Terrorists killed in Pakistan : दुसर्‍याचं घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचं स्वत:चं घर त्याच आगीत जळून खाक व्हावं, अशी सध्या पाकिस्तानची स्थिती झाली आहे. भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारा हा देश त्याच दहशतवादाच्या छायेत सापडला आहे. आधीच बलुचिस्तानातील बंडखोरांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले आहेत, त्यात देशात शरणार्थी असलेल्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा कुणीतरी सपाटाच लावला आहे. भारतातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या पाकिस्तानात एकपाठोपाठ एक हत्या होत आहेत. गेल्या दोन वर्षांत अनोळखी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात ११ दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामुळे भारताच्या शत्रूंना पाकिस्तानातून यमसदनी कोण पाठवतंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत?
जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं दहशतवाद्यांना पाठवून हिंसा करणार्‍या पाकिस्तानला आता दहशतवादाच्या ज्वाळांनी घेरलेलं आहे. मागील दोन वर्षांत पाकमध्ये बॉम्बस्फोटाच्या कित्येक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे चीन सोडून दुसरा कोणताही देश पाकिस्तानबद्दल सहानुभूती दाखवताना दिसून येत नाही. भारतानं आजवर कोणत्याही हिंसक कारवायांचं कधीही समर्थन केलेलं नाही. त्याचबरोबर अशा संघटनांना मदतही केलेली नाही; पण स्वत:च्याच नाकर्तेपणामुळे पाकिस्तानात फोफावलेल्या दहशतवादाचं खापर पाकिस्तान भारतावर फोडू पाहत आहे. अर्थातच भारतीय परराष्ट्र मंत्रालयानंही पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे. दरम्यान, पाकिस्तानात किती दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या ते जाणून घेऊ.

आणखी वाचा : पंजाबमधील मंदिरं आयएसआयच्या निशाण्यावर? ग्रेनेड हल्ला कुणी केला? पोलिसांनी काय सांगितलं?

अबू कतालची हत्या कुणी केली?

दहशतवादी प्रशिक्षण तळ उभे करणार्‍या पाकला सर्जिकल स्ट्राईक करून भारतानं चांगलीच अद्दल घडवली; पण दहशतवादी प्रवृत्तींना पोसणार्‍या पाकलाच आता ठिकठिकाणी दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. १६ मार्च रोजी पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक वरिष्ठ कमांडर अबू कताल याची अनोळखी व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कतालचा ताफा दिना पंजाब विद्यापीठाशेजारी असलेल्या झीनत हॉटेलजवळून जात होता. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर १५ ते २० राउंड गोळ्या झाडल्या.

४३ वर्षीय कताल हा मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा पुतण्या होता. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात त्याची भूमिका होती. ९ जून २०२४ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंच्या बसवर दशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला; तर ४१ जण जखमी झाले होते. कताल हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. त्याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आरोपपत्र दाखल केलेलं होतं.

शेख जमील-उर-रहमानची हत्या

गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा परिसरात शेख जमील-उर-रहमान यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्याची हत्या नेमकी कुणी केली याचा सुगावा पाकिस्तानी पोलिसांना आजवर लावता आलेला नाही. ऑक्टोबर २०२२ मध्ये भारतानं त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. अधिकाऱ्यांच्या मते, रहमान मूळचा पुलवामाचा रहिवासी होता; परंतु काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणल्यानंतर तो पाकिस्तानात स्थलांतरित झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २०१८ मध्ये, रहमाननं काश्मिरी विद्यार्थ्यांना ते
सुरक्षा दलांकडून मारले जाऊ नयेत म्हणून योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतरच शस्त्रं उचलण्यास सांगितलं होतं.

शाहीद लतीफ याची हत्या

कताल आणि रहमान यांच्याआधी, ऑक्टोबर २०२३ मध्ये पठाणकोट हल्ल्यामागील सूत्रधार व भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक मानला जाणारा जैश-ए-मोहम्मदचा सदस्य शाहीद लतीफ याचीही पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये अनोळखी व्यक्तींनी हत्या केली. शाहीद हा नमाज पठण करून मशिदीबाहेर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तीन बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या होत्या. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, ४३ वर्षीय लतीफनं १९९४ ते २०१० पर्यंत जम्मूच्या तुरुंगात असताना एक व्यापक नेटवर्क तयार केलं. भारतात शिक्षा भोगल्यानंतर तो जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील झाला. त्यानंतर भारत सरकारनं त्याला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं.

दाऊद मलिकची गोळ्या झाडून हत्या

लतीफच्या हत्येनंतर काही दिवसांनी, पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये दाऊद मलिक या दहशतवाद्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो भारतातील वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा सहकारी म्हणून ओळखला जायचा. मलिकनं पाकिस्तानात लष्कर-ए-जब्बार या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती. ही एक गुप्त धार्मिक दहशतवादी संघटना आहे, ज्याला लष्कर-ए-झांगवी असेही म्हणतात. या संघटनेनं २०१६ मध्ये बलुचिस्तानमधील क्वेटा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या हल्ल्यासह अनेक हल्ले केल्याचं सांगितलं जातं. त्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

झियाउर रहमानची गोळ्या झाडून हत्या

झियाउर रहमान हा पाकिस्तानातील तरुणांना शस्त्रं उचलण्यासाठी आणि भारताविरुद्ध जिहाद करण्यासाठी कट्टरपंथी संघटनेत सहभागी करायचा. २९ सप्टेंबर २०२३ रोजी पाकिस्तानातील कराची येथे दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. या हत्येनंतर‌पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा देशी अतिरेक्यांनी केलेला हल्ला होता. या घटनेनंतर पाकिस्ताननं भारतावरही बोट उठवलं होतं. परंतु, भारतानं या गोष्टीचं खंडन केलं.

