इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान युद्ध सुरू असल्यामुळे पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यादरम्यान असलेल्या जेरुसलेम शहराची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम व ज्यू या तीनही धर्मांसाठी हे शहर पवित्र मानले जाते. मात्र, जेरुसलेम हे जगातील सर्वांत वादग्रस्त शहर होण्याआधी १२ व्या शतकात भारताने या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते; जे आजही कायम आहे. या प्राचीन शहरात तपकिरी रंगाची एक दुमजली इमारत उभी आहे; ज्यावर “भारतीय धर्मशाळा, स्थापना- इसवी सन १२ वे शतक, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार” असा फलक दिसून येतो. या धर्मशाळेकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला ‘झवियत-अल-हुनुद’, असे अरबी भाषेत नाव देण्यात आले आहे; ज्याचा अर्थ ‘इंडियन कॉर्नर’ असल्याचे सांगितले जाते. ऑक्टोबर २०२१ साली परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-जेरुसलेमच्या ८०० वर्षांच्या जुन्या संबंधावर प्रकाश टाकणाऱ्या या इमारतीच्या नव्या फलकाचे अनावरण केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत-जेरुसलेम संबंध कसे निर्माण झाले?

काबूल, मुलतान ते पंजाब असा प्रवास करणारे सुफी संत बाबा फरीद यांनी जेरुसलेमच्या या धर्मशाळेत ४० दिवस ध्यानधारणा केली असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी ध्यान करून बाबा फरीद पुन्हा पंजाबला परतले. त्यानंतर पुढे अनेक वर्षे मक्केला जाणारे भारतीय मुस्लीम जेरुसलेमला भेट देत असत आणि याच धर्मशाळेत प्रार्थनेसाठी येत असत. काळाच्या ओघात हे ठिकाण पवित्र जागा आणि भारतीय प्रवाशांसाठी धर्मशाळा म्हणून विकसित होत गेली. त्याआधी ते लॉज म्हणून ओळखले जात होते.

हे वाचा >> ‘जेरुसलेम दिन’ म्हणजे काय? यावरून इस्रायल-पॅलेस्टाइन आपापसात का भिडतात?

बाबा फरीद कोण होते?

बाबा फरीद यांचा जन्म इ.स. ११७३ मध्ये मुलतानजवळच्या (पाकिस्तान) कोठेवाल येथे झाला. बाबा फरीद यांच्या आजोबांनी काबूलहून आपल्या परिवारासह पंजाब प्रांतात स्थलांतर केले होते. ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी या चिस्ती संप्रदायाच्या सूफी संतांचे उत्तराधिकारी म्हणून फरीदुद्दीन ऊर्फ बाबा फरीद यांना ओळखले जाते. तसेच पंजाबी भाषेत काव्य लिहिणारे ते पहिले सुफी संत होते. शीखांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरू ग्रंथसाहिबमध्ये बाबा फरीद यांच्या काही रचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

हे वाचा >> जे आले ते रमले.. : ख्वाजा फरीदुद्दीन गंज ए शक्कर

पंजाब आणि जगातील इतर शहरांमध्ये प्रवास करताना बाबा फरीद यांनी अल-मक्सा मशिदीला भेट दिली होती. या ठिकाणी त्यांनी काही काव्यरचना निर्माण केल्या. जुन्या जेरुसलेमला त्यांनी भेट दिली असताना त्यांना विश्रांतीसाठी हे लॉज आढळून आले होते. या लॉजला मुस्लिमांमध्ये बाब-अज-झाहरा आणि ख्रिश्चनांमध्ये हेरोडचे गेट म्हणून ओळखळे जात होते. सुफी संप्रदायासाठी समर्पित असलेली वास्तुरचना, संप्रदायाच्या अनुयायांसाठी ध्यानधारणा करण्यासाठी जागा व प्रवाशांसाठी धर्मशाळा, असे या लॉजचे स्वरूप होते.

सुफी अनुयायी ज्या ठिकाणी एकत्र येऊन आध्यात्मिक क्रिया करीत असत, त्या जागेला खानकाह, असे म्हटले जायचे. या जागेलाही बाबा फरीद यांच्या काळात ‘खानकाह’ म्हटले जात होते. बाबा फरीद गेल्यानंतर ‘खानकाह’चे रूपांतर भारतीय प्रवाशांसाठीच्या धर्मशाळेत झाले. त्यामुळे या जागेला झविया अल-हिंदीया (Zawiya Al-Hindiya) हे अरेबिक नाव मिळाले होते; ज्याचा अर्थ होतो ‘लॉज ऑफ हिंद’. विशेष म्हणजे जेरुसलेम आणि आसपासच्या प्रदेशात मागच्या ८०० वर्षांत अनेक बदल झाले. ख्रिश्चन धर्मयुद्ध, इजिप्त व सीरियामधील मामलुक योद्ध्यांची आक्रमणे, ऑटोमन साम्राज्य, असे अनेक शासक आले तरी या लॉजने भारताशी असलेले संबंध कायम ठेवले.

