सिद्धार्थ खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारच्या हस्तकांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी केला. या आरोपानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध विलक्षण ताणले गेले आहेत. ट्रुडो यांच्या आरोपांच्या आधीच कॅनडातील एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. हा अधिकारी ‘रॉ’ या भारतीय गुप्तहेर संस्थेसाठी काम करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. त्याहीपुढे जात, निज्जर याची हत्या ‘रॉ’नेच घडवून आणली असेही सांगितले जाते. हाच धागा पकडून ‘रॉ’च्या या कथित कारवाईची तुलना मोसाद या इस्रायली गुप्तहेर संघटनेशी सुरू झाली आहे. कारण परदेशात ‘देशविरोधी शत्रूं’ना संपवण्यासाठी बेधडक कारवाया करण्यात ही संघटना माहिर समजली जाते. विशेषतः गतशतकात मोसादच्या कारवाया अतिशय गाजल्या आणि अनेकदा चित्रपट-कादंबऱ्यांचे विषयही ठरल्या. मोसाद म्हणजे काय आणि ती नेमकी करते काय, याचा आढावा.
मोसाद म्हणजे काय?
‘मोसाद मेरकाझी ले-मोदीन उले-तफकिदीम मेयुहादिम’ हे मोसादचे मूळ हिब्रू नाव. इंग्रजीत साधारणपणे ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स’ असे याचे भाषांतर केले जाते. ही इस्रायलची एकमेव गुप्तहेर संघटना नव्हे. मोसादच्या बरोबरीने अमान (लष्करी गुप्तवार्ता) आणि शिन बेत (अंतर्गत सुरक्षा) या आणखी दोन संघटना इस्रायलमध्ये सक्रिय आहेत. परंतु मोसादच्या नाव आणि उद्दिष्टामध्येच विशेष कारवाया (स्पेशल ऑपरेशन्स) ही जबाबदारी अंतर्भूत असल्यामुळे या संघटनेला इतर दोहोंच्या तुलनेत अधिक वलय प्राप्त झाले. मोसादचे प्रमुख हे केवळ इस्रायलच्या पंतप्रधानांना उत्तरदायी असतात. संघटनेचे जवळपास ७ हजार पगारी कर्मचारी आहेत, त्यामुळे मोसादसाठीची तरतूद प्रचंड असते. ही जगातील सर्वांत मोठ्या गुप्तहेर संघटनांपैकी एक मानली जाते. अरब राष्ट्रे, अरब दहशतवादी, पॅलेस्टिनी संघटना आणि नेते, आंतरराष्ट्रीय लष्करी लवादांच्या कक्षेतून सुटलेले व भूमिगत झालेले नाझी अधिकारी, नाझीवादी (म्हणजे अर्थात ज्यू आणि इस्रायलविरोधी) नेते हे या संघटनेचे लक्ष्य प्राधान्याने राहिले आहे. पण कुठेही लिखित स्वरूपात ही उद्दिष्टे उपलब्ध नाहीत. अलीकडच्या काळात काही प्रमुख अरब राष्ट्रांनी इस्रायलशी जुळवून घेण्याचे धोरण अंगिकारल्यामुळे आणि नाझीवादही बऱ्यापैकी ओसरल्यामुळे मोसादच्या कारवायांविषयी अलीकडे फार वाचनात येत नाही. सीरिया, इराण, पॅलेस्टाइन हे देश; तसेच अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांविरोधात हल्ली मोसादच्या कारवाया सुरू असतात. मात्र गेल्या शतकात विशेषतः अरब-इस्रायल संघर्ष तीव्र होता, त्यावेळी मोसाद भलतीच सक्रिय होती.
आणखी वाचा-हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली?
नाझी आइकमानवरील गाजलेली कारवाई…
अॅडॉल्फ आइकमान हा नाझी अधिकारी हजारो ज्यूंच्या शिरकाणासाठी जबाबदार होता. युद्ध ओसरण्याच्या काळात तो भूमिगत होऊन अर्जेंटिनात निसटून गेला. ‘हॉलोकास्ट’ प्रत्यक्षात आणण्याकामी नाझी सरकारने आइकमानची नियुक्ती केली होती. पण न्युरेन्बर्ग खटल्यात शिक्षा न होताच तो निसटून गेल्यामुळे, आइकमानचा ‘हिशोब चुकता’ करण्याचा निर्णय इस्रायली सरकारने घेतला. अर्जेंटिना सरकार हे नाझी-धार्जिणे असल्यामुळे तेथे आश्रयास गेलेल्या व युद्धगुन्हेगार ठरवण्यात आलेल्या नाझी अधिकाऱ्यांना इस्रायल वा दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात देण्यास ते कधीच तयार नसायचे. त्यामुळे आइकमानला जेरबंद करून इस्रायलला आणण्याचा आदेश त्या देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियान यांनी घेतला. त्यानुसार अनेक वर्षांच्या टेहेळणीनंतर ११ मे १९६० रोजी मोसादच्या चार गुप्तहेरांनी आइकमानला ब्युनॉस आयर्सच्या उपनगरात त्याच्या घराजवळ ताब्यात घेतले आणि मोटारीत घालून जवळच आणखी एका ठिकाणी नऊ दिवस ठेवले. त्यानंतर अनेक अडथळे पार करून इस्रायली सरकारी विमानाने आइकमनची रवानगी इस्रायलला झाली. या काळात त्याला बहुतेक काळ बेशुद्धावस्थेत ठेवण्यात आले होते. पुढे इस्रायलमध्ये त्याच्यावर रीतसर खटला भरवून त्याला मृत्युदंडही देण्यात आला. अॅडॉल्फ आइकमनची धरपकड ही मोसादच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक ठरते.
