भारत आणि कॅनडा यांच्यात बिघडलेल्या संबंधांमुळे कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीयांच्या कुटुंबांमध्ये त्यांच्या मुलांची सुरक्षितता आणि त्यांचे भविष्य यांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अलीकडेच दोन्ही देशांनी आपले उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकार्‍यांना परत बोलावण्याची घोषणा केल्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच चिघळले आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर तणाव निर्माण झाला. आता भारताने परत बोलावलेले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना उत्तर अमेरिकन देशातील खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका असल्याने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांवर खलिस्तानसमर्थक प्रभाव टाकत आहेत का? त्यांना खरोखरच धमकावले जात आहे का? याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खलिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय विद्यार्थ्यांना धोका

कॅनडातील भारतीय राजदूत संजय वर्मा यांनी एका मुलाखतीत ‘पीटीआय’ला सांगितले की, खलिस्तान समर्थकांपैकी काहींनी खंडणी, मानवी तस्करी आणि इतर गुन्ह्यांमध्ये अशा फुटीरतावादी घटकांचा समावेश असल्याचे सांगत, याला एक ‘गुन्हेगारी उपक्रम’ ठरविले आहे. ‘एनडीटीव्ही’शी बोलताना त्यांनी इशारा दिला, “यावेळी कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांकडून विद्यार्थ्यांसह मोठ्या भारतीय समुदायाला धोका आहे”. वर्मा यांनी स्पष्ट केले की, कॅनडातील नोकरीच्या संकटाचा गैरफायदा घेऊन खलिस्तानी घटक विद्यार्थ्यांना पैसे आणि अन्नाचे आमिष दाखवतात. “तेथील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता, तेथे नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यांकडून विद्यार्थ्यांना पैसे व अन्न दिले जाते आणि अशा प्रकारे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी त्यांच्यावर गुन्हेगारी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकतात,” असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल म्हणून कसे वापरत आहे? काय आहे ‘मॉस्किटो प्रोटोकॉल’?

संजय वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, हे खलिस्तानी दहशतवादी विद्यार्थ्यांना कॅनडातील भारतीय राजनैतिक इमारतींच्या बाहेर निषेध करण्यास, भारतविरोधी घोषणा देण्यास किंवा राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यास आणि या कृत्यांची छायाचित्रे किंवा व्हिडीओ तयार करण्यास प्रवृत्त करतात. “या विद्यार्थ्यांंकडून गैरकृत्ये करून घेतल्यानंतर त्यांना आश्रय दिला जातो. कारण- त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे त्यांचा असा समज झालेला असतो की, मी आता भारतात परत गेलो, तर मला शिक्षा होईल.“ अशा खलिस्तानवाद्यांच्या आमिषांना बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना आश्रय दिल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत,” असे त्यांनी वृत्तवाहिनीला सांगितले. वर्मा म्हणाले की कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांवर नकारात्मक प्रभाव पडत आहे आणि त्यांना चुकीच्या दिशेने ढकलले जात आहे.

कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांकडून विद्यार्थ्यांसह मोठ्या भारतीय समुदायाला धोका आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

”पंजाबमधील अनेक तरुणांना कॅनडातील खलिस्तानी घटकांकडून गटांमध्ये सामील होण्याची धमकी देण्यात आली होती. तिथे गेलेली अनेक निष्पाप मुले गुन्हेगार, गुंड, खलिस्तानी गुंड, खलिस्तानी गुन्हेगार होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडत आहे आणि माझ्या माहितीनुसार ते खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली आहेत,” असा दावा वर्मा यांनी पीटीआयशी बोलताना केला. त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्याशी नियमितपणे बोला. त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करा, असे आवाहन केले आहे.

कॅनडामधील भारतीय विद्यार्थी

परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी कॅनडा हे लोकप्रिय ठिकाण आहे. नॅशनल फाऊंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी (NFAP) नुसार, कॅनडामधील सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा ४० टक्के आहे. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ३,७४,०६० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी १,३७,४४५ भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यास परवाने मिळाले आहेत, जे एकूण विद्यार्थ्यांच्या ३६.७ टक्के आहेत. अधिकृत आकडेवारी दर्शविते की, सध्या ४,२७,००० भारतीय उत्तर अमेरिकेच्या देशांत शिक्षण घेत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला कॅनडाच्या सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा आणली आणि अभ्यास परवाने जारी करण्याच्या प्रक्रियेत बदल केले. त्यामुळे कॅनडामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. परं,तु या बदलांपूर्वीच २०२३ च्या उत्तरार्धात कॅनडात शिकण्यासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक अडचणी, खलिस्तानी दहशतवादी चळवळीमध्ये विद्यार्थी सामील होण्याची भीती आणि वर्णद्वेष हे यासाठी कारणीभूत घटक आहेत.

हेही वाचा : हरदीप सिंह निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास कॅनडाचा नकार; राष्ट्रीय तपास संस्थेला प्रमाणपत्र का हवेय?

“गेल्या काही वर्षांपासून तेथे समस्या वाढत असल्याने हे घडणे निश्चितच होते आणि भारतीय पालकांना हे वास्तव समजले आहे की, आपल्या मुलांना कॅनडासारख्या देशात पाठविणे फायदेशीर नाही,” असे धोरणात्मक व्यवहार विश्लेषक कमर आगा यांनी ‘स्पुटनिक इंडिया’ला सांगितले. कॅनडामध्ये राहणारे भारतीय विद्यार्थी आधीच उत्तर अमेरिकन देशांतील गृहनिर्माण संकटामुळे हैराण झाले आहेत. गगनाला भिडलेले भाडे आणि घरांचा तुटवडा, तसेच नोकऱ्या शोधण्यात अडचण आदींचा फटका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात असे आढळून आले की, अनेक विद्यार्थ्यांना घरांच्या तळघरात एकाच खोलीत राहावे लागत आहे आणि त्यांना मिळेल त्या पार्ट-टाइम नोकऱ्या कराव्या लागत आहेत. वाढत्या राजनैतिक तणावाच्या बाबतील विद्यार्थी म्हणतात की ते निराश नाहीत; परंतु त्यांचे पालक चिंतेत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian youths being threatened by khalistani elements in canada to join gangs rac