मध्ययुगीन प्रवासी इवलिया चेलेबी यांनी झविया अल-हिंदीया याबद्दल माहिती देताना लिहिले की, १६७१ साली शहरातील सर्वांत मोठी धर्मशाळा म्हणून या धर्मशाळेचा उल्लेख केला जात होता. राजनैतिक अधिकारी व लेखक नवतेज सरना यांनी १६८१ सालचे दस्तऐवज मिळवले आहेत. त्यामध्ये लॉजच्या मालकीवरून चाललेल्या विवादाची माहिती मिळते.

ऑटोमन राजवटीत दक्षिण आशियातील शेख यांच्या नेतृत्वाखालीही या लॉजला अनन्यसाधारण महत्त्व होते. १९१९ साली दुसऱ्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचे विघटन होत असताना काही महत्त्वपूर्ण बदल घडले. १९२१ साली जेरुसलेमचे ग्रॅण्ड मुफ्ती अमीन अल-हुसैनी यांनी पदभार सांभाळल्यानंतर लॉजचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीचे प्रयत्न केले. हे बांधकाम करण्यासाठी ग्रॅण्ड मुफ्ती यांनी ब्रिटिश भारतातील मुस्लीम शासक आणि जगभरातील मुस्लीम दानशूरांकडून निधी मागितला.

हे वाचा >> बाबा फरीद यांचा वारसा..

१९२१ साली ग्रॅण्ड मुफ्तींनी भारतीय खिलाफत चळवळीच्या नेत्यांना भारतीय लॉजची दुरुस्ती करण्याची नितांत गरज असल्याचे कळविले. उत्तर प्रदेशच्या सहारणपूरमधील ख्वाजा नझीर हसन अन्सारी या तरुणाने लॉजचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. १९२४ पर्यंत अन्सारी यांनी लॉजच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले; ज्यामुळे पुढची १५ वर्षे ब्रिटिश भारतातील यात्रेकरू आणि कित्येक प्रवाशांना निवारा मिळाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९३९ साली ब्रिटिश भारतातील सैनिकांना उत्तर आफ्रिकेत लढाईला जाण्यासाठी या लॉजचाच आश्रय मिळाला.

स्वतंत्र भारताशी लॉजचा संबंध कसा आला?

भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नाझीर अन्सारी यांनी सदर लॉजची इमारत अधिकृतपणे ताब्यात घेण्यासाठी इजिप्तमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून लॉज आणि भारताचे संबंध याबाबतची माहिती दिली. १९५२ चा क्षेपणास्त्र हल्ला आणि १९६७ मधील सहा दिवसांच्या युद्धकाळात लॉजच्या इमारतीला संघर्षाची झळ बसली. कालांतराने या लॉजच्या इमारतीचा विस्तार सात हजार चौरस मीटर परिसरात फैलावला. संयुक्त राष्ट्रांकडून पॅलेस्टाइन निर्वासितांसाठी राबविण्यात येणाऱ्या बचावात्मक कार्य आणि जेरुसलेम आरोग्य शिबिराचे आयोजन लॉजच्या परिसरात करण्यात आले होते. असे अनेक सामाजिक उपक्रम आणि मानवतेसंबंधीच्या कार्याला लॉजच्या इमारतीने पाठिंबा दिला.

२००० साली याच धर्मशाळेत भारताचे माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह आणि पॅलेस्टाइन नेते फैजल हुसैनी यांची बैठक झाली होती. असा एकही भारतीय राजनैतिक अधिकारी किंवा जेरुसलेमला भेट देणारा भारतीय अधिकारी नाही की, ज्याने या जागेला भेट दिली नसेल.

सध्या १९२८ साली जेरुसलेम येथे जन्मलेले शेख मोहम्मद मुनीर अन्सारी हे या धर्मशाळेचे प्रशासन पाहतात. २०११ साली त्यांना भारत सरकारकडून परदेशस्थ भारतीयांना दिल्या जाणाऱ्या ‘प्रवासी भारतीय’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जेरुसलेम हे जगातील सर्वांत प्रसिद्ध शहर असून, येथे कायमच तणाव असतो. तरीही या धर्मशाळेत दोन ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकत आहे. प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टचे औचित्य साधून मुनीर अन्सारी या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करतात.

या मालमत्तेची मालकी आता भारतीय वक्फ बोर्डाकडे आहे. धर्मशाळेत पाहुण्यांसाठी सहा खोल्या, एक छोटे मशीद, ग्रंथालय, जेवण्यासाठी एक सभागृह व स्वयंपाकगृह अशी विविध दालने आहेत. येथे पाहुण्यांनी जेवण बनविण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंतची कामे स्वतःहून करावीत, यासाठी धर्मशाळेकडून प्रोत्साहन दिले जाते. या धर्मशाळेची देखभाल करीत अन्सारी कुटुंब हजारो किलोमीटर दूरवर भारताचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias 800 year old connection with jerusalem baba farids lodge kvg