गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निश्चलनीकरणानंतर अधिकाधिक रोकडरहित अर्थात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर करोना संसर्गाच्या उद्रेकामुळे मात्र सर्वच क्षेत्रांमध्ये संपर्करहित व्यवहारांना महत्त्व आले. सरलेल्या वर्षात नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांनी त्यामुळेच कोटीच्या कोटी उड्डाणे गाठली आहेत.

‘यूपीआय’ व्यवहारांच्या संख्येत का वाढ होतेय?

करोनाकाळात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि तो क्रम निरंतर कायम राहिला आहे. विविध बँक खात्यांद्वारे मोबाईल फोनसारख्या एकाच साधनातून देयक व्यवहार पूर्ण करता येऊ शकणारी ‘यूपीआय’ ही अत्यंत सोपी, सुरक्षित व तात्काळ सुविधा देणारी यंत्रणा असल्याने व्यवहारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे ‘यूपीआय’ ही देयक व्यवहार पद्धती संचालित केली जाते. सरलेल्या वर्षात जानेवारी २०२१ पासून यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये सतत वाढ होत असून डिसेंबरअखेर त्याने उच्चांक गाठला आहे. भारतामध्ये २०१६ मध्ये यूपीआय व्यवहारांना सुरुवात झाली. करोनाच्या काळात ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. डिसेंबर २०१८ मध्ये, मासिक व्यवहारांनी एक लख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि एक वर्षानंतर दोन लाख कोटी रुपये व्यवहार मूल्याचा टप्पा ओलांडला गेला. सप्टेंबर २०२० मध्ये ३.२९ लाख कोटी असलेले यूपीआय व्यवहार मूल्य डिसेंबर २०२१ मध्ये ८.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

महिन्याला किती व्यवहार पार पडतात?

सरलेल्या वर्षातील ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांनी साडेसात लाख कोटी रुपये (१०० अब्ज डॉलरचा) टप्पा गाठला. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये ४५६ कोटी यूपीआय व्यवहारांद्वारे ८.२७ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार करण्यात आले आहेत. सणोत्सवाच्या काळ असल्याने ऑक्टोबर महिन्यात यूपीआय व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली होती, ऑक्टोबर २०२१ मध्ये व्यवहार संख्या ४२२ कोटींवर पोहोचली होती आणि व्यवहार मूल्य ७.७१ लाख कोटी रुपये नोंदण्यात आले होते. तर सरलेल्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये ४.३१ लाख कोटी मूल्याचे २३० कोटी व्यवहार पार पडले. 

रिझर्व्ह बँकेचा अहवाल काय सांगतो?

रोख रकमेवरील अवलंबित्व कमी होत असून, देश हळूहळू डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असल्याचे संकेत मिळण्यास सुरुवात झाली आहे. एका अहवालानुसार, गुगल पे, पेटीएम, फोन-पे आणि भीम ॲप यासारख्या इतर यूपीआय मंचावर दर महिन्याला सुमारे ४ अब्जांहून अधिक व्यवहार होऊ लागले आहेत. २०१६ शी तुलना केल्यास त्यात सुमारे ४०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये १,००४ कोटी डिजिटल व्यवहार झाले. तर वर्ष २०२१ ऑनलाईन माध्यमातून व्यवहारांसाठी ऐतिहासिक ठरले. संपूर्ण वर्षात ७३ लाख कोटी मूल्याचे ३,८०० कोटी यूपीआय व्यवहार करण्यात आले.

यूपीआय व्यवहार कितपत सुरक्षित?

डिजिटल व्यवहार ग्राहकांसाठी लाभदायक असले तरी ते काही अंशी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धोकादायक देखील ठरू शकतात. बहुतांश लोकांमध्ये मुख्यतः ज्येष्ठ नागरिक किंवा आधुनिक तंत्रज्ञान हाताळता न येणारे लोकांची आर्थिक तंत्र-साक्षरतेच्या अभावी बऱ्याचदा फसवणूक होण्याची शक्यता असते. कोणतेही तंत्रज्ञान हे गुण-दोषांसहच येते. बाजारात रोजच फसवणूक करणाऱ्या नवनवीन ॲप्लिकेशनचा वापर केला जातो. लबाडीसाठी तयार केलेल्या बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून, फसवी प्रलोभने देऊन बँक खात्यातील पैसे काढून घेतले जातात. यामुळे यूपीआय व्यवहारासाठी वापरात येणारा क्रमांक (पिन) गोपनीय ठेवला पाहिजे.

यूपीआय व्यवहार करताना कोणती काळजी आवश्यक?

यूपीआयमार्फत कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी आर्थिक तपशील तपासून घेतला पाहिजे. यूपीआय ॲप हे क्यूआर कोड स्कॅन करते किंवा व्यवहार करण्यासाठी संपर्क क्रमांक घेतला जातो. तेव्हा प्राप्तकर्त्याचे नोंदणीकृत नाव दिसल्यावर व्यवहार करण्यापूर्वी ते तपासून व्यवहार पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण पैसे चुकून अनोळखी व्यक्तीकडे गेल्यास ते परत मिळविता येत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ॲप प्रदात्या कंपनीकडून नवीनतम सुरक्षा मानके निश्चित काळाने पाठवली जात असतात, ते सतत अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्यामुळे ॲप वापरण्यास सुरक्षित बनते.