-पावलस मुगुटमल
जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश अशा बर्फवृष्टी होणाऱ्या भागापासून ते थेट महाराष्ट्रापर्यंत मार्च आणि त्यानंतर एप्रिलमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा होत्या. सरासरीच्या तुलनेत तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिकांची होरपळ झाली. बहुतांश भागांत गेल्या पाच ते दहा वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद झाली. विदर्भात, तर देशातील सर्वोच्च आणि १२२ वर्षांतील विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली. याच काळात विजेची विक्रमी मागणी नोंदविण्यात आली. तर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली. त्यामुळे दोन महिन्यांत प्रत्येकाच्या तोंडी वाढत्या उन्हाळ्याचीच चर्चा होती. आता उन्हाळ्याच्या हंगामाचा शेवटचा महिना असलेल्या मे महिन्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे या महिन्यात नेमके काय होणार, याबाबत हवामान अभ्यासकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही उत्सुकता आहे. याबाबत नुकताच जाहीर झालेला अंदाज नेमका काय आणि त्याचे परिणाम काय, हे समजून घेणे उपयोगाचे ठरणार आहे.
महाराष्ट्राबाबत हवामान विभागाचे भाकीत काय?
उन्हाच्या झळांनी नागरिकांची होरपळ सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाच्या वतीने मे महिन्यातील तापमान आणि पूर्वमोसमी पावसाबाबतचे भाकीत जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाच्या वतीने प्रत्येक हंगामाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्याबरोबरच प्रत्येक महिन्याचा अंदाजही जाहीर केला जात आहे. त्यानुसार नुकताच मे महिन्यातील अंदाज जाहीर करण्यात आला असून, त्यातून नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातील तापमान मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेत फारच कमी आणि बहुतांश भागात सरासरीच्या खाली राहणार आहे.
उत्तर भारताची होरपळ कायम राहणार का?
महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये कमाल तापमान कमी होऊन उन्हाचा चटका घटणार असल्याचा अंदाज असतानाच, उत्तर आणि वायव्य भागामध्ये मात्र काही विभागात मे महिन्यातही होरपळ कायम राहण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाबपासून उत्तर प्रदेश तसेच राजस्थानपासून गुजरातपर्यंत कमाल तापमानाचा पारा बहुतांश वेळेला सरासरीच्या पुढे राहण्याची शक्यता आहे. राजस्थामधील काही भाग आणि गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्रात तीव्र झळांपासून दिलासा कशामुळे?
मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील तीव्र झळांनी होरपळ होण्याच्या प्रमुख कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे उत्तर भारतात आलेल्या उष्णतेच्या लाटा. उत्तर आणि वायव्य भारतातील राजस्थान, पंजाब, दिल्ली, चंडीगड, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी भागांत सातत्याने उष्णतेच्या लाटा आल्या. त्या वेळोवेळी तीव्र झाल्याने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही तापमानात मोठी वाढ होऊन तेथे उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली. उत्तर भारतापासून गुजरात आणि मध्य प्रदेशापर्यंत त्या लाटा आल्या. या भागातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत राहिली. आता मे महिन्यात याच उत्तर भारतामध्ये तापमानात वाढ कायम राहणार असली, तरी महाराष्ट्रात तापमान फारसे वाढणार नसल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. वाऱ्यांची दिशा हे त्याचे प्रमुख कारण आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये बहुतांश वेळेला उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वारे वाहत होते. त्यामुळे उष्णतेचे प्रवाह येत होते. मे महिन्यात उत्तरेकडून येणारे वारे कमजोर असतील. त्या तुलनेत बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रातून येणारे वारे प्रभावी असतील. अनेकदा ढगाळ स्थिती, पावसाळी वातावरण निर्माण होईल. त्याचा परिणाम म्हणून दिवसाचे कमाल तापमान मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही.
पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण कसे राहणार?
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मे महिन्यातील देशातील तापमानाबरोबरच पूर्वमोसमी पावसाचा अंदाजही जाहीर केला आहे. तापमान सरासरीपेक्षा खाली राहण्याची शक्यता व्यक्त करतानाच पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण देशाचा पूर्वमोसमी पावसाचा अंदाज लक्षात घेता यंदा मे महिन्यात देशात १०९ टक्के पाऊस पडेल, असे स्पष्ट केले आहे. या महिन्याची देशातील पावसाची सरासरी ६१.४ मिलिमीटर आहे. त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो.
कोणत्या भागांत दिवसाच्या तापमानात घट होणार?
हवामान विभागाने दिवसाच्या कमाल तापमानाबाबत जाहीर केलेल्या नकाशानुसार मुंबईसह कोकण विभाग तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मे महिन्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळ राहणार आहे. या भागात मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानाचा पारा सरासरीच्या पुढेच होता. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आदी भागांसह पुणे, नगर आदी जिल्ह्यांतही कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत खूप वाढणार नाही. उर्वरित बहुतांश भागात मात्र कमाल तापमान बहुतांश वेळेला सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता आहे. त्यात विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश असेल. दिवसाचे कमाल तापमान घटणार असले, तरी रात्रीच्या किमान तापमानात मात्र मे महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर विदर्भ, मराठवाड्यात ते अधिक राहील. मात्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात किमान तापमान काही प्रमाणात कमी राहील.