Traditional Record Keepers in India ही गोष्ट सुरू होते ती ६५ वर्षीय यासिन मौलानी चिपा यांच्यापासून. यासिन हे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील पिपड येथील ब्लॉक प्रिंटचे प्रसिद्ध कारागीर आहेत. या कलेला जीआय टॅग मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या वंशावळीची पारंपरिकरीत्या नोंद ठेवणाऱ्या व्यक्तीची मदत घेतली. आपल्या खानदानी व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी ते अजमेर जिल्ह्यातील रूपनगड येथे गेले. त्या व्यक्तीने त्यांना सांगितले की, त्यांचे कुटुंब मध्ययुगीन कालखंडापासून या व्यवसायात आहे. त्यांनी फिरोजशाह तुघलकाच्या काळात इस्लामचा स्वीकार केला. धर्मांतरं केल्यानंतर त्यांच्या पूर्वजांना पिपड ब्लॉक प्रिंटबरोबरीनेच सैनिकांसाठी कपडे तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या माहितीच्या आधारे यासिन मौलानी चिपा जीआय टॅग मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पारंपरिकरित्या वंशावळी राखण्याचे काम करणाऱ्या समाजाविषयी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरावे!
अधिक वाचा: रवींद्रनाथ टागोर जेव्हा मराठी मुलीच्या प्रेमात पडले; टागोरांच्या आयुष्यातील अल्पायुषी प्रेमकथा!
या वंशावळी जपणाऱ्या समाजांना भारताचे पारंपारिक ‘रेकॉर्ड- कीपर’ मानले जाते. त्यांच्याकडे गेल्या काही शतकांच्या नोंदी सापडतात. त्यांनी राखलेल्या नोंदी न्यायालयीन प्रकरणे, मालमत्तेचे वाद, बौद्धिक संपदा यांसारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जातात. २०२३ साली अशोक नगर, मध्य प्रदेशातील जिल्हा न्यायालयाने मालमत्तेचा वाद सोडवण्यासाठी या कौटुंबिक नोंदींचा वापर केला होता. या प्रकरणात फिर्यादीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार त्यांच्या वडिलांना काकांनी दत्तक घेतले होते, कारण त्यांना स्वतःचे अपत्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी फिर्यादी ठरत होता. परंतु काकांच्या भावांनी या दत्तक प्रक्रियेला कुठलाही पुरावा नसल्याचे म्हणत फिर्यादीचा अधिकार नाकारला. म्हणूनच या प्रकरणात पटिया किंवा पारंपरिक वंशावळीच्या नोंदीची मदत घेण्यात आली. या नोंदीच्या आधारे न्यायालयाने निकाल फिर्यादीच्या बाजूने दिला.
जात आणि कौटुंबिक व्यवसाय
पारंपरिकरित्या वंशावळ नोंदणी करणाऱ्यांचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात गंगेच्या किनाऱ्यावर असणारे आणि दुसऱ्या प्रकारात इतर ठिकाणी काम करणाऱ्यांचा समावेश होतो. प्रत्येक जातीत वंशावळ नोंदणी करणारे असतात. उत्तर भारतात जजमान असतात, जे वंशाची नोंद करणाऱ्यांचे आश्रयदाते असतात. सामान्यतः, वंशावळ नोंदवणारे जजमानच्या घरी जाऊन कुटुंबासमोर आणि काही साक्षीदारांसमोर त्यांच्या पोथ्यांमध्ये (रेकॉर्ड बुक) माहिती नोंदवत असत. जन्म, मृत्यू, विवाह, कुटुंबातील विभाजन आणि अगदी धार्मिक हेतूंसाठी केलेल्या देणग्यांचीही नोंद यात केली जाते. कोटा जिल्ह्यातील कैथुन गावातील बन्सीलाल भट्ट यांनी सांगितले की, या नोंदी ठेवणारे स्वतःला ब्रह्मदेवाचे पुत्र मानतात. भट्ट हे त्यांच्या वडिलांप्रमाणेच धाकड आणि मालव जातींच्या नोंदी ठेवतात. “माझ्या घरात ३०० वर्षांपासूनच्या नोंदी आहेत. आम्ही आमच्या जजमानच्या घरी जातो, त्यांचा इतिहास सांगतो आणि त्यात नवीन भर घालतो. त्या बदल्यात जजमान अन्न, कपडे आणि पैसे देतो. काही जजमानांनी गाड्या आणि जमिनीही भेट म्हणून दिल्या आहेत,” असे ते म्हणाले. ते यासाठी वापरत असलेली लिपी ही सामान्य हिंदी नाही. काही तिला ब्राह्मी म्हणतात, तर काही जण ती बेताली असल्याचा दावा करतात. हा व्यवसाय पितृसत्ताक स्वरूपाचा असल्याने लिपी फक्त पुरुषांनाच शिकवली जाते आणि वडिलांकडून मुलाकडे दिली जाते. तरी स्त्रिया कधीकधी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर हा व्यवसाय स्वीकारतात.
