10 Reasons Not to sleep With Him : चांगल्या आरोग्यासाठी शरीराला पुरेशा झोपेची आवश्यकता असते. दिवसभर आलेला थकवा, कंटाळा झोपल्यानंतर नाहीसा होतो. पूर्णवेळ झोपे घेणे आरोग्यासाठी लाभदायक असतं. माणसाने दिवसातून कमीत कमी आठ तास झोपायला हवे, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. परंतु, सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांची झोप पूर्ण होत नाही. तर काहींनी रात्री कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना वेळेवर झोप लागत नाही. एका नवीन सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की, जवळजवळ ५९ टक्के भारतीय दररोज रात्री सहा तासांपेक्षाही कमी वेळ झोप घेतात. दरम्यान, रात्री वेळेवर झोप न येण्याची कारणं कोणती? झोप पूर्ण न झाल्याने शरीरावर काय परिणाम होतात? हे जाणून घेऊ.

‘लोकलसर्कल’ने सर्वेक्षणात काय म्हटलं?

नोएडा येथील लोकलसर्कल या संस्थेने भारतीयांच्या झोपेबद्दल सर्वेक्षण केलं. ज्यामध्ये देशातील ३४८ जिल्ह्यांमधील ४३ हजारांहून अधिक लोकांवर अभ्यास करण्यात आला. त्यातून असं समोर आलं की, फक्त ३९ टक्के भारतीय दररोज सहा ते आठ तास झोप घेतात. तर ३९ टक्के भारतीय फक्त चार ते सहा तास झोपेला प्राधान्य देतात. याशिवाय २० टक्के भारतीय फक्त चार तासच झोपतात. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी फक्त दोन टक्के लोक आठ ते दहा तास झोप घेतात. उर्वरित ५९ टक्के लोक सहा तासांपेक्षा कमी वेळ झोप घेत असल्याचं दिसून आलं.

दररोज किती तासांची झोप आवश्यक?

नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडियाच्या मते, निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान सात ते आठ तास झोप घेणं गरजेचं आहे. सहा तासांपेक्षा कमी झोप घेतली, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीराला पुरेशी झोप न मिळाल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. “झोप ही आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाइतकीच महत्त्वाची आहे, तरीही लाखो लोक पुरेशी झोप घेत नाहीत,” अशी चिंता जागतिक स्तरावर असाच अभ्यास करणारे रेसमेडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कार्लोस एम. नुनेज यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : विमानातील शौचालयांत कोणकोणत्या वस्तू आढळल्या? तुंबलेल्या टॉयलेटबाबत एअर इंडियाचा दावा काय?

वेळेवर झोप न येण्याची कारणं कोणती?

झोपेची अनियमित पद्धत, वाढतं वय, मेटाबॉलिज्म, रात्री टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यात घालवलेली वेळ, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि मद्यपान यासारखे घटक वेळेत झोप न येण्याची प्रमुख कारण असल्याचं लोकलसर्कलने आपल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. “निरोगी झोपेदरम्यान, व्यक्ती झोपेच्या चक्रांच्या मालिकेतून पुढे जातात, झोपेचे वेगवेगळे टप्पे असतात. भारतातील ५९% लोक दररोज रात्री सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात. यापैकी जवळजवळ निम्मे लोक आठवड्याच्या शेवटीही झोपेची कमतरता भरून काढू शकत नाही. झोप न येण्याने त्रस्त असलेले ७२ टक्के लोक रात्री वारंवार उठून वॉशरूममध्ये जातात, असं अभ्यासातून समोर आलं आहे.

झोपेच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे २५ टक्के लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. तर बाहेरील आवाज आणि डासांमुळे २२ टक्के लोकांच्या झोपेत व्यत्यय येतो. नऊ टक्के लोकांच्या झोपेच्या व्यत्ययाला स्लीप एपनियासारख्या वैद्यकीय परिस्थिती कारणीभूत होत्या. तर इतर नऊ टक्के लोकांनी वेळेवर झोप न येण्याला जोडीदार आणि मुलांना जबाबदार धरलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फक्त सहा टक्के लोकांनी झोपेमध्ये व्यत्यय आणण्याचं कारण मोबाईल कॉल किंवा संदेश असल्याचं अभ्यासकांना सांगितलं आहे.