अबू कासिम काश्मिरी याची गोळ्या झाडून हत्या

सप्टेंबर २०२३ मध्ये अबू कासिम काश्मिरी याची अनोळखी हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानी पोलिसांच्या माहितीनुसार, अबू कासिम हा रावळकोट परिसरात नमाज पठण करत होता. त्यावेळी अनोळखी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. मूळ जम्मूचा रहिवासी असलेला काश्मिरी हा राजौरी जिल्ह्यातील धांगरी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं जातं. या हल्ल्यात सात जण ठार आणि १३ जण जखमी झाले होते. काही भारतीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, काश्मिरी हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता; तर काहींच्या मते त्याचे जमात-उद-दावाशी संबंध होते.

सरदार हुसेन अरैन अनोळखी व्यक्तींच्या हल्ल्यात ठार

१ ऑगस्ट २०२३ रोजी सरदार हुसेन अरैन याची पाकिस्तानच्या सिंधमधील शहीद बेनझिराबाद जिल्ह्यातील अनोळखी हल्लेखोरांनी हत्या केली. तो हाफिज सईदचा अतिशय जवळचा सहकारी मानला जात होता. सिद्धूदेश रिव्होल्युशनरी आर्मीने त्याच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. अरैन हा जमात उद दावा मदरसा येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता.

परमजीत सिंग पंजवारची कुणी केली हत्या?

२०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या गूढ हत्या वाढतच गेल्या. मे महिन्यात लाहोरमध्ये दोन अनोळखी बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवार याची गोळ्या घालून हत्या केली. परमजीत सिंग पंजवार याच्या खलिस्तान कमांडो फोर्स या संघटनेवर सरकारने बंदी घातली होती. मित्रांबरोबर फिरत दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून परमजीतच्या शरीराची अक्षरश: चाळणी केली. पंजाब पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परमजीत सिंगने १९८८ मध्ये निवृत्त मेजर-जनरल बीएन कुमार यांची हत्या केली होती. तसेच १९८९ मध्ये त्याने पटियालाच्या थापर अभियांत्रिकी महाविद्यालयात १९ विद्यार्थ्यांना क्रूरतेनं संपवलं होतं. १९८९ मध्ये बटाला येथील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधीक्षकांचा मुलगा राजन बैंस याचे अपहरण आणि त्याची हत्या केल्याचा आरोपही परमजीत सिंग याच्यावर होता.

हेही वाचा : Ranjani Srinivasan : स्वतःच कायदेशीर हद्दपार होणं म्हणजे काय? अमेरिकेतून बाहेर पडलेल्या रंजनी श्रीनिवासनची का होतेय चर्चा?

बशीर अहमद पीर गोळीबारात ठार

फेब्रुवारी २०२३ मध्ये बशीर अहमद पीर या दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये अनोळखी हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याचा जवळचा साथीदार होता. सूत्रांच्या माहितीनुसार, बशीर हा नमाज पठण करून परतत असताना रावळपिंडीतील एका दुकानाबाहेर हल्लेखोरांनी त्याला गोळ्या झाडून ठार केलं. बशीर हा नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारतात पाठवत होता. त्याच्या मृत्यूनंतर दोन आठवड्यांनी एनआयएने त्याची जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा येथील मालमत्ता जप्त केली.

दहशतवादी सय्यद खालीद रझाचा खात्मा

बशीरच्या हत्येनंतर पुढच्याच आठवड्यात अनोळखी हल्लेखोरांनी सय्यद खालीद रझा याला यमसदनी धाडलं. पाकिस्तानच्या कराची बंदर शहरात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सय्यद खालीद याचा जागीच मृत्यू झाला. भारतानं ऑक्टोबर २०२२ मध्ये सय्यदला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. कुपवाडामधील घुसखोरी आणि जम्मू-काश्मीरमध्ये दशतवादी कारवाया केल्याप्रकरणी गुप्तचर यंत्रणांनी त्याचं वर्णन हिजबुल मुजाहिदीनचा लाँचिंग कमांडर, असं केलं होतं.

मार्च २०२२ मध्ये झहूर मिस्रीची हत्या

८ मार्च २०२२ मध्ये दहशतवादी झहूर मिस्री याची पाकिस्तानातील कराची येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून जहूर मिस्रीवर गोळ्या झाडल्या. जहूर मिस्री हा जैशचा दहशतवादी होता आणि कराचीमध्ये व्यापाऱ्याची छुपी ओळख घेऊन राहत होता. २४ डिसेंबर १९९९ रोजी भारतीय एअरलाइन्सच्या IC 814 विमानाचे नेपाळमधून पाच अपहरणकर्त्यांनी अपहरण केले होते. या अपहरणात जहूर मिस्री हादेखील सहभागी होता. हे विमान अमृतसर, लाहोर व दुबई नेण्यात आले. त्यानंतर शेवटचा मुक्काम म्हणून ते अफगाणिस्तानातील कंधार येथे उतरवण्यात आले. त्या काळात अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा होता. विमानातील ओलिसांना सोडविण्यासाठी भारताने दहशतवादी मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख व मुश्ताक अहमद जरगर यांची सुटका केली होती.

Story img Loader