ड्रॅगन फोर्स मलेशिया (Dragon Force Malaysia) या हॅकर्स ग्रुपने जगभरातील हॅकर्सला भारत सरकारच्या मालकीच्या माहिती तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चरवर सायबर हल्ले करण्याचं आवाहन केलं आहे. १० जून रोजी हॅकर्सच्या ग्रुपने ट्विटरवरुन भारतीय वेबसाईट्सवर सायबर हल्ले करण्याच्या मोहिमेला ‘स्पेशल ऑप्रेशन’ असं म्हणतं, सायबर हल्ले करण्याची घोषणा केली. पण हे हॅकर्स नेमके आहेत कोण?, मागील चार पाच दिवसांमध्ये नेमकं काय काय घडलंय? याबद्दल सायबर सुरक्षा तज्ज्ञ काय सांगतात? याच साऱ्या गोष्टींवर टाकलेली नजर…
प्रेषित अवमान प्रकरण…
देशामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी इस्लाम आणि मोहम्मद प्रेषितांसंदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हे सायबर हल्ले केले जात आहे. नुपूर शर्मा यांची सहा वर्षांसाठी पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलीय तर जिंदाल यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इस्लामिक देशांमध्ये या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त केला जातोय. याच साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीमबहुल देश असणाऱ्या मलेशियामधील या हॅकर्सच्या ग्रुपने सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून भारताला धडा शिकवणार असल्याचा दावा केलाय. अशाप्रकारे सायबर हल्ले होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वेगवेगळ्या हॅकर्स ग्रुपने जगभरातील वेगवगेळ्या देशांमध्ये सायबर हल्ले केलेत. त्यातही अनॉनिमस हा जगातील सर्वात मोठा हॅकर्सचा ग्रुप मानला जातो.
ड्रॅगन फोर्स मलेशिया आहेत तरी कोण?
ड्रॅगन फोर्स मलेशिया या ग्रुपने २०२१ साली आफली वेबसाईट सुरु केली. या ग्रुपमध्ये एकूण १३ हजार सदस्य आहेत. या ग्रुपच्या वेबसाईट्सवरच हॅकर्स चर्चा करतात. या वेबसाईटवर ११ हजार डिक्शन थ्रेड म्हणजेच चर्चेसंदर्भातील तपशील आहेत. हा फार सक्रीय ग्रुप आहे. हा ग्रुप पॅलिस्टाइनला समर्थन करतो. त्यामुळेच त्यांच्याकडून अनेकदा इस्त्रायलशीसंबंधित वेबसाईट्स हॅक केल्या जातात. टीथ्री डायमेन्शन टीम आणि रिलिक्सक्रू सारख्या हॅकर्स ग्रुपसोबत या ग्रुप काम करतो. या ग्रुपचं एक टेलिग्राम चॅनेल, ट्विटर हॅण्डल आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटही आहेत. नुकताच ११ एप्रिल २०२२ रोजी त्यांनी इस्त्रायलच्या सरकारी वेबसाईट्सवर हल्ला करुन अनेक महत्वाची कागदपत्रं लिक केली होती.
भारतीय वेबसाईट्सवर हल्ला
ड्रॅगन फोर्स मलेशिया नावाच्या हॅकर्स ग्रुपने देशातील अनेक वेबसाईट्सवर हल्ले केलेत. यामध्ये इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाच्या वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाची वेबसाईट आणि कृषी संसोधन केंद्राच्या वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाईट्ससोबत इतरही अनेक वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एक दोन नाही तर तब्बल ७० हून अधिक भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत. रविवारी रात्री उशीरा भारतातील इस्त्रायलच्या दुतावासाला वेबसाइट रिस्टोअर करण्यात यश आलं आहे. मात्र त्यावरील काही पेजेसवर अद्यापही तांत्रिक अडचणी कायम आहेत.
इतरांनाही केलं आवाहन
या गटाने सायबर हल्ला केलेल्या वेबसाइट्सच्या यादीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, भवन्स आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या वेबस्टाईसचा समावेश आहे. सायबर हल्ले करण्यात आलेल्या ७० पैकी ५० वेबसाईट्स या महाराष्ट्रातील आहेत. यापैकी अनेक वेबसाईट्सवर या हॅकर्सने ऑडिओ नोट पोस्ट केलीय. यामध्ये, “तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा धर्म आहे तसाच आमच्यासाठी आमचा धर्म आहे,” असं वाक्य ऐकू येत आहे. या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांनीही या हल्ल्यामध्ये सहभागी व्हावं असं ड्रॅगन फोर्स मलेशियाने म्हटलंय.
