India’s first sunken museum at Humayun’s Tomb जुलै महिन्याअखेरीस दिल्लीतील हुमायून जागतिक वारसा स्थळ संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यात एका वस्तूने सर्वांचेच लक्ष वेधले होते. पांढऱ्या शुभ्र संग-ए-मरमर दगडाच्या खुर्चीने. ही खुर्ची होती अखेरचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याची. ३०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघल साम्राज्याचा त्याच्याच काळात अंत झाला. सध्या हे नवीन संग्रहालय निजामुद्दीनमधील दुसरा मुघल शासक हुमायून याच्या कबरीजवळ उभारण्यात आले आहे. ही कबर आणि वस्तुसंग्रहालय ज्या जागेवर उभे आहे, त्या जागेचा इतिहास हा हजारो वर्षे जुना आहे. त्याच इतिहाचा धांडोळा या संग्रहालयाच्या माध्यमातून घेता येणार आहे. केंद्रिय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत या सोहळ्यास उपस्थित होते.
सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत काय म्हणाले?
या संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, ‘आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) यांनी या हेरिटेज वास्तूच्या विकासातून स्थानिक समुदायांची आर्थिक प्रगती कशी साधता येईल याचे नवे उदाहरण घालून दिले आहे. हे संग्रहालय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर एकत्रिक प्रयत्नांचे फलित आहे. यात हुमायूनचा मकबरा, सुंदर नर्सरी आणि निजामुद्दीन बस्ती यांचा समावेश आहे. ही तब्बल १० हजार चौरस फूट जागा ‘सुंदर नर्सरी आणि हुमायूनच्या मकबरा संकुलातील १४ जागतिक वारसा स्मारकांसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करते.
अधिक वाचा: महाभारत खरंच घडले होते का? काय सांगतात पुरातत्त्वीय पुरावे?
खोलवर रुजलेली भारतीय संस्कृती
या जागतिक वारसा स्थळाला हजारो वर्षांचा वारसा आहे आणि याचा संबंध महाभारतातील पांडवांची राजधानी असलेल्या इंद्रप्रस्थ या प्राचीन शहराशी आहे. या संग्रहालयाचा केंद्रबिंदू विशेषत: मुघल आणि हुमायून असताना, या संग्रहालयात ३००० वर्ष जुन्या उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तूही प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. हे अवशेष या स्थळावर हजारो वर्षे राज्य केलेल्या राजवंशाचा इतिहास कथन करतात. शेखावत यांनी दारा शुकोहच्या कुराणाबरोबर त्याने भाषांतरित केलेल्या उपनिषदाच्या पर्शियन आवृत्तीच्या प्रतिमा आणि रामायणाच्या अनुवादासोबत संग्रहालयाच्या भिंतींवर कोरलेल्या रहीमच्या दोहेची चर्चा करून भारताच्या खोलवर रुजलेल्या संस्कृतीवर आपल्या भाषणात प्रकाश टाकला. रहीम आणि दारा शुकोह या दोघांनाही याच भागात दफन करण्यात आले.
संरक्षण आणि जतन
संग्रहालयात मुघल लघुचित्रे, हस्तलिखिते, महत्त्वपूर्ण स्थापत्य रचनेचे अवशेष, नाणी, समकालीन कला, ज्योतिष, अॅस्ट्रो लोब, शिलालेख, काचेच्या वस्तू आणि कापड यासह ५०० हून अधिक यापूर्वी कधीही न पाहिलेल्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. या ठिकाणाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे २७०- अंशातील स्क्रीन असलेली इमर्सिव्ह गॅलरी आहे. ही गॅलरी या जागतिक वारसा स्थळांवर असलेली स्मारके आणि उद्यानांची आभासी टूर घडवते. गॅलरीत हुमायूनच्या कबरीच्या ५०० वर्षांच्या प्रवासावर अॅनिमेटेड दृश्यांकन देखील आहे. २०१३ मध्ये, आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने एकत्र येऊन नुकसान टाळण्यासाठी १,००० मेट्रिक टन काँक्रीट आणि हजारो चौरस मीटर सिमेंट कबरीच्या परिसरातून काढून टाकले. ट्रस्टने या आजूबाजूच्या वास्तूंचेही संरक्षण आणि जतन केले. १४ व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया येथे स्थायिक झाले होते. तेव्हापासून त्यांच्या नावावर असलेल्या या परिसरात वस्ती वाढत आहे. यात समाधी, कबरी, मशिदी, उद्यानं, पायऱ्यांची विहिर, बाजार, सराई आणि प्रवेशद्वार यासह अनेक स्मारकांचे बांधकाम झाले.
