भारतात विवाहसोहळे एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जातात. या विवाहसोहळ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आदींसह प्रचंड प्रमाणात खर्च केला जात असल्याचे पाहायला मिळते. असे म्हटले जाते की, भारतीय कुटुंबे शिक्षणापेक्षाही विवाहसोहळ्यांवर जास्त पैसा खर्च करतात आणि यातून ते आपल्या कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा आणि आर्थिक सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार विवाहसोहळ्यांचे आयोजन करतो. आई-वडील तर संपूर्ण आयुष्याची कमाई आपल्या मुलांच्या लग्नासाठी खर्च करतात. अनेक जण त्यासाठी कर्ज काढायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अगदी परदेशांतील नागरिकांनाही भारतीय लग्नाचे आकर्षण असते.
याचा प्रत्यय रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी व त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि फार्मा टायकून वीरेन व शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या लग्नातून येत आहे. सध्या संपूर्ण सोशल मीडियावर एक वेळ त्यांच्याच लग्नाची चर्चा आहे. हा भव्य सोहळा केवळ भारतीय मीडियाच नाही, तर त्याचे आंतरराष्ट्रीय समकक्षही कव्हर करीत आहेत. या लग्नाची चर्चा सुरू असताना भारतीय विवाहसोहळे देशाच्या अर्थव्यवस्थेला कसे हातभार लावत आहेत, हे तर जाणून घ्यायलाच हवे. लग्नाचा थाटमाट देशाच्या अर्थव्यवस्थेला कसे बळ देत आहे? याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : धूम्रपान न करणार्यांनाही होतोय कॅन्सर, संशोधनात धक्कादायक माहिती उघड; काय आहेत कारणं?
शिक्षणापेक्षा लग्नावर दुप्पट खर्च
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याविषयी आलेल्या वृत्तानुसार या विवाहसोहळ्यावर काही हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतीय विवाह उद्योगाचे मूल्य तब्बल १३० अब्ज डॉलर्स आहे. ही खाद्यपदार्थ आणि किराणा मालानंतरची दुसरी सर्वांत मोठी उद्योग श्रेणी आहे. खाद्यपदार्थ आणि किराणा मालाचा उद्योग ६८१ अब्ज डॉलर्सचा आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीच्या एका अहवालानुसार, भारतातील लग्नाची बाजारपेठ अन्न आणि किराणा मालाखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. खरे तर भारतीय कुटुंबे शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च करतात. सरासरी भारतीय लग्नासाठी सुमारे १५ हजार डॉलर्स म्हणेच जवळजवळ १३ लाख रुपये खर्च येतो. हा खर्च अगदी शाळेपासून तर मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणावर खर्च केलेल्या रकमेच्या जवळपास दुप्पट आहे.
“हे अमेरिकेसारख्या देशांच्या अगदी उलट आहे. यूएसमध्ये शिक्षणावार जास्त खर्च होतो,” असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील लग्न उद्योग हा अमेरिकेच्या बाजारपेठेच्या दुप्पट आहे; परंतु तरीही चीनच्या तुलनेत लहान आहे. जेफरीजच्या अहवालानुसार, “भारतीय विवाह उद्योगाचा आकार अमेरिकन उद्योगाच्या (७० अब्ज डॉलर्स) जवळपास दुप्पट आहे.”
भारतातीतल विवाह सोहळे म्हणजे उत्सव
भारतात विवाहसोहळे अनेक दिवस चालतात; ज्यात वधू आणि वराच्या कुटुंबीयांकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. “भारतात विवाहसोहळ्यांना सांस्कृतिक महत्त्व लाभले आहे आणि त्यामुळे विवाह सोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. अनेकदा हा खर्च उत्पन्नाच्या पातळीपेक्षा अधिक असतो,” असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात दरवर्षी सुमारे आठ ते १० दशलक्ष (८० लाख ते एक कोटी) विवाहसोहळे आयोजित केले जातात; तर चीनमध्ये सात ते आठ दशलक्ष (७० ते ८० लाख) आणि अमेरिकेत दोन ते २.५ दशलक्ष (२० ते २५ लाख) विवाहसोहळे आयोजित केले जातात. ‘WedMeGood’ या भारतीय विवाह नियोजन वेबसाइट आणि ॲपच्या अलीकडील अहवालानुसार, भारतीय विवाह उद्योग वार्षिक सात ते आठ टक्के दराने वाढत आहेत. २०२३ ते २०२४ च्या लग्नाच्या या उद्योगाची उलाढाल ७५ अब्ज डॉलर्सवर गेल्याचा अंदाज आहे.
