भारतात वाहतुकीच्या साधनांमध्येही अत्याधुनिक प्रगती होताना दिसत आहे. सध्या भारतात हायपरलूप ट्रॅकची चर्चा सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीदेखील याविषयीचे एक ट्विट केले आहे. तमिळनाडूतील चेन्नईमध्ये ४१० मीटर लांबीचा हायपरलूप चाचणी ट्रॅक पूर्ण झाला आहे. त्यामुळे भारत आपल्या हायपरलूपच्या स्वप्नांच्या एक पाऊल जवळ पोहोचला आहे. थायूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये स्थित हा ट्रॅक देशाच्या हाय-स्पीड वाहतूक उद्दिष्टांमध्ये प्रगती दर्शवतो. गुरुवारी (५ डिसेंबर) ‘एक्स’वर हायपरलूप चाचणी ट्रॅकचा व्हिडीओ शेअर करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिले, “भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक (४१० मीटर) पूर्ण झाला.” या प्रकल्पासाठी त्यांनी भारतीय रेल्वे, आयआयटी-मद्रासची हायपरलूप टीम आणि TuTr Hyperloop या आयआयटी मद्रासच्या सखोल तंत्रज्ञान स्टार्टअपचे अभिनंदन केले. हायपरलूप तंत्रज्ञान म्हणजे काय? त्याचा भारताला कसा फायदा होणार? जाणून घेऊ.
हायपरलूप म्हणजे काय?
हायपरलूप ही एक हाय-स्पीड वाहतूक व्यवस्था आहे, जी प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करू शकते. ‘ZDNET’च्या लेखानुसार, ग्राउंड ट्रान्स्पोर्टचा हा नवीन प्रकार आहे. त्यामध्ये व्हॅक्युम ट्यूबमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हीटेटिंग पॉडचा समावेश असतो. विद्युत चुंबकीय पद्धतीने हे पॉडस पुढे सरकतात. याचा वेग ७०० मैल प्रतितास (सुमारे १,१२७ किलोमीटर/तास) वेगाने प्रवास करता येऊ शकतो. वाहतुकीच्या या प्रकारात विमानाच्या दुप्पट वेगाने निर्धारित ठिकाणी पोहोचता येते.
हेही वाचा : ‘हा’ देश होणार जगाच्या नकाशातून नामशेष? एलॉन मस्क यांचा दावा; कारण काय?
घर्षण कमी करण्यासाठी या ट्यूबमधून बहुतेक हवा काढून टाकली जात असल्याने, या कॅप्सूलमधून ताशी १,२०७ किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो. हायपरलूपचा ट्रॅक जमिनीच्या वर किंवा खाली बांधला जाऊ शकतो. त्यामध्ये पॉड्स असतात, जे एअर स्कीवर तरंगतात आणि घर्षण कमी करण्यासाठी चुंबकीय उत्सर्जन (मॅग्लेव्ह) तंत्रज्ञान वापरतात, असे ‘ZDNET’ अहवालात म्हटले आहे. मॅग्लेव्ह ट्रेन ट्रॅकच्या वर तरंगण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतात, ज्या चीन, जपान व दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये आधीच कार्यरत आहेत.
हायपरलूपची संकल्पना आली कुठून?
हायपरलूपची मूळ संकल्पना अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. २०१३ मध्ये ‘स्पेस एक्स’चे संस्थापक व टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी हाय-स्पीड वाहतूक प्रणालीवर एक पत्र जारी केले, ज्यामुळे पुन्हा हायपरलूप तंत्रज्ञानाची चर्चा सुरू झाली. त्यांनी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोदरम्यान वाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. हाय-स्पीड रेल्वे लिंक स्वस्त आणि वेगवान असेल, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले. या कल्पनेवर आधारित, हायपरलूपचे स्वप्न साकार करण्यासाठी २०१४ मध्ये ‘हायपरलूप वन’ची स्थापना करण्यात आली.