पूर्ण झोप न होण्यामागचं कारणं कोणती?

लोकलसर्कलचे संस्थापक सचिन तापाडिया यांनी द न्यू इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “उशिरापर्यंत काम आणि लांबच्या प्रवासामुळे बऱ्याच भारतीयांचे जेवण रात्री नऊ वाजल्यानंतर होते. त्यातच कामाच्या ताणामुळे त्यांना सकाळी लवकर उठावे लागते. परिणामी त्यांची झोपेची वेळ कमी होते. जर झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारायची असेल तर जीवशैलीत बदल करणे आवश्यक आहे.” या सर्वेक्षणात झोपेच्या कमतरतेचे वास्तविक परिणाम देखील उघड झाले आहेत.

पुरुषांच्या तुलनेत महिलांची झोप कमी

४७ टक्के नोकरदार भारतीयांनी झोपेच्या कमतरतेमुळं किमान एकदा आजारी रजा घेतल्याचं कबूल केलं आहे. याव्यतिरिक्त, ३७ टक्के लोकांनी रात्री नऊ नंतर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम सुरू केल्याचं सांगितलं आहे. ज्यामुळे त्यांच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात आणखी व्यत्यय येत असल्याचं दिसून आलं आहे. अपुऱ्या झोपेचा महिलांना सर्वाधिक त्रास होत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे. सरासरी महिलांची पुरुषांच्या तुलनेत रात्रीची झोप कमी होते. यामागचे कारण म्हणजे, शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही.

अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात?

अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. झोपेच्या अभावामुळे हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावं लागू शकतं. बहुतेकांना या धोक्यांची माहिती असूनही ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात. निष्कर्षांनुसार, ३६ टक्के भारतीय रविवारी दुपारी झोप घेतात. २३ टक्के लोक आठवड्याच्या शेवटी झोपण्याचा प्रयत्न करतात. १३ टक्के लोक सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत झोप घेतात. परंतु, अल्पकालीन उपाय सतत झोपेच्या कमतरतेची पूर्णपणे भरपाई करू शकत नाहीत. “मेंदू आणि शरीरावर होणाऱ्या संभाव्य परिणामांवरून असे दिसून येते की, निरोगी झोपेसाठी झोपेच्या सातत्यतेमध्ये व्यत्यय आणणारे विचलित करणारे घटक टाळणे आवश्यक आहे,” असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

हेही वाचा : ATM Cash Problem : एटीएममधून पैसे काढण्यास अडचणी का येत आहेत? पैशांचा तुटवडा निर्माण होण्यामागचं कारण काय?

रात्री लवकर झोप येण्यासाठी काय करावे?

सर्वेक्षण अहवालासोबत, संशोधन संस्थेने रात्री लवकर झोप येण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. रात्री झोप न येण्यामागची कारणं समजून घेतली तर समस्या सोडवणं अधिक सोपं होऊ शकतं. चांगली झोप येण्यास मदत करणारे १० सोपे आणि प्रभावी मार्ग खालीलप्रमाणे आहेत.

  • रोजचा दिनक्रम सातत्यपूर्ण ठेवा.
  • विशेषतः संध्याकाळी कॅफिनचे सेवन कमी करा.
  • झोपण्यापूर्वी स्क्रीन – टीव्ही, संगणक आणि फोन बंद करा.
  • जेवण केल्यानंतर लगेचच झोपायला जाणे टाळा.
  • उपाशीपोटी झोपू नका, गरज पडल्यास हलका नाष्टा करा
  • दररोज नियमित व्यायाम करा.
  • झोपण्यापूर्वी पेय पदार्थांचे सेवन टाळा.
  • बेडरुममध्ये अंधार ठेवा, झोपण्यापूर्वी लाईट्स बंद करा.
  • शक्य तितकी आरामदायी गादी, उशी खरेदी करा
  • शरीराला नैसर्गिकरित्या झोपायची सवय लावा.

Story img Loader