७३ वर्षीय रामप्रसाद श्रीनिवास कुयेनवाले हे हरिद्वार येथील वंशावळींची नोंद करणारे आहेत, लहानपणापासून वंशावळीचा सराव करत आहेत, वडिलांच्या मांडीवर बसून ते शिकले. त्यांनी सांगितले की, या हिंदूंच्या पवित्र शहरात ‘पांडा’ म्हटल्या जाणाऱ्या वंशावळ नोंदकारकडे तेथे अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या सर्वांच्या नोंदी आहेत. “आम्ही शेकडो वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड जतन करतो. आधुनिक काळात या नोंदी न्यायालयांमध्ये खूप उपयुक्त ठरत आहेत. वडिलोपार्जित जमिनींच्या नोंदी घेण्यासाठी भारताबाहेर राहणारे अनेक लोक आमच्याकडे येऊ लागले आहेत,” असे त्यांनी सांगितले. प्रत्येक नोंदणीकार एकाच कुटुंबातील अनेक पिढ्यांची नोंद करत असतो. परंतु ते कौटुंबिक वादात कोणाचीही बाजू घेऊ शकत नाहीत. तरीही या नोंदी केलेल्या पोथ्या विशेषतः मालमत्तेच्या वादात उपयुक्त पुरावे ठरतात. नवीन भारतीय साक्ष अधिनियम, २०२३- कलम २६ (e) आणि (f) अंतर्गत हा पुरावा वैध मानला जातो. हे फक्त हिंदूपुरतेच मर्यादित नाही. चिपा यांच्याप्रमाणे मुस्लीम देखील या वंशावळींचे अनुसरण करतात.
अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
२००५ साली मदन मीना यांनी केंद्रीय सांस्कृतिक विभागाने दिलेल्या अनुदानाच्या मदतीने या विषयावर संशोधन केले होते. मदन मीना हे एक कलाकार आणि कोटा हेरिटेज सोसायटीचे कार्यकारी सदस्य आहेत. त्यांना असे आढळूनआले की, राजघराण्यातील स्त्रियांसाठी स्वतंत्र वंशावळीच्या नोंदी आहेत. मीना, राजपूत, बनिया आणि दलित समाजाच्या नोंदी ठेवणारे लोक आहेत. काही नोंदणीकार राजघराण्यातील नोंदी करण्यासाठी नियुक्त केले जातात. एक राजपूत नोंदणीकर जाट कुटुंबाला आपला आश्रयदाता करू शकत नाही, असे बन्सीलाल भट्ट म्हणाले. अजूनही या परंपरेचे पालन करणारे अनेक मुस्लिम आहेत असेही ते पुढे म्हणाले. राजस्थानच्या वंश लेखक अकादमीचे (राज्य सरकारचा अधिकृत विभाग) राष्ट्रीय सचिव बाबूलाल भट्ट यांनी सांगितले की, या वंश नोंदणीकारांनी १८५७ च्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही भारताची पहिली स्वातंत्र्य चळवळ मानली जाते. या वंश नोंदणीकारांनी ब्रिटीश अत्याचारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी संदेशवाहक म्हणून काम केले. त्यासाठी ते घरोघरी फिरायचे. इंग्रजांना त्यांची ताकद कळल्यावर त्यांनी अनेकांना ठार मारले आणि अनेकांना भारताच्या विविध भागात स्थलांतरित करण्यास भाग पाडले. रेकॉर्ड ठेवण्याची ही कला एक मौल्यवान परंपरा आहे. ज्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
स्वारस्य कमी होणे, नोकरीच्या चांगल्या संधी त्यामुळे ही परंपरा नष्ट होत आहे का?
आधुनिक तंत्रज्ञान, नोकरीच्या चांगल्या संधी आणि इंटरनेटचा वाढता वापर याच्या जोडीने पारंपारिक व्यवसायात कमी होत चाललेली रुची यामुळे ही परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही मोजकेच लोक या व्यवसायाचे अनुसरण करत आहेत. अजूनही या परंपरेचा सराव करणाऱ्यांपैकी अनेकांकडे इतर नोकऱ्या आहेत. ज्यामुळे त्यांना उत्पन्नाचा अधिक शाश्वत स्रोत मिळतो. कोटा हेरिटेज सोसायटीचे मदन मीना म्हणतात, “जजमान आणि वंश नोंदणीकार या दोघांमध्ये या विषयीचा रस कमी झाला आहे. संरक्षकांना त्यांचा कौटुंबिक इतिहास जाणून घेण्याची गरज वाटत नाही. खेड्यांचे शहरीकरण होत असल्याने तरुण पिढीला या परंपरेत रस दिसत नाही. देशाच्या इतर भागात आणि अगदी परदेशात स्थलांतर वाढल्यामुळे अनेकांनी या वंश नोंदणी करणे थांबले आहे.”
© IE Online Media Services (P) Ltd