भारत हा उष्ण कटिबंधीय देश आहे. मात्र, भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आज ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे ग्रस्त आहे. सूर्यप्रकाश केवळ ऊर्जेचाच नव्हे, तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या ड जीवनसत्त्वाचा नैसर्गिक स्रोतदेखील आहे. ड हे असे जीवनसत्व आहे, जे आपल्याला नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळते. ज्या देशात वर्षभर पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, त्या देशातही अनेक नागरिकांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. शहरी जीवनशैली, बदलत्या सवयी व प्रदूषण यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे कारण काय? त्यावरील उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.
भारतीयांमधील ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे कारण काय?
‘सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या मे २०२४ च्या अभ्यासानुसार, दक्षिण भारतातील शहरी प्रौढ लोकसंख्येमध्ये ड जीवनसत्त्वाची पातळी सामान्यत: अपुरी होती. अगदी तसेच परिणाम उत्तर भारतात केल्या गेलेल्या पूर्वीच्या अभ्यासात आढळून आले, जेथे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निरोगी प्रौढ व्यक्तींमध्ये ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण ९१.२ टक्के होते, जे लक्षणीय होते. भारतातील ड जीवनसत्त्वावरील अनेक समुदाय-आधारित अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण ५० ते ९४ टक्क्यांपर्यंत आहे. ऑनलाइन फार्मसी, टाटा 1mg लॅब्सने केलेल्या २०२३ च्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, तीनपैकी एक भारतीय किंवा अंदाजे ७६ टक्के लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आहे. २५ वर्षांखालील तरुणांमध्ये कमतरतेचे हे प्रमाण ८४ टक्के इतके जास्त होते आणि २५ ते ४० वयोगटातील ८१ टक्क्यांमध्ये लोकांमध्ये ही समस्या आढळून आली.
हेही वाचा : जगातील सर्वांत मोठ्या विमानतळासाठी ‘हा’ देश समुद्रामध्ये तयार करणार कृत्रिम बेट; याची वैशिष्ट्ये काय?
ह
h
त्यामागील कारणे काय?
भारतात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असला तरी लोक सूर्यप्रकाश घेण्याकरिता बाहेर पडत नाहीत. बाह्य क्रियाकलापांची अनुपस्थिती हे ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे एक मुख्य कारण आहे. अहमदाबादमधील शाल्बी हॉस्पिटलमधील इमर्जन्सी मेडिसिन आणि क्रिटिकल केअरचे सल्लागार डॉ. मिनेश मेहता यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, शहरी भागातील बहुतेक लोक त्यांचा बहुतांश वेळ घरामध्ये, कामावर वा शाळेत घालवतात. बहुतांशी शरीर झाकलेले कपडे घालणे, सनस्क्रीनचा वाढता वापर, हे पुरेसा सूर्यप्रकाश न मिळण्याचे आणखी एक कारण आहे. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वायुप्रदूषण. धूर, धुके व धूळ यांचे उच्च प्रमाण थेट सूर्यप्रकाशाला प्रतिबंधित करते आणि यूव्हीबी किरणांना अवरोधित करते, जे त्वचेला ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात.
“एखाद्याने प्रदूषित शहरांमध्ये घराबाहेर वेळ व्यतीत केला तरीही यूव्हीबी किरण पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी त्याच्या शरीरात प्रवेश करत नाहीत,” असे डॉ. मेहता यांनी प्रकाशनाला सांगितले. त्याशिवाय भारतीयांमध्ये मेलेनिनच्या उच्च पातळीमुळे त्वचेचा रंग सामान्यत: गडद असतो, जो त्वचेला अतिनील किरणोत्सर्गाच्या हानीपासून वाचवतो आणि यूव्हीबी किरण शोषून घेण्याची क्षमता कमी करतो. “काळी त्वचा असलेल्या लोकांना ड जीवनसत्त्व समान प्रमाणात तयार करण्यासाठी फिकट त्वचेच्या लोकांच्या तुलनेत जास्त काळ सूर्यप्रकाशात राहावे लागते,” असे डॉ. मेहता यांनी स्पष्ट केले.
एकंदर आरोग्यासाठी आवश्यक पोषक
सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे अत्यावश्यक आहे. कारण- ते त्वचेला ड जीवनसत्त्व तयार करण्यास सक्षम करते. सूर्यप्रकाशातून मिळणारे हे जीवनसत्त्व मजबूत हाडे, दात, रोग, प्रतिकारशक्ती यांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी पोषक घटक म्हणून आवश्यक आहे. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जाणवणाऱ्या लक्षणांमध्ये सतत थकवा, शरीरातील व्यापक वेदना, सांधेदुखी आणि उदासीनता किंवा चिंता यांसारख्या बाबींचा समावेश होतो. पुरुषस्थ ग्रंथी कर्करोग, मधुमेह, संधिवात व मुडदूस यांसारख्या गंभीर आरोग्य विकारांशी सूर्यप्रकाशाची कमतरता दीर्घकाळपर्यंत जोडली गेली आहे.
सूर्यप्रकाश हा या महत्त्वपूर्ण जीवनसत्वाचा नैसर्गिक आणि कार्यक्षम स्रोत आहे. कारण- जेव्हा यूव्हीबी किरण त्वचेच्या संपर्कात येतात, तेव्हा ते ड जीवनसत्त्वाच्या संश्लेषणास चालना देतात. त्यामुळे सेरोटोनिन, मूड वाढविणारे व नैराश्याचा सामना करणारे हार्मोन्स वाढतात आणि मानसिक आरोग्यदेखील चांगले होते. शरीराचे अंतर्गत नियमन करणे आणि झोपेची गुणवत्ता सुधारणे यांसाठी सूर्यप्रकाशाची मदत होते. विशेष म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ ईस्टर्न फिनलंडच्या नोव्हेंबरमधील अभ्यासानुसार, ड जीवनसत्त्वाच्या पूरकांचा नियमित वापर करणाऱ्यांना मेलेनोमासारख्या त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी असतो. जरी बरेच लोक ड जीवनसत्त्व पूरक आहार घेत असले तरी चुकीचे डोस, कमी सूर्यप्रकाश, आधीपासून अस्तित्वात असलेली आरोग्य स्थिती आणि इतर काही कारणांमुळे अनेकांना याबाबतचे कोणतेही परिणाम दिसत नाहीत.
त्यावर उपाय काय?
ड जीवनसत्त्वाची कमतरता दूर करण्यासाठी सूर्यप्रकाश, आहाराच्या चांगल्या सवयी आणि आवश्यक तेथे पूरक आहार यांचे मिश्रण आवश्यक आहे. सूर्यस्नानासाठी म्हणजेच काय तर दररोज सूर्यप्रकाशात उभे राहण्यासाठी १५ ते ३० मिनिटे देणे आवश्यक आहे. दररोज सूर्यस्नान घेण्यासाठी सकाळी ८ ते ११ दरम्यान ही योग्य वेळ आहे. सॅल्मन, मॅकेरल, फिश रो, फोर्टिफाइड डेअरी आणि तृणधान्ये यांसारख्या ड जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. अशक्तपणा, हाडांचा त्रास किंवा वारंवार संसर्ग होत असल्याचे जाणवल्यास पूरकांबद्दल सल्ला घेणे आणि डॉक्टरांकडून ड जीवनसत्त्वाची पातळी तपासणेही आवश्यक आहे.