये करण्यात येतो. यापूर्वीच्या उपग्रहांमध्ये L5 व S फ्रिक्वेन्सी असलेले सिग्नल्स असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आपल्याला इतर देशांच्या उपग्रहांवर अवलंबून राहावे लागत होते. याशिवाय आता नव्या पिढीतील उपग्रहांचे आयुर्मानही अधिक आहे. पूर्वीच्या उपग्रहांचे आयुर्मान दहा वर्षे होते, तर आता नव्या पिढीतील उपग्रहांचे आयुर्मान १२ वर्षांचे आहे. पहिल्या उपग्रहाचे (IRNSS-1A) प्रक्षेपण २०१३ साली झाले होते, आणि त्याच वर्षी नंतर या शृखंलेतले दोन उपग्रह (1B,1C) प्रक्षेपित करण्यात आले. म्हणजेच आता त्यांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. आता नव्या पिढीतील येणारे उपग्रह त्यांची जागा घेतील.