पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुगळी नदीच्या खाली बांधलेल्या बोगद्याचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदा कोलकाता येथे मेट्रो सेवा सुरू झाली होती. आता कोलकाता शहराने पाण्याखालून धावणारी मेट्रो सेवा सुरू करून इतिहास रचला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर देशाच्या पंतप्रधानांनी शाळकरी मुलांसह एस्प्लेनेड ते हावडा मैदानापर्यंत मेट्रो प्रवासाचा आनंदही घेतला. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांसह हा प्रकल्प कसा तयार झाला? याची कल्पना नेमकी कुठून आली? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प
या मेट्रो प्रकल्पात पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरच्या हावडा मैदान ते एस्प्लेनेड विभाग दरम्यान नदीच्या खाली ४९६५ कोटींचा भारतातील पहिला ट्रान्झिट बोगदा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सीएनबीसी-टिव्ही१८ ने दिली आहे. हा पाण्याखालील मेट्रो मार्ग ४.८ किलोमीटर लांबीचा असून हावडा मैदान ते एस्प्लेनेडला जोडेल. या विभागात, हावडा मैदान हे पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत सॉल्ट लेक सेक्टर व्ही शी जोडले जाईल. हावडा आणि सॉल्ट लेक ही शहरे हुगळी नदीच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आहेत.
या विभागात हावडा मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. हे स्टेशन देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (केएमआरसीएल) द्वारे लागू केलेल्या तीन मेट्रो विभागांना रेल्वे मंत्रालयाने ८५७५ कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चास मान्यता दिली होती, अशी माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात देण्यात आली होती. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, या प्रकल्पाद्वारे कोलकाता शहरातील वायू प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करत, स्मार्ट शहर तयार करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
पूर्व-पश्चिम मेट्रोच्या १६.६ किलोमीटरपैकी हावडा मैदान आणि फुलबागन दरम्यान हुगळी नदीच्या खालून जाणारा बोगदा १०.८ किलोमीटरचा आहे. उरलेले अंतर जमिनीच्या वर आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नुसार, हावडा मैदान, हावडा स्टेशन कॉम्प्लेक्स आणि बीबीडी बाग (महाकरण) ही तीन स्थानके पाण्याखालील मेट्रो विभागाचा भाग असतील. या प्रकल्पाची उल्लेखनीय बाब म्हणजे, संपूर्ण मार्गावर १२ स्थानके आहेत. ‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, पाण्याखालील मेट्रोचे तिकीट पहिल्या दोन किलोमीटरसाठी ५ रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता असून अंतरानुसार ते ५० रुपयांपर्यंत असू शकेल.
या मेट्रोचा वेग ८० किलोमीटर प्रति तास असेल आणि हुगळी नदीखालील अर्धा किलोमीटरचा पल्ला सुमारे ४५ सेकंदात पार करेल. कोलकाता मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक उदय कुमार रेड्डी यांनी ‘एएनआय’ला सांगितले की, दररोज सात लाख प्रवाशी या सेवेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. सीएनबीसी-टिव्ही१८ नुसार, एप्रिल २०२३ मध्ये, कोलकाता मेट्रोने देशात प्रथमच ट्रायल म्हणून हुगळी नदीच्या खालील बोगद्यात ट्रेन चालवून इतिहास रचला होता. तरातला-माजेरहाट मेट्रो लिंक आणि कवी सुभाष-हेमंता मुखोपाध्याय मेट्रो लिंक हे या मेट्रो प्रकल्पाचे इतर दोन विभाग आहेत. सरकारचा दावा आहे की, या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि लोकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित होईल.
प्रकल्पाशी निगडीत तांत्रिक बाबी
हुगळी नदीच्या खाली असलेल्या बोगद्याचा व्यास बाहेरून ६.१ मीटर असून आतील बाजूने ५.५५ मीटर आहे, अशी माहिती ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिली आहे. या प्रकल्पात पाण्याची प्रवेश क्षमता कमी करण्यासाठी फ्लाय ॲश आणि मायक्रो सिलिका-आधारित काँक्रीट मिश्रणाचा वापर करण्यात आला आहे. अंतर्गत भिंती प्रीमियम एम५०-ग्रेड प्रबलित काँक्रीटने तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाची जाडी २७५ मिलीमीटर आहे, असे प्रकल्पातील अभियंत्यांनी सांगितले आहे. एप्रिल ते जून २०१७ दरम्यान, दोन जर्मन टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) ६६ दिवसांत याचे खोदकाम पूर्ण करण्यात आले होते.
पाण्याखालील बोगद्याची कल्पना
‘सीएनबीसी-टिव्ही१८’ नुसार, लंडनमध्ये पाण्याखलील ट्रान्झिट सिस्टमची कल्पना ब्रिटिशांनी १९२१ साली मांडली होती, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कोलकाता आणि हावडा यांना जोडणारी महत्त्वाकांक्षी १०.६ किलोमीटरची भूमिगत रेल्वे तयार करण्याची कल्पना ब्रिटिश अभियंता हार्ले डलरेंपल यांची होती, असे ‘बीबीसी’च्या वृत्तात म्हटले आहे. १० स्थानके आणि हुगळी नदीच्या खाली एक बोगदा त्यांच्याच कल्पनेचा भाग होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे आणि शहरातील मातीच्या गुणवत्तेबद्दलच्या चिंतेमुळे हा प्रकल्प कधीच पूर्ण झाला नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.
“मातीच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम न मिळाल्याने ही कल्पना सत्यात उतरली नाही. अखेर प्रकल्पाची योजना रद्द करण्यात आली,” असे आयआयएम-कोलकाताचे सहयोगी प्राध्यापक अलोक कुमार यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. त्यानंतर १९२८ मध्ये, शहराची ऊर्जा पुरवठा कंपनी कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन (सीईएससी) ने हुगळी नदीच्या खाली पॉवर केबल बोगदा बांधण्यासाठी हार्लेशी संपर्क साधला. बातम्यांनुसार, त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि १९३१ मध्ये हावडा आणि कोलकाता दरम्यान विजेच्या तारा जोडणारा कोलकातामधील पहिला पाण्याखालील बोगदा तयार झाला.
कोलकात्यात देशातील पहिली मेट्रो
भारतात पहिली मेट्रो सेवा सुरू करण्याचा मान कोलकाता मेट्रोच्या नावावर आहे. कोलकाता मेट्रो, भारतातील पहिली आणि आशियातील पाचवी मेट्रो प्रणाली आहे, असे ‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये सांगण्यात आले. २४ ऑक्टोबर १९८४ साली एस्प्लेनेड ते नेताजी भवन दरम्यान पाच स्थानकांसह ही सेवा सुरू करण्यात आली होती; ज्याचे अंतर ३.४० किलोमीटर होते.