मात्र, व्हर्जिनचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचे पाठबळ मिळालेली ही कंपनी गेल्या वर्षी बंद करावी लागली. अभियांत्रिकी आव्हाने आणि त्याच्या व्यवहार्यतेबद्दलच्या चिंतेमुळे हा प्रकल्प अडचणीत आला. अनेक आव्हाने असूनही, हायपरलूप या संकल्पनेने भारतासह जगाच्या इतर भागांमध्ये रस निर्माण केला आहे. सप्टेंबरमध्ये नेदरलँड-आधारित हायपरलूप कंपनी हार्डटने विंडम येथील युरोपियन हायपरलूप सेंटरमध्ये वाहनाच्या पहिल्या यशस्वी चाचणीचा अहवाल दिला. मस्कची स्वतःची कंपनी द बोरिंग कंपनी भूमिगत बोगद्यांचा वापर करून, हायपरलूप तंत्रज्ञानावरही संशोधन करीत आहे.
भारतातील हायपरलूप प्रकल्प
चेन्नईतील हायपरलूप चाचणी ट्रॅक पूर्ण करणे हे भारतासाठी एक मोठे पाऊल आहे. हे दर्शविते की, हाय-स्पीड वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रवासाचे भविष्य सुधारू शकते. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, आयआयटी मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमधील ४१० मीटर हायपरलूप चाचणी ट्रॅकवर प्रथम १०० किलोमीटर प्रतितास वेगाने तंत्रज्ञानाची चाचणी केली जाईल. यानंतर, लांब ट्रॅकवर ६०० किलोमीटर प्रतितास वेगाने चाचणी केली जाईल. “आम्ही या तंत्रज्ञानाचे वास्तविक जगातील परिणाम आधीच ओळखले आहेत. हायपरलूप तंत्रज्ञानाच्या योग्य घटकांसह विकसित केलेल्या हाय-स्पीड कॉरिडॉरसह विद्यमान मेट्रो रेल्वे नेटवर्क वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे,” असे TuTr Hyperloop चे संस्थापक संचालक डॉ. अरविंद एस. भारद्वाज यांनी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
“परंतु, स्पर्धात्मक खर्चात ते विकसित करणे महत्त्वाचे आव्हान आहे. जर आम्ही १५ मिनिटांत ६० किलोमीटर अंतर पार करू शकलो, तर आमच्याकडे एक तंत्रज्ञान उपाय असेल; जो सामाजिक गरज पूर्ण करेल. हा पॉड एका हाय-स्पीड कॉरिडॉरमध्ये ३० ते ४० प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसप्रमाणे असू शकतो,” असे ते पुढे म्हणाले. हायपरलूप प्रवासामुळे आपण प्रवास करण्याचा मार्ग बदलू शकतो. हायपरलूप प्रत्यक्षात आल्यास मेट्रो रेल्वेच्या जाळ्याला पूरक ठरू शकेल आणि गर्दीही कमी करू शकेल. ‘अल जझीरा’शी बोलताना, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कॉम्प्युटिंग आणि सायबरनेटिक्सचे सहयोगी प्राध्यापक, जोनाथन कौल्डरिक म्हणाले की, कार्यरत हायपरलूप शहरी वाहतुकीत खूप सुधारणा करू शकते.
हेही वाचा : आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
“जर तुमच्याकडे मोठ्या भूभागावर दोन लोकसंख्या केंद्रे असतील; ज्यांना तुम्हाला जोडणे आवश्यक आहे, तर बिंदू अ ते बिंदू बपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वांत जलद मार्ग असू शकतो. मोठमोठ्या शहरात लोक दररोज दोन तास किंवा त्याहूनही अधिक प्रवास करतात. परंतु, या सुविधेमुळे शहराबाहेरील लोकसंख्या विकासासही चालना मिळेल,” असेही ते म्हणाले. देशातील पहिली हायपरलूप ट्रेन ही मुंबई ते पुणेदरम्यान धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई ते पुणे प्रवास केवळ २५ मिनिटांत पूर्ण करता येईल.