Indira and Feroze Gandhi love story इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व. आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर तत्कालीन राजकीय नेतृत्व करणाऱ्या पुरुषांना ज्या गोष्टी जमल्या नाहीत त्या या ‘आयर्न लेडी’ने करून दाखवल्या. बाहेरून ही आयर्न लेडी कणखर असली तरी ती तितकीच भावनाप्रधान होती. प्रेम, राग, लोभ अशा सर्वच भावना तिच्या आयुष्याचा भाग होत्या. तिच्याही आयुष्यात नाजूक वळणावर प्रेमाने साद घातली होती आणि इंदिरा-फिरोज या प्रेमकथेने जन्म घेतला. फिरोज या नावाचा अर्थ विजयी… एकूणच भारतीय राजकारणावर विजय मिळविणाऱ्या इंदिरेच्या हृदयावर ज्याने विजय मिळविला तो म्हणजे ‘फिरोज’. आज १९ नोव्हेंबर, इंदिरा गांधी यांची जयंती, त्याच निमित्ताने इंदिराजींच्या आयुष्यातील त्या अलवार क्षणांविषयी जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.
भारतीय प्रेमकथा
फिरोज गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची एकुलती एक मुलगी असलेली इंदिरा यांच्या प्रेमकथेने भारतीय समाजात प्रेमकथेला सामना करावा लागणाऱ्या सर्व अडचणींचा सामना केला होता. त्यांच्या प्रेमकथेतील पहिला अडथळा होता धर्म. फिरोज गांधी पारशी तर इंदिरा गांधी हिंदू पंडित होत्या, त्यामुळे साहजिकच विरोध हा अटळ होता.
आई ठरली कारणीभूत
इंदिरा अवघ्या १६ वर्षांच्या आणि फिरोज २१ वर्षांच्या असताना त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. फिरोज हे इंदिराजींच्या आई कमला नेहरू यांचे निकटवर्तीय होते. १९३० मध्ये कमला नेहरू त्यांच्या साथीदारांसह इविंग ख्रिश्चन कॉलेजच्या बाहेर इंग्रजांच्या विरोधात निदर्शने करत असताना सूर्याच्या उष्णतेमुळे बेशुद्ध पडल्या आणि त्याच वेळी फिरोज त्यांना मदत करायला गेले. फिरोज यांच्यावर कमला यांच्या देशभक्तीचा इतका प्रभाव पडला की त्यांनी आपले शिक्षण सोडून काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगावा लागला. १९३२-३३ मध्ये त्यांनी नेहरूंबरोबरही काम केले. याच वर्षांमध्ये फिरोजची भेट अतिशय सभ्य आणि तरुण मुलगी असलेल्या इंदिराशी झाली. कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. १९३३ मध्ये त्यांनी इंदिराजींना पहिल्यांदा मागणी घातली. पण इंदिरा आणि त्यांच्या आईने वय आणि त्यांचा धर्म यांचा हवाला देऊन नकार दिला. दरम्यान, फिरोज यांची नेहरू कुटुंबाशी, विशेषत: कमला नेहरूंशी जवळीक वाढली. १९३५ सालच्या एप्रिल महिन्यात कमला यांची प्रकृती बिघडली. फिरोजने त्यांची विशेष काळजी घेतली परंतु दुर्दैवाने २८ फेब्रुवारी १९३६ रोजी कमला यांचा मृत्यू झाला त्या वेळी फिरोज हे त्यांच्या शेजारी पलंगावर बसलेले होते. इंदिराजींच्या आईवर इंग्लंडमध्ये उपचारादरम्यान या तरुण जोडप्यामधील प्रेम वाढीस लागले.
भारतीय प्रेमकथेतील खलनायक
या जोडप्यातील प्रेम बहरत असले तरी भारताच्या राजकारणात उंची गाठू पाहणाऱ्या नेहरूंना हे प्रेम मान्य नव्हते मात्र, नेहरूंच्या तीव्र विरोधानंतरही या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही प्रेमकथा संपवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून नेहरूंनी हे प्रकरण महात्मा गांधींकडेही नेले. तरी या बंडखोर जोडप्याच्या प्रेमाने हार मानली नाही, २६ मार्च १९४२ रोजी हिंदू रितिरिवाजांनुसार लग्न पार पडले. सुरुवातीच्या कालखंडात त्यांचा संसार सुखाचा होता. त्यांनी मिळून ब्रिटिशांविरुद्धचा लढा पुढे नेला. ऑगस्ट १९४२ मध्ये या जोडप्याला अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतरच्या ५ वर्षांत या जोडप्याने घरगुती जीवनाचा आनंद लुटला. याच कालखंडात राजीव गांधी आणि संजय गांधी या दोन पुत्र रत्नांचा जन्मही झाला.
आणखी वाचा: इस्रायल-हमास युद्ध: आजच्या जगण्यासाठी बॉम्ब शेल्टर्स का महत्त्वाचे ठरत आहेत?
वाटा वेगळ्या झाल्या
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि फिरोज यांनी वेगळी राजकीय बाजू निवडली. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत फिरोज यांनी नेहरू सरकारच्या भ्रष्टाचारग्रस्त धोरणांविरोधात लिखाण सुरू केले. इतकेच नाही तर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला. किंबहुना फिरोज गांधींच्याच पुढाकाराने भारतीय वृत्तपत्रांचा संसदीय अधिवेशनांच्या वृत्तांकनाचा कायदा अस्तित्त्वात आला, जो आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी रद्द केला होता. पंतप्रधान नेहरूंविरुद्धच्या त्यांच्या धाडसी दृष्टिकोनामुळे इंदिरा आणि फिरोज यांच्या नात्यात अस्वस्थता निर्माण झाली. नेहरू आणि फिरोज यांच्यातील दुरावा वाढत असताना इंदिराजी दिल्लीत आपल्या वडिलांच्या घरी गेल्या. त्यामुळेच या प्रेमी युगुलाच्या नात्यात कायमस्वरूपी दरी निर्माण झाली.
१९५८ मध्ये फिरोज गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला, त्या वेळेस मात्र त्यांची काळजी घेण्यासाठी इंदिरा परत आल्या. १९६० मध्ये, दिल्लीच्या विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये दुसरा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर इंदिरा राजकारणात सक्रिय झाल्या आणि नंतरच्या कालक्रमात त्या भारताच्या पंतप्रधानही झाल्या…