चीन हा मुत्सद्देगिरीत तरबेज आहे, याला प्रतिवाद नसावा. चीनने पाकिस्तानच्या नौदलाला ‘पीएनएस रिझवान’ ही पहिली हेरगिरीनौका भेट दिली आहे. त्यामुळे चीनच्या या खेळीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडून या हेरगिरीनौकेविषयी कोणतीही माहिती उघड करण्यात आली नव्हती. पाकिस्तानला भेट मिळालेली ही हेरगिरीनौका भारतीय बनावटीच्या ‘आयएनएस ध्रुव’ला उत्तर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या निमित्ताने ही हेरगिरीनौका आणि त्या मागील चिनी कावा यांचा घेतलेला हा वेध!
रिझवान गुपचूप दाखल
‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार