रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागले होते. यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते. हे विद्यार्थी आता पुन्हा युद्धग्रस्त युक्रेनमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश देता येणार नाही, असे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे. यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये भारतीय विद्यार्थी उर्वरित शिक्षणासाठी युक्रेनमध्ये प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये परतणार आहेत. हे विद्यार्थी युक्रेनमध्ये नेमके का परतत आहेत? युद्धजन्य परिस्थितीत ते युक्रेनमध्ये कसे पोहोचणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
युक्रेनमध्ये परतण्यासाठी विद्यार्थी कोणत्या मार्गाचा वापर करत आहेत?
युद्धजन्य परिस्थितीत भारतीय विद्यार्थी पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि रोमानियातून मायदेशी परतले होते. मात्र, आता युक्रेनच्या नैऋत्येत असलेल्या मोल्डोवा या छोटाश्या देशातून हे विद्यार्थी युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. युद्धामुळे युक्रेनमध्ये हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळे मोल्डोवाला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागत आहे. दिल्लीतून कनेक्टिंग फ्लाईटद्वारे विद्यार्थी तुर्कीतील इस्तांबुलला पोहोचत आहेत. इस्तांबुल विमानतळावर आठ तास थांबल्यानंतर मोल्डोवाची राजधानी किशीनौ या ठिकाणी विद्यार्थी दुसऱ्या एका विमानाद्वारे पोहोचत आहेत. त्यानंतर रस्ते मार्गे बसने सीमा पार केल्यानंतर विद्यार्थी युक्रेनमध्ये दाखल होत आहेत. पश्चिम युक्रेनमधील ल्विव, इवानो-फ्रान्किवस्क आणि विन्नीत्सीया या शहरांकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. या शहरांना युद्धाची कमीतकमी झळ बसली आहे. काही विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हमध्येदेखील परतत आहेत.
विश्लेषण : ब्रिटिश साम्राज्याच्या १००० वर्षांचा साक्षीदार…विंडसर कॅसल! काय आहे या किल्ल्याचा इतिहास?
मोल्डोवा मार्गच का?
युक्रेनमध्ये परतण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोपा आणि कमी त्रासदायक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा देश विद्यार्थ्यांना तीन ते सात दिवसांमध्ये ई-व्हिसा देत आहे. या तुलनेत पोलंड, स्लोवाकिया, हंगेरी आणि रोमानिया या देशांमधील व्हिसा प्रक्रिया अवघड आहे. या देशांनी आत्तापर्यंत अनेक भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारला आहे. मोल्डोवाच्या तुलनेत या देशांची व्हिसा प्रक्रिया अत्यंत महाग आहे.
युक्रेनमध्ये परतण्यासाठी विद्यार्थ्यांना किती खर्च येत आहे?
युक्रेनमध्ये परतण्यासाठी विद्यार्थ्यांना जवळपास १ लाखाचा खर्च येत आहे. यामध्ये विमान तिकिट, व्हिसा आणि इतर खर्च समाविष्ट आहेत. मोल्डोवाच्या व्हिसासाठी काही एजंट विद्यार्थ्यांना १५ ते २५ हजार आकारत असल्याचे वृत्त आहे. विमान तिकिटांसाठी ६० हजार, मोल्डोवाच्या व्हिसासाठी सर्व खर्चांची गोळाबेरीज केल्यानंतर जवळपास १० हजारांचा खर्च येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिसासाठी एजंटची मदत न घेता स्वत: अर्ज करावा, असा सल्ला युक्रेनमध्ये मोल्डोवा मार्गे दाखल झालेल्या क्रिती सुमन या विद्यार्थीनीने दिला आहे.
विश्लेषण : ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सेवा नेमकी काय आहे? याचा तुम्हाला फायदा होतो की तोटा?
युद्धजन्य परिस्थितीतही विद्यार्थी युक्रेनमध्ये का परतत आहेत?
युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये कोणतीही तरतूद नाही. या विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये प्रवेश दिल्यास भारतीय वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाला धक्का पोहोचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील या विद्यार्थ्यांना पुन्हा युक्रेनमध्ये परतावे लागत आहे.