महाराष्ट्रातील वेबसाईट्सला फटका
भारतामधील वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या वेबसाईट आपण हॅक केल्याचा दावा करणारे स्क्रीनशॉर्ट्स आणि पोस्ट या ग्रुपने मागील काही दिवसांपासून पोस्ट केलेत. या हॅकर्सने भारतामध्ये वेबसाईट्ससाठी मुलभूत सोयीसुविधा पुरवणाऱ्या होस्टनेट इंडियाचा सर्व्हर हॅक केल्याचा दावा केलाय. यामुळे यावर निर्भर असणाऱ्या अनेक वेबसाईट्स क्रॅश झाल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रातील अनेक सरकारी संस्थांच्या वेबसाईट्स प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या सर्व्हरशी संबंधित आहेत. त्यामुळेच याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय असं दिसत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. महाराष्ट्रामध्ये हॅक झालेल्या वेबसाईट्समध्ये नागपूरमधील शासकीय विज्ञान संस्था, शेतीसंदर्भातील संस्थांच्या काही वेबसाईट्सबरोबर महाराष्ट्रातील अनेक सरकारी वेबसाईट्सचा समावेश आहे. या सर्व वेबसाईट्सवर या ग्रुपने ‘आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा दिला आहे. धक्क्कादयक बाब म्हणजे याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील ५० वेबसाईट्स हॅक झाल्यात. १४ जून २०२२ रोजी सकाळी ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईटही काही काळासाठी हॅक करण्यात आली होती. ही वेबसाईट रिस्टोअर करण्यात पोलिसांना यश आलंय.
भारत सरकारने गाफील राहता कामा नये
ड्रॅगन फोर्सने ट्विटरवरुन एक यादी पोस्ट केली असून आपल्याकडे भारत सरकारमधील साभसदांची बरीच माहिती असल्याचा दावा केलाय. मात्र त्यांनी शेअर केलेल्या माहितीमध्ये सरकारी खात्यांचे ईमेल नसून खासगी ईमेल्सचा समावेश आहे. नागपूर पोलिसांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांमध्ये वेबसाईट हॅक होण्याच्या अनेक तक्रारी आल्या असून अशा तक्रारी मुंबईमधूनही आल्यात. सिंगापूरमधील सायबर सुरक्षेसंदर्भातील कंपनी असणाऱ्या क्लाउडएसईकेचे मुख्य सुरक्षा संशोधक दर्शित असरा यांनी भारत सरकारने ड्रॅगन फोर्सच्या धमक्यांना हलक्यात घेता कामा नये असा सल्ला द मिंटशी बोलताना दिलाय. सरकारने सहज हॅक होणाऱ्या सरकारी वेबसाईटची सुरक्षा वाढवण्यासंदर्भात ततडीने पावलं उचलावीत असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
बँकांच्या वेबसाईट्स धोक्यात
वर्ल्ड वाइड वेबवरील डिजिटल यंत्रणेवर तसेच इंटरनेटसंदर्भातील हलचालींवर लक्ष ठेवणाऱ्या वेबॅक मशीनने आठ जून ते १२ जून दरम्यान भारतीय सरकारी साइट्स तसेच खाजगी पोर्टल्स विस्कळीत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. भारतामधील अनेक बँकांच्या वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा दावा सुरक्षा तज्ज्ञांनी केलाय. १३ हजारांहून अधिक सदस्य असलेल्या याच हॅकटिव्हिस्ट ग्रुपची भारतातील अनेक प्रमुख बँकांच्या वेबसाईटवर हल्ले केल्याचा दावा केला जातोय.
यांचं म्हणणं काय?
असेच हल्ले ‘१८७७’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या दुसर्या हॅकर्स ग्रुपनेही केले होते. त्यांनी इतर पोर्टल्ससह महाराष्ट्रातील विधी अकादमीच्या वेबसाईटही हॅक केली आहे. या वेबसाईटवर या ग्रुपचा मेसेज असा होती की, “आम्हाला भारतीय लोकांशी कोणतीही अडचण नाही. ते त्यांचा धर्म निवडण्यास स्वतंत्र आहेत, पण आम्ही त्यांना आमच्या धर्मावर (इस्लाम) आक्रमण करू देणार नाही”. आकडेवारी दर्शविते की जून-जुलै २०२१ मध्ये देखील, ‘ड्रॅगनफोर्स’ने इस्त्रायली सरकारच्या वेबसाइट्सवर अनेक हल्ले केले होते.
माहिती चोरण्याची भिती
“हे राजकीयदृष्ट्या प्रेरित हॅकर्स असून आणि त्यांना देशांचा छुपा पाठिंबा असतो. असे हल्ले हे भविष्यात डेटा चोरी आणि बँकिंग आणि गंभीर पायाभूत सुविधांवरील रॅन्समवेअर हल्ले होऊ शकतात असं सूचित करतात. सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करावी. जेव्हा त्यांनी इस्रायली साइट्सवर हल्ला केला तेव्हा त्यांनी इस्रायलमधील कंपन्यांचा वैयक्तिक डेटा, पासपोर्ट डेटा आणि व्हीपीएन क्रेडेन्शियल्स लीक केले होते. आपण येत्या काही दिवसांमध्ये आणखी सायबर हल्ल्यांसाठी तयारी केली पाहिजे,” असे एका सायबर सुरक्षा तज्ञाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
डॉस हल्ल्यांची शक्यता
असाही संशय आहे की डेटा लीक करण्याबरोबरच आणि डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिसचा प्रयत्न (डॉस हल्ला – वेब मालमत्ता असणाऱ्या बेवसाईट्सवर सामान्य ट्रॅफिकमध्ये व्यत्यय आणण्याचा जाणीवपूर्वकपणे केलेला प्रयत्न) अनेक भारतीय सरकारी आणि खाजगी साइटवर देखील झालाय.