इंडिगो एअरलाईन कंपनीने आपल्या शांतनू नावाच्या प्रवाशाकडून एक भलतेच शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. इंडिगो एअरलाईनच्या प्रवाशाने सोशल मीडियावर एक पावती शेअर केली होती. त्यामध्ये कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले होते. विमान भाडे शुल्क, आसन शुल्क, सुविधा शुल्क, विमानतळ सुरक्षा शुल्क, वापरकर्ता विकास शुल्क. मात्र, या सोबत क्युट (CUTE) नावाचे शुल्कही आकारण्यात आले होते. आता हे क्युट नावाचा शुल्क नेमके आहे तरी काय?
शंतनू यांनी ट्वीटरवर या शुल्काची पावती शेअर केली आहे. ‘मला माहित आहे की मी वयानुसार अधिकाधिक गोंडस होत चाललो आहे. पण मी कधीच विचार केला नाही की इंडिगो कंपनीचे लोक यासाठी माझ्याकडून पैसे घेतील’. अशा आशयाचे कॅप्शनही शंतनू यांनी दिले आहे. शंतनूच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत. संजीव नावाच्या व्यक्तीने कमेंट केली आहे, मला माहित आहे, की मी काळाच्या खूप पुढे आहे पण यावेळी मी ९ वर्षांनी पुढे गेलो आहे. ९ वर्षांपूर्वी माझ्यासोबतही असंच काहीसं झालं असल्याचे संजीव म्हणाले.
CUTE चार्ज म्हणजे काय?
या शुल्काचे पूर्ण स्वरूप ‘कॉमन युजर टर्मिनल इक्विपमेंट’ आहे. विमानतळावर उपस्थित असलेल्या मेटल डिटेटिंग मशीन, एस्केलेटर आणि इतर उपकरणे वापरण्यासाठी हे शुल्क आकारले जाते. मात्र, लोक सध्या या शुल्काचा वेगळाच अर्थ काढून मजा घेताना दिसत आहेत.