Ranjani Srinivasan Latest News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकणारी भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिचा व्हिसा ५ मार्च रोजी ट्रम्प प्रशासनानं रद्द केला होता. त्यानंतर रंजनीनं सीबीपी होम (Customs and Border Protection) या अॅपद्वारे स्वतः देशातून कायदेशीररीत्या हद्दपार होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन सरकारनं रंजनीवर हमासला पाठिंबा देण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान, सीबीपी होम अॅप नेमकं काय आहे? रंजनी स्वत:हून कायदेशीररीत्या हद्दपार कशी झाली? याबाबत जाणून घेऊ.
CBP होम अॅप काय आहे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात देशात बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी या मुद्द्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांना लष्करी विमानांमधून त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जात आहे. तसेच जे लोक स्वत:हून कायदेशीररीत्या देशातून हद्दपार होण्याचा निर्णय घेत आहेत, त्यांच्यासाठी अमेरिका प्रशासनानं सीबीपी होम हे अॅप तयार केलं आहे. कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हे अॅप लाँच करण्यात आलं आहे. या अॅपवर लॉग इन करून स्थलांतरितांना आपली सविस्तर माहिती भरावी लागते.
आणखी वाचा : Sextortion: सेक्सटॉर्शन म्हणजे काय? ते कसे घडते?
CBP होम अॅपचा वापर नेमका कशासाठी?
स्थलांतरित व्यक्ती कोणत्या कारणासाठी अमेरिकेत आली होती. ती कोणत्या शहरात किती दिवसांपासून राहत होती. आता ती अमेरिका प्रशासनाला सहकार्य करून स्वत:हून कायदेशीरीत्या हद्दपार होण्यासाठी तयार आहे का, अशी माहिती या अॅपमध्ये भरावी लागते. अमेरिकेचे होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांच्या मते, “सीबीपी होम अॅपच्या माध्यमातून ज्या स्थलांतरितांनी स्वत:हून देश सोडण्याचा निर्णय घेतला, त्यांना पुन्हा अमेरिकेत येण्याची कायदेशीरीत्या परवानगी मिळू शकते. जर स्थलांतरितांनी तसं केलं नाही, तर अमेरिकेतील लष्करी अधिकारी त्यांना शोधून काढतील आणि देशातून हद्दपार करतील. ज्यामुळे त्यांना भविष्यात अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही. ते देशातून कायमचे हद्दपार मानले जातील.”
कोण आहे रंजनी श्रीनिवासन?
रंजनी श्रीनिवासन ही भारतीय वंशाची विद्यार्थिनी आहे. ती एफ-१ व्हिसावर अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेली होती. रंजनीची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप चांगली आहे. तिने कोलंबिया विद्यापीठातून शहरी नियोजनात एम.फिल केले. त्याशिवाय ती स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीधर आहे. तिने हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. यासह CEPT विद्यापीठातून बॅचलर ऑफ डिझाइन कोर्सदेखील पूर्ण केला आहे. एनवाययू वानगरच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, ती भारतातील शहरीकरणापूर्वीच्या शहरांचा अभ्यास करत होती. तिचा अभ्यास कामगारांच्या राजकीय अर्थव्यवस्थेवर केंद्रित होता. त्याशिवाय ती सध्याच्या रोजगाराच्या कमतरतेवरील अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती.
रंजनी श्रीनिवासनवर काय आरोप होते?
अमेरिकन सरकारनं रंजनीवर हमासला पाठिंबा देऊन हिंसाचार आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, “रंजनी ही दहशतवादी संघटना हमासला पाठिंबा देत होती. तिच्याबरोबर काही इतर विद्यार्थ्यांचादेखील समावेश होता. या विद्यार्थ्यांवर कोलंबिया विद्यापीठानं निलंबनाची कारवाई केली आहे. रंजनीमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते म्हणून तिचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. विद्यापीठाने कारवाई करताच रंजनीने स्वत:हून देश सोडला आहे”, अशी माहितीही अमेरिकन प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, कोलंबिया विद्यापीठातील पदवीचा विद्यार्थी महमूद खलीलला ट्रम्प प्रशासनाने अटक केली आहे. खलीलवर इस्रायलविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी खलीलला डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवले आहे. खलील मूळचा पॅलेस्टिनी आहे.
हेही वाचा : १०० वर्षांनंतर इजिप्तमध्ये सापडले प्राचीन फॅरोचे थडगे; काय सांगतं नवं संशोधन?
अमेरिकेतून बाहेर पडताना रंजनी काय म्हणाली?
अमेरिकेतून स्वत: कायदेशीररुत्या बाहेर पडल्यानंतर रंजनीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “५ मार्च रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं माझा व्हिसा रद्द केला होता. त्यामुळे सुरक्षिततेच्या भीतीनं मी देश सोडण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या आवडत्या मांजरीला मैत्रिणीकडे सोडलं असून सुटकेस घेऊन विमानतळाकडे निघाले आहे. अमेरिकेतून मी थेट कॅनडाला जाणार असून, मला तिथे राहण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील काही दिवस मी कॅनडातच राहून शिक्षण पूर्ण करणार आहे.” दरम्यान, रंजनीने स्वत:हून देश सोडल्याची माहिती अमेरिकन प्रशासनानं एका निवेदनाद्वारे दिली.
‘दहशतवादी समर्थक हद्दपार झाल्याचा आनंद’
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी एक निवेदन जारी करून म्हटलं, “अमेरिकेत राहण्यासाठी व्हिसा असणे हा एक विशेषाधिकार आहे. पण, जर कोणी दहशतवाद आणि हिंसाचाराचे समर्थन करत असेल तर त्याच्याकडून हा विशेषाधिकार काढून घेतला पाहिजे. त्यांना या देशात राहण्याची अजिबात मुभा नाही. कोलंबिया विद्यापीठातील एका दहशतवादी समर्थकाने सीबीपी होम अॅपद्वारे स्वतःला हद्दपार केल्याचे ऐकून मला आनंद झाला आहे. अजून ज्या विद्यार्थ्यांनी देशविरोधी कारवायांत भाग घेतला आहे, त्यांचा शोध घेणं सुरू आहे. लवकरच त्यांनाही देशातून हद्दपार केलं जाईल.”