विरासत भी.. विकास भी….
शेखावत यांनी ४६ व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विरासत भी, विकास भी” असे म्हटले होते याची आठवण करून दिली. देशाचा सांस्कृतिक वारसा ही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे. ही देशाला ओळख आणि अफाट मूल्य प्रदान करते शेखावत यांनी राष्ट्रीय स्मारके, संग्रहालये, संग्रह आणि संगीत, नृत्य आणि हस्तकला यासारख्या अमूर्त वारशाचे महत्त्व अधोरेखित केले. हा वारसा जतन करणे आणि त्याचे प्रदर्शन करणे ही भारतातील नागरिकांसाठी आणि जगासाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. “भारत वारसा संवर्धनासाठी स्थानिक समुदायांना जोडण्यासाठी वचनबद्ध आहे,” ते म्हणाले.
अधिक वाचा: पांडवांची राजधानी ‘इंद्रप्रस्थ’ खरंच अस्तित्त्वात होती का?
संग्रहालयाच्या एका विभागात, एका मोठ्या स्क्रीनवर ऐतिहासिक मुघल जाळीच्या तुकड्यासह कव्वाली वाजवली जाते असे दाखवण्यात आले आहे. व्हिजिटर्स याला स्पर्श करू शकतात आणि फोटो घेऊ शकतात. जवळच, काचेच्या शो केसमध्ये कोरीवकाम असलेले खंजीर आणि चाकू प्रदर्शित केले आहेत. एका छोट्या भिंतीवर निजामुद्दीन औलियांबद्दल माहिती देण्यात आली आहे.
लोकांचा इतिहास
उद्घाटन समारंभाचा भाग असलेले राजकुमार रहीम आगा खान यांनी निदर्शनास आणून दिले की २००७ पासून आतापर्यंत ६० हून अधिक स्मारके जतन करण्यात आली आहेत. सुंदर नर्सरी २०१८ साली लोकांसाठी खुली करण्यात आली. यामुळे देशाच्या राजधानीच्या प्रचंड लोकसंख्येला निसर्गाचा आनंद घेता आला. आज या स्थळाला दरवर्षी ३० लाखाहून अधिक पर्यटक भेट देतात. “संग्रहालय एक दुवा म्हणून काम करते, केवळ हुमायूनचा मकबरा आणि सुंदर नर्सरीला एकत्र आणत नाही, तर इतिहास आणि वर्तमान काळातील अंतर देखील कमी करते. संग्रहालये आणि ऐतिहासिक खुणा मानवतेची कथा जतन करतात आणि प्रकट करतात,” असे खान म्हणाले. “मूलभूतपणे, ती अशी ठिकाणे आहेत, जी लोकांना एकत्र आणण्याचे काम करतात. कारण आम्ही आमच्या सामूहिक, गुंतागुंतीच्या आणि अधूनमधून विवादित भूतकाळाचा शोध घेतो तसेच एकत्रितपणे चांगले भविष्य कसे घडवू शकतो याचा विचार करतो.”
एकुणात या हुमायून वारसा स्थळ संग्रहालयामुळे सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास जनतेसाठी खुला झाला आहे.