ऑस्ट्रेलियातील बकले येथून एक मोठी घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील एका ३६ वर्षीय महिलेची शनिवारी हत्या करण्यात आली असून, राहत्या घरापासून ८४ किमी अंतरावर असलेल्या रस्त्याच्या कडेवरील कचराकुंडीत तिचा मृतदेह आढळून आल्याची माहिती आहे. महिलेच्या पतीवर खुनाचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतलाय. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, श्वेता मधगनी असे महिलेचे नाव आहे. महिलेच्या पतीने ही हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर तो आपल्या मुलासह हैदराबादला रवाना झाला. त्याने मुलाला पत्नीच्या पालकांच्या ताब्यात दिले.
महिलेचा मृतदेह सापडला
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी एका निनावी कॉलद्वारे अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती मिळाली, तेव्हा व्हिक्टोरियामधील एका रस्त्याच्या कडेवरील कचराकुंडीत मृतदेह सापडला. गीलॉन्गच्या पश्चिमेला जवळपास ३७ किलोमीटर अंतरावरील बकले येथे एका हिरव्या कचऱ्याच्या डब्यात मृतदेह पोलिसांना सापडला.
तपास पथक श्वेताच्या मृत्यूला संशयास्पद मानत असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. पॉइंट कुकमधील मिर्का वेवर हा गुन्हा घडला, जिथे श्वेता तिचा नवरा आणि मुलाबरोबर राहते. श्वेताचा पती अशोक हा पोलिसांना मृतदेह सापडण्याच्या काही दिवस आधी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह भारतात निघून गेला होता, तोच प्राथमिक संशयित असल्याचे सांगितले जात आहे.
ही महिला पती आणि मुलाबरोबर ऑस्ट्रेलियात राहत होती. व्हिक्टोरिया पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रविवारी दुपारी विन्चेल्सीजवळील बकले येथील माऊंट पोलॉक रोडवर एक महिला मृतावस्थेत आढळून आली. या घटनेचा तपास होमिसाईड स्क्वॉडचे पथक करीत आहे. पॉइंट कुकमधील मिर्का वेवरील निवासी पत्त्यावर हा गुन्हा घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बकले हत्या प्रकरणाशी त्याचा संबंध असल्याचे मानले जात आहे. व्हिक्टोरिया पोलिसांनी पुढे सांगितले की, तपास पथक महिलेचा मृत्यू संशयास्पद मानत आहे. संबंधित लोक एकमेकांना ओळखतात आणि गुन्हेगार देश सोडून पळून गेला आहे. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचाः ऑस्कर जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कसा झाला? पुरस्कारांची सुरुवात कधी झाली?
या हत्येमागे श्वेताचा पती होता का?
द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अशोकने आपल्या मुलासह भारतात पळून जाण्यापूर्वी स्वेताची कथितपणे हत्या केली असून, श्वेताच्या पालकांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. माहिती मिळाल्यानंतर हैदराबादमधील श्वेता यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उप्पलचे आमदार बंदरी लक्ष्मा रेड्डी यांनी तिच्या पालकांची भेट घेतली. त्यांनी पीटीआयला सांगितले की, श्वेताच्या पालकांच्या विनंतीनुसार त्यांनी तिचे पार्थिव हैदराबादला आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या कार्यालयालाही माहिती दिली असल्याचे आमदार म्हणाले. उप्पलचे आमदार बंदरी लक्ष्मा रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, ही महिला त्यांच्या मतदारसंघातील असल्याने या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या पालकांची भेट घेतली. आमदाराने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, महिलेच्या पालकांच्या विनंतीवरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी पत्र दिले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या कार्यालयालाही माहिती दिली असल्याचे आमदारांनी सांगितले. आमदार पुढे म्हणाले, महिलेच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार जावयाने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्वेताच्या दुःखद मृत्यूने मेलबर्नच्या पश्चिमेकडील लोकांना आणि भारताला धक्का बसला आहे. “ एबीसी न्यूजशी बोलताना श्वेताच्या शेजाऱ्याने तिची आठवण खूप सुंदर मैत्रीण म्हणून करून दिली. हैदराबादमधील ए. एस. राव नगर येथून स्थलांतरित झाल्यानंतर ती विद्यार्थिनी म्हणून ऑस्ट्रेलियात आली. पुढे तिला नागरिकत्व मिळाले आणि ती या देशात स्थायिक झाली. “ती खूप चांगली होती आणि ती तिच्या मुलाची काळजी घ्यायची, असंही तिच्या शेजाऱ्याने सांगितले.