म्युनिच ऑलिम्पिक मारेकऱ्यांचे शिरकाण…
म्युनिच १९७२ ऑलिम्पिकमध्ये ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी संघटनेच्या आठ अतिरेक्यांनी ऑलिम्पिक संकुलातील इस्रायली निवासछावणीवर हल्ला केला. यात सुरुवातीस दोन इस्रायली खेळाडू ठार झाले. उर्वरित खेळाडूंचे अपहरण करून, त्यांना ओलीस ठेवण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी जर्मन पोलिसांनी केलेली कारवाई फसली. यात सर्व नऊ खेळाडू व प्रशिक्षक, तसेच एका जर्मन पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पाच अतिरेकी मरण पावले, तिघांना अटक झाली. पण लवकरच तिघांनाही एका अपहृत विमानातील प्रवाशांच्या बदल्यात जर्मन सरकारने सोडून दिले. हे तीन अतिरेकी, तसेच म्युनिच हत्याकांडाच्या सूत्रधारांना धडा शिकवण्याचा निर्णय तत्कालीन इस्रायली पंतप्रधान गोल्डा मायर यांनी घेतला. काही अपवाद वगळता सर्व हस्तक, सूत्रधारांना १९७२ ते १९८८ या काळात कंठस्नान घालण्यात आले. या कारवाईला अटकाव घालण्यासाठी जर्मनी, तसेच अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांनी इस्रायलवर दडपण आणले होते. पण इस्रायली सरकारने ती रेटून धरली. यावेळी गुप्तवार्ता संकलन, गोपनीय कारवाया अशा अनेक आघाड्यांवर मोसादची सिद्धता दिसून आली.
आणखी वाचा-खलिस्तान समर्थकांच्या मुद्द्यावरून अनेकवेळा भारत-कॅनडा आमनेसामने, जाणून घ्या…
इतर कारवाया…
युगांडामध्ये अपहृत एअर फ्रान्स विमानातील इस्रायली आणि ज्यू प्रवाशांच्या सुटकेसाठी इस्रायली संरक्षण दलाने कारवाई केली. यावेळी अत्यंत महत्त्वाचा गोपनीय तपशील गोळा करण्याचे काम मोसादने केले. एका कारवाईत इराकस्थित मिग-२१ हे त्यावेळचे लढाऊ विमानच तेथून चोरून तेल अवीव येथे आणले गेले. सोव्हिएत नेते निकिता क्रुश्चेव यांच्या भाषणाची प्रत मोसादने चोरली आणि प्रसिद्ध केली. या भाषणात सोव्हिएत नेता जोसेफ स्टॅलिन याच्यावर टीका करण्यात आली होती. कॅनेडियन क्षेपणास्त्र संशोधक गेराल्ड बुल यांची, त्यांनी इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांना अत्याधुनिक तोफ विकसित करण्यासाठी दिलेल्या मदतीबद्दल हत्या करण्यात आली. अलीकडच्या काळात इराण आणि सीरिया या देशांच्या अण्वस्त्र कार्यक्रमात व्यत्यय आणण्यासाठी काही कारवाया मोसादने राबवल्या. यात २०१० ते २०१२ या काळात चार इराणी अण्वस्त्र संशोधकांच्या हत्यासत्राचा समावेश आहे. अगदी अलीकडे म्हणजे २०२०मध्ये इराणच्या अण्वस्त्रविकास कार्यक्रमाचे प्रमुख मोहसिन फकीरजादे यांची उपग्रह-चलित बंदुकीने हत्या करण्यात आली. या कारवाईमागेही मोसादच असल्याचे बोलले जाते.
मोसाद आणि रॉ…
रॉची स्थापना सप्टेंबर १९६८मध्ये झाली. तिचे पहिले प्रमुख रामेश्वरनाथ काव यांनी मोसादशी संबंध वाढवावेत, अशी सूचना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केल्याचे वृत्त काही वर्षांपूर्वी प्रसृत झाले होते. भारताचे अरब देशांशी संबंध सुरुवातीपासून होते. याउलट इस्रायलशी राजकीय संबंध प्रस्थापित होण्यासाठी बराच काळ लोटला. त्यामुळे रॉ आणि मोसाद यांच्यातील सहकार्याविषयी केवळ तर्कच बांधता येऊ शकतात. अलीकडच्या काळात विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यातील संबंध घनिष्ट बनल्यामुळे दोन गुप्तहेर संघटनांमधील सहकार्यही वाढीस लागले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.