‘लक्झरी वेडिंग मार्केट’ची वाढ
भारतात ‘लक्झरी वेडिंग’चा ट्रेंड निघाला आहे. भारतातील श्रीमंत व प्रसिद्ध लोक विवाहसोहळ्यांवर सरासरी २० लाख ते ३० लाख रुपये खर्च करतात. हा खर्च कोटींपर्यंतही जाऊ शकतो. या खर्चांमध्ये साधारणपणे पाच ते सहा कार्यक्रम, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पाहुण्यांच्या राहण्याची सोय, मिशेलिन-स्टार शेफ्सद्वारे तयार केलेल्या मेन्यूसह उत्कृष्ट खानपान, कलाकार व सेलिब्रिटींना आमंत्रण आदी सर्वच गोष्टी समाविष्ट असतात. जेफरीजच्या अहवालानुसार, लक्झरी विवाहसोहळ्यांमध्ये साधारणतः ३०० ते ५०० च्या दरम्यान पाहुणे असतात.
‘डेस्टीनेशन वेडिंग’चे फॅड
डेस्टिनेशन वेडिंग प्रत्येकालाच हवे असते. अनेक जण राजस्थानच्या शाही महालांमध्ये लग्न करतात. ‘WedMeGood’च्या २०२३-२०२४ वेडिंग इंडस्ट्रीच्या अहवालात असे आढळले आहे की, लोक परदेशी जाऊन लग्न करण्यास प्राधान्य देतात. २०२२ मधील १८ टक्क्यांच्या तुलनेत २०२४ मध्ये डेस्टिनेशन वेडिंगचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढले आहे. देशांतर्गत गोवा, उदयपूर, जयपूर, केरळ व उत्तराखंड ही ठिकाणे जोडप्यांमध्ये लोकप्रिय आहेत; तर जागतिक स्थळांमध्ये थायलंड, बाली, इटली व दुबई यांचा समावेश आहे. हृषिकेशमध्येदेखील आजकाल लोक लग्न करण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु, प्रत्येकालाच डेस्टिनेशन वेडिंग किंवा लग्नात मोठा खर्च करणे आवडत नाही. ‘मिंट’च्या वृत्तानुसार १२ टक्के जोडपी अगदी काही लोकांमध्ये छोटेखानी विवाहाला पसंती देतात.
विवाहांमुळे इतर क्षेत्रांना कशी चालना मिळते?
विवाह उद्योगात मोठे आणि लहान असे दोन्ही व्यावसायिक महत्त्वाची भूमिका निभावतात. विविध प्रदेश आणि धर्मांमध्ये त्यांच्या विशिष्ट चालीरीती आणि विधी असल्यामुळे स्थानिक व्यवसाय त्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यास मदत करतात. दागिने, पोशाख, खाद्यपदार्थ, पेये, फोटोग्राफी, लग्नाचे नियोजन, सजावट इत्यादी श्रेण्यांमध्ये लग्नासाठी खर्च होतो. निम्म्याहून अधिक दागिन्यांची विक्री वधूच्या खरेदीतून होते. कपड्यांवरील १० टक्क्यांहून अधिक खर्च लग्नासाठी केला जातो. लग्नाच्या खर्चाच्या २० टक्के खर्च कॅटरिंगसाठी लागतो; तर इव्हेंट मॅनेजमेंटवर १५ टक्के खर्च होतो. वेडिंग प्लॅनर्स साधारणपणे एकूण इव्हेंट बजेटच्या आठ ते १० टक्क्यांदरम्यान शुल्क आकारतात.
हेही वाचा : पावडर लावल्याने खरंच कॅन्सर होतो का? जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
“विवाह व्यावसायिकांनी २०२२ ते २०२३ या कालावधीत त्यांच्या व्यवसायात वर्षभरात १५ ते २२ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे,” असे ‘WedMeGood’चे सह-संस्थापक मेहक सागर शहानी यांनी ‘मिंट’ला सांगितले. विवाह उद्योग अप्रत्यक्षपणे इतर क्षेत्रांनाही मदत करतात. रंग उद्योगालाही विवाहसोहळ्यांमध्ये फायदा होतो. कारण- कुटुंबे सहसा समारंभाअगोदर त्यांच्या घरांचे नूतनीकरण करतात. टेलिव्हिजन, स्मार्टफोन व गृहोपयोगी उपकरणे यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीत वाढ होते. कारण- अनेकदा लग्नात या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या जातात.