भारताच्या राजकारणात इंदिरा गांधी हे असे नाव आहे, ज्याला अनेक रुपं आहेत. हे नाव कधी मुलांची काळजी करणाऱ्या आईच्या रुपात येतं, तर कधी देशाचे नेतृत्व करणाऱ्या कणखर ‘आयर्न लेडी’ म्हणून इंदिरा गांधी हे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीत अणूचाचणी, भारत-पाक युद्ध, ऑपरेशन ब्लू स्टार अशा अनेक घटना आहेत, ज्यांचा उल्लेख आजही केला जातो. मात्र, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. मात्र, आजही त्यांच्या कामाचा उल्लेख वारंवार होतो. हत्या झाली, त्याच्या एक दिवस आधी इंदिरा गांधी यांनी ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे बोलताना मृत्यूसंदर्भात भाष्य केले होते. याच काळात त्यांची नातवंडं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी याच्या कारला अपघात झाला होता. याच पार्श्वभूमीवर हत्येच्या पाच दिवस अगोदर इंदिरा गांधी यांनी काय केले? त्यांनी कोठे भेटी दिल्या? तसेच मृत्यूबाबत बोलताना त्या नेमके काय म्हणाल्या होत्या? यावर टाकलेली नजर

अचानक ठरला काश्मीर दौरा

लेखिका पुपुल जयकर यांनी ‘इंदिरा गांधी’ या पुस्तकात हत्या होण्यापूर्वी इंदिरा गांधींनी पाच दिवस काय केले? याबाबत लिहिलेले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केलेला आहे. २६ ऑक्टोबर रोजी पुपुल जयकर इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. यावेळी इंदिरा गांधी आणि पुपुल जयकर यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी २७ ऑक्टोबर रोजी श्रीनगरला जाण्याचे ठरवले होते. त्यांच्या या दौऱ्याचे कोणतेही नियोजन नव्हते. याच श्रीनगर भेटीबद्दल इंदिरा यांनी पुपुल जयकर यांना सांगितले होते. इंदिरा गांधी यांचे मुख्य सचिव पी. सी. अलेक्झांडर यांनीदेखील आपल्या ‘इंदिरा अंतिम पर्व’ या पुस्तकात या दौऱ्याबाबत लिहिलेले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केलेला आहे. ‘इंदिरा गांधी यांनी २७ ऑक्टोबरला भेट देण्याचं अचानक ठरवलं. २९ ऑक्टोबरला त्या ओडिशाला भेट देणार होत्या. त्याआधी काश्मीरला जाण्याचं काही ठरलं नव्हतं,’ असं अलेक्झांडर यांनी आपल्या पुस्तकात म्हटलेलं आहे. तर पुपुल जयकर आपल्या ‘इंदिरा गांधी’ या पुस्तकात म्हणतात की, ‘इंदिरा गांधी यांच्या श्रीनगर भेटीला राज्यपाल जगमोहन यांचा विरोध होता. श्रीनगरमध्ये सध्या अशांत वातावरण आहे, तेव्हा त्यांनी धोका पत्करू नये, असे त्यांचे म्हणणे होते.’

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
alibag Adv Aswad Patil resigned from post of district secretary of Shekap
अॅड. आस्‍वाद पाटील यांचा अखेर राजीनामा
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

“माझी रक्षा हिमालयात विखरून टाका”

पुपुल जयकर आणि इंदिरा गांधी यांच्यात झालेल्या पुढील संवादात इंदिरा गांधी यांनी मृत्यूवर भाष्य केले. ‘पुपुल, बिजबिहार येथील तो पुरातन चिनार वृक्ष तुला आठवतो का? तो नुकताच मरण पावला, असं मी ऐकलं. असं ती (इंदिरा गांधी) म्हणाली. एखाद्या जुन्या मित्राबद्दल बोलावं तसं ती बोलत होती. मला पुन्हा वाटायला लागलं आहे की, आपण इथं कशासाठी आहोत. इथे आपण आता खूप काळ राहिलो, असं मला वाटतं, असंही ती म्हणाली. अशा मूडमध्ये मी तिला क्वचितच पाहात होते. तिचे विचार मृत्यूभोवती घुटमळत होते. ती म्हणाली, पापूंना नद्या आवडत असत. पण, मी तर पर्वातांची कन्या आहे. मला कशाचाही चिंता वाटत नाही. मी माझ्या मुलांना सांगितलं की, माझ्या मृत्यूनंतर माझी रक्षा हिमालयात विखरून टाका. तिचा हा शेरा विचित्रच होता,’ असे पुपुल जयकर यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलेले आहे.

“माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब…”

ठरल्याप्रमाणे २७ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी काश्मीरला गेल्या. तेथे त्या पोलिसांना पूर्वसूचना न देताच श्रीनगरमधील बाजारात गेल्या. बाजारात गेल्यानंतर त्यांच्या भोवती गर्दी कशी जमली, लोकांना आनंद कसा झाला, याचं वर्णन इंदिरा गांधी करत होत्या, असा उल्लेख ‘इंदिरा अंतिम पर्व’ या पुस्तकात आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांनी हरिपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सुफी संत हजरत-सुलनात अर-अ-सिन यांच्या कबरीला भेट दिली. पुढे २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच इंदिरा गांधी भुवनेश्वरला गेल्या. हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांनी तेथील ग्रामीण भागाला भेट दिली. ओडिशा राज्यातील एका सभेत बोलताना त्यांनी मृत्यूसंदर्भात भाष्य केले होते. “मी जिवंत राहीन की नाही याची मला पर्वा नाही. मी उदंड आयुष्य जगले. हे आयुष्य मी सेवा करत घालवलं याचा मला अभिमान वाटतो. मी अखेरच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करत राहीन. माझ्या मृत्यूनंतरही माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला संजीवनी देत राहील, सामर्थ्य देईल”, असे इंदिरा गांधी म्हणाल्याचा उल्लेख पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी या पुस्तकात केला आहे.

राहुल आणि प्रियांका गांधी यांचा अपघात

इंदिरा गांधी ३० ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशा राज्यात होत्या, त्यावेळी दिल्लीत त्यांची नातवंडं प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या कारचा किरकोळ अपघात झाला होता. त्यांच्या कारला दुसरी एक कार आदळली होती. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, अपघातानंतर प्रियांका आणि राहुल गांधी यांची गाडी घरी परत घेऊन जाण्याचा आदेश देण्यात आला होता.

अन् घात झाला…

इंदिरा गांधी दिल्लीत परतल्यानंतर या अपघाताबद्दल त्यांना सांगण्यात आले होते. ‘इंदिरा गांधी यांना त्यांच्या नातवंडांची खूप काळजी वाटत होती. त्यांना दुखापत केली जाईल आणि त्यांचे अपहरण होईल, अशी तिला सतत भीती वाटे. जून महिन्यापासून या भीतीने तिच्या मनात घर केले होते’, असे लेखिका पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधी या पुस्तकात नमूद केलेले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी त्या नियोजनानुसार काम करणार होत्या. त्यासाठी त्या सकाळीच उठल्या होत्या. या दिवशी त्या सकाळी साडे आठ वाजेपर्यंत तयार झाल्या. सकाळीच पीटर उस्तिनाव्ह हे पत्रकार त्यांची मुलाखत घेणार होते. मात्र, ठरलेली ही मुलाखत सकाळी ९ वाजेपर्यंत पुढं ढकलण्यात आली होती. ही मुलाखत घेणारे पथक १, अकबर रोड येथे थांबल्याचे इंदिरा गांधी यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर भोजन दालनातून त्या चालत बाहेर निघाल्या होत्या. या दालनातून बाहेर निघाल्यानंतर दोन्ही बाजूंनी झाडे असलेल्या रस्त्याने त्या चालत होत्या. १, अकबर रोड येथील कार्यालयाच्या दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर सब इन्स्पेक्टर बिआन्त सिंग हा दरवाजा उघडण्यासाठी पुढे सरसावला. तो अभिवादन करण्यासाठी आपला हात उंचावतो आहे, असे इंदिरा गांधी यांना वाटले होते. मात्र, काही समजायच्या आत बिआन्त सिंग याने इंदिरा गांधी यांच्यावर तीन फुटांच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. त्याच्या हातात पिस्तुल होते. गेल्या नऊ वर्षांपासून तो इंदिरा गांधी यांच्या सुरक्षादलात होता. त्यानंतर काही क्षणांतच कॉन्स्टेबल सतवंत सिंग पुढे आला. त्यानेदेखील आपल्या स्टेनगनमधून इंदिरा गांधी यांच्यावर २५ गोळ्या झाडल्या. इंदिरा गांधी यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा सकाळचे ९ वाजून १६ मिनिटे झाली होती.

डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण…

या घटनेनंतर इंदिरा गांधी यांना तत्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अनेक निष्णात डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, देहाची चाळण झाल्यामुळे डॉक्टरांना अपयश आले. इंदिरा गांधी यांचे पार्थिव १ आणि २ नोव्हेंबर असे दोन दिवस अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ३ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दिल्लीतील शांतीवन परिसरात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची समाधी आहे. याच ठिकाणी इंदिरा गांधी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. इंदिरा गांधी यांच्या समाधीला आता ‘शक्तिस्थळ’ म्हणून ओळखले जाते.

Story img Loader