भांडवली बाजारात सर्वसाधारणपणे, बुल आणि बेअर हे सगळ्यांना ठाऊक आहे. जेव्हा बाजारात तेजीवाल्यांचा जोर असतो, म्हणजेच बाजार वरच्या दिशेने मार्गक्रमण करतो तेव्हा बाजार ‘बुलिश’ असल्याचे म्हटले जाते. म्हणजे या काळात गुंतवणूकदार बाजारात संपत्ती निर्माण करतात. तर याउलट जेव्हा बाजारावर मंदीवाल्यांचा पगडा असतो, तेव्हा बाजार ‘बेअरिश’ असतो. या बाजारात गुंतवणूकदार संपत्ती गमावतात. सध्या ‘बफेलो मार्केट’ नवीन संकल्पना उदयास आली आहे. याव्यतिरिक्तदेखील बाजारात इतर प्राणी आहेत. म्हणजे त्या प्राण्यांप्रमाणे प्रवृत्ती असलेले गुंतवणूकदार दिसून येतात. त्याबद्दल जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेअर बाजारात बुल आणि बेअर का?

बुल आणि बेअरच्या स्वभावाप्रमाणे शेअर बाजारात गुंतवणूकदार दिसून येतात. बुल अर्थात बैल ज्याप्रमाणे एखाद्याला शिंगावर घेऊन हवेत उंच उचलतात, त्याप्रमाणे गुंतवणूकदार आणि ट्रेडर शेअर खरेदी करतात आणि बाजार वधारतो. याउलट बेअर म्हणजे अस्वल हा खाली जमिनीवर पाडतो आणि पोट फाडतो, त्याप्रमाणे या काळात गुंतवणूकदार समभाग विक्रीचा मारा करतात आणि बाजार खाली येतो.

हे ही वाचा… विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?

‘बफेलो मार्केट’ हा नवीन प्रकार काय आहे?

सोप्या शब्दांत सांगायचे, तर ‘बफेलो मार्केट’ म्हणजे शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतो, पण तो निर्णायकपणे वर किंवा खाली जात नाही. बँक ऑफ अमेरिका येथील काही लोकांनी ही संकल्पना मांडली आहे. ‘बफेलो मार्केट’ म्हणजे सपाट (साइडवेज) बाजार नव्हे. कंपन्यांचे समभाग तसेच बेंचमार्क निर्देशांक वर आणि खाली जात राहतात. मात्र, अतिशय कमी फरकाने ते वर-खाली होत राहतात.

‘बफेलो मार्केट’चे रूपांतर बुल मार्केट अर्थात तेजीच्या बाजारात होते का?

होय, बफेलो मार्केटचे रूपांतर तेजीच्या मार्केटमध्ये होऊ शकते. कारण, बफेलो मार्केटच्या काळात शेअरचे भाव अथवा निर्देशांक कमी फरकाने वधारत अथवा घटत असतात, अशा वेळी बाजाराला चालना देणाऱ्या घटना घडल्यास म्हणजेच अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक वृत्त अथवा कंपन्यांची चमकदार कामगिरी ‘बफेलो मार्केट’चे रूपांतर ‘बुल मार्केट’मध्ये करू शकते. याचप्रमाणे ‘बेअर मार्केट’मध्ये बाजार प्रवेश करू शकतो. काही नकारात्मक घटना ‘बफेलो मार्केट’चे रूपांतर ‘बेअर मार्केट’मध्ये करू शकतात. ‘बफेलो मार्केट’ हे काही काळच अस्तित्वात असते. त्यानंतर बाजाराचा कल बदलून तेजीच्या अथवा मंदीच्या बाजारात रूपांतरित होतो.

‘बफेलो मार्केट’च्या दरम्यान गुंतवणूक शक्य आहे का किंवा धोरण कसे असावे?

होय, शक्य आहे. बाजारात केवळ तेजी असतानाच गुंतवणूक करणे योग्य नसते. पण, बफेलो काळात तेजी अथवा मंदीच्या दिशेने बाजार मार्गक्रमण करील हे माहिती नसले, तरी बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण कायम फायदेशीर ठरतेच. शिवाय चांगल्या क्षेत्रांतील कंपन्यांची निवड करूनदेखील दीर्घ काळात चांगला नफा कमावता येऊ शकतो. शिवाय भांडवली बाजारात गुंतवणूक करताना मूलभूत गोष्टींना चिकटून राहा, तोट्यात चालणाऱ्या कंपन्या किंवा खूप कर्ज असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. वाजवीपेक्षा अधिक मूल्यांवर व्यवहार करणाऱ्या कंपन्या टाळा, जेणेकरून उच्च किंमतीला समभाग खरेदी केले जाणार नाहीत. वाजवी मूल्यांकन सांगणारी अनेक सूत्रे विविध संकेतस्थळांवर अभ्यासता येतील.

चांगल्या शेअरचा शोध कसा घ्यावा?

कंपनीच्या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती, किंमत निर्धारणाचे निकष आणि संभाव्य जोखीम घटक तपासावेत. प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना, मालमत्ता व जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी याबद्दल संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शेअर बाजार, मुंबई शेअर बाजार किंवा बाजारासंबंधी माहिती देणाऱ्या इतर संकेस्थळांवर माहिती उपलब्ध असते. याबरोबर कंपनीचे व्यवसाय क्षेत्र काय? व्यवसाय कुठे चालतो? बाजारपेठ, ग्राहक कोण? कंपनीचे प्रवर्तक कोण? कंपनीची भूतकाळातील आणि वर्तमानातील कामगिरी कशी?… अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यावीत.

हे ही वाचा… ऑस्करसाठी चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? ‘FFI’ काय आहे?

शेअर बाजारामध्ये स्टॅग, चिकन आणि पिग्जही?

शेअर बाजारात बुल आणि बेअर या जोडीबरोबरच स्टंग, चिकन आणि पिग्ज अशा प्राण्यांचाही समावेश आहे.

स्टंग (काळवीट) : शेअर बाजारामध्ये जसा बुल आणि बेअरचा समावेश होतो, त्याच पद्धतीने काही गुंतवणूकदारांना मात्र शेअर बाजारात तेजीची अथवा मंदीची परिस्थिती असताना बाजारात उतरण्याची इच्छा नसते. असे गुंतवणूकदार कंपनी आयपीओ विकते त्या वेळी शेअर खरेदी करतात. ते शेअर ज्या वेळी सूचिबद्ध होतात, तेव्हा त्याची विक्री करून नफा पदरी पाडून घेतात. अशा गुंतवणूकदारांना शेअर बाजारात स्टंग असे संबोधले जाते.

चिकन (कोंबडी) : शेअर बाजारात काही गुंतवणूकदारांचे पैसा गुंतवण्याचे धाडस होत नाही, पण अशांना फायदा मात्र हवा असतो. तेव्हा हे लोक पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग अवलंबतात. जसे बँकेतील ठेवी, रोखे इत्यादी. कोंबडीही अशाच प्रकारे दाणे टिपण्यासाठी अधीर असते, परंतु कोणाचीही चाहूल लागताच तिची घाबरगुंडी उडून पळापळ होते.

डुक्कर (पिग) : शेअर बाजारात असेही काही गुंतवणूकदार आहेत, ज्यांची तुलना पिग्जशी करण्यात येते. कारण, या प्रकारचे गुंतवणूकदार अधीर होऊन अतिउत्साहाच्या भरात खूप मोठी जोखीम पत्करतात. त्यांना अत्यंत लहान कालावधीत मोठा नफा पदरी पाडून घ्यायचा असतो. डुक्कर याचप्रमाणे लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करत असते. साधारणतः असे गुंतवणूकदार हॉट टिप्स व ऐकीव माहितीवर खूप मोठी गुंतवणूक करून बसतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian stock market and buffalo market phase impact print exp asj
Show comments