अनिकेत साठे
दक्षिण चीन समुद्रात सागरी हद्दीवरून सभोवतालच्या राष्ट्रांचा चीनशी संघर्ष सुरू असताना भारतीय नौदलाची ‘आयएनएस सिंधुकेसरी’ पाणबुडी प्रथमच इंडोनेशियात दाखल झाली. या देशाचे चीनशी सागरी सीमेवरून मतभेद आहेत. तत्पूर्वी असेच वाद असणाऱ्या याच क्षेत्रातील फिलिपाइन्सला ब्रह्मोस निर्यात करून त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांना भारतात नुकतेच क्षेपणास्त्र संचालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. इंडोनेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर आदी आसियान राष्ट्रांशी मुत्सद्देगिरीतून अनेक गोष्टी दृष्टिपथास येणार आहेत.
‘आयएनएस सिंधुकेसरी’ का महत्त्वाची?
रशियन बनावटीची तीन हजार टन वजनाची आयएनएस सिंधुकेसरी पाणबुडी सुंदा सामुद्रधुनीतून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पोहोचली. डिझेल-विद्युत ऊर्जेवरील ही पाणबुडी आहे. दीर्घ पल्ल्याच्या भ्रमंतीत भारतीय युद्धनौका इंडोनेशियासह अन्य मित्र देशात अनेकदा भेटी देतात. त्यात काही नवीन नाही. मात्र आयुधांनी सुसज्ज पाणबुडी इतक्या दूरवर तैनातीची ही पहिलीच वेळ आहे. नौदलात पाणबुडीला विशेष महत्त्व असते. पाण्याखालून संचार करताना ती हल्ला करू शकते. आयएनएस सिंधुकेसरीच्या इंडोनेशिया भेटीतून भारतीय नौदलाची सुदूर सागरातील (निळय़ा समुद्रातील नौदल) कारवाईची क्षमता ठळकपणे अधोरेखित झाली.
ब्रह्मोस निर्यातीचे महत्त्व काय ?
फिलिपाइन्स आणि भारतादरम्यान गेल्या वर्षी ब्रह्मोसचा करार झाला. प्रशांत महासागरातील तीन मुख्य द्वीपसमूहांवर वसलेला फिलिपाइन्स भूराजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी वाढत आहे. या क्षेत्रावर चीन दावा सांगतो. त्याची झळ फिलिपाइन्सला बसत असून त्यालाही लष्करी सामर्थ्य वाढविणे क्रमप्राप्त ठरले. या कराराने भारताला ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीसाठी पहिला खरेदीदार मिळाला. त्यातून फिलिपाइन्सची दक्षिण चीन समुद्रातील संरक्षण सज्जता वाढेल. फिलिपाइन्सकडे आजवर ब्रह्मोससारखे प्रगत क्षेपणास्त्र हाताळण्याची क्षमता नव्हती. ती विकसित करण्यासाठी फिलिपाइन्सच्या सैन्य अधिकाऱ्यांना भारत प्रशिक्षण देत आहे. इंडोनेशियाशी चीनचा सागरी सीमावाद आहे. लष्करी सहकार्यातून चीनविरोधातील आघाडी बळकट होणार आहे.
आसियान देशांशी सहकार्य कसे ?
आग्नेय आशिया राष्ट्र संघटनेत (आसियान) फिलिपाइन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनामसह एकूण १० देशांचा समावेश आहे. जगाच्या नकाशावरील यातील अनेकांचे स्थान पाहिल्यास त्यांचे महत्त्व लक्षात येते. चीनच्या आव्हानांना तोंड देणाऱ्या राष्ट्रांशी सागरी सुरक्षा, संपर्कता आणि व्यापाराला चालना देण्याच्या दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. २०१८ मध्ये या देशांच्या प्रमुख नेत्यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले होते. परस्पर सहकार्यातून लष्करी मित्र जोडले जातात. अफ्रिकन आणि आखाती देशांशी लष्करी संबंध वृिद्धगत करताना दुसरीकडे आसियान राष्ट्रांशी लष्करी मैत्री दृढ केली जात आहे. संयुक्त लष्करी सराव, आयुधांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, शस्त्रास्त्र पुरवठा हा त्याचाच एक भाग होय.
लष्करी मैत्रीतून काय साध्य होईल ?
कमी भूप्रदेश लाभलेल्या सिंगापूरला (आसियान देश) तोफखाना सरावासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करणे शक्य होत नव्हते. सन २०१३ पासून त्यांचा प्रश्न भारताने मार्गी लावला. देवळालीतील फायिरग रेंज तोफांच्या सरावासाठी उपलब्ध करण्यात आली. भारतातील फायिरग रेंजचा प्रशिक्षणासाठी वापर करणारे सिंगापूर हे त्या वेळी पहिले राष्ट्र ठरले. आजही सिंगापूर तोफखाना दलातील अधिकारी व जवान आपल्या तोफा आणि सामग्री भारतात आणून साधारणत: महिनाभर प्रशिक्षण घेतात. सन १९९४ पासून सिंगापूरसह दक्षिण चीन समुद्रात संयुक्त लष्करी कवायतीचे (सिम्बेक्स) आयोजन केले जाते. सध्या देवळालीच्या तोफखाना संस्थेमार्फत २२ हून अधिक देशातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. स्कूलच्या एकूण क्षमतेच्या १० टक्के जागा परदेशी अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. हे केवळ एक उदाहरण आहे. नौदल, हवाई दल आणि लष्कराकडून संयुक्त सराव, प्रशिक्षण व्यवस्था आदींतून सिंगापूर, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, मलेशिया आदी राष्ट्रांशी मैत्रीचा धागा गुंफला जात आहे. अर्थात त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. चीनविरोधी आघाडी बळकट करण्याबरोबर शस्त्रास्त्र निर्यातीला बळ मिळते.
लष्करी सामग्री निर्यातीचे नियोजन कसे ?
देशात धनुष तोफा, तेजस, सुखोई ३० ही लढाऊ विमाने, जमिनीवरून हवेत मारा करणारे आकाश क्षेपणास्त्र, मुख्य अर्जुनसह टी ९० आणि टी ७२ रणगाडे, चितासह हलक्या वजनाची हेलिकॉप्टर, युद्धनौका, गस्तीनौका, १५५ मि. मी. तोफांचा दारूगोळा, शस्त्रास्त्रांचा मारा करणारे ठिकाण दर्शविणारी रडार यंत्रणा, चिलखती वाहने आदींचे उत्पादन व बांधणी केली जाते. रशियाच्या सहकार्याने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता राखणाऱ्या ब्रह्मोसची निर्मिती करण्यात आली आहे. फिलिपाइन्सने भारताकडून ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली. आसियान राष्ट्रांशी मैत्रीतून शस्त्रास्त्र निर्यातीचा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे.
dattatray.jadhav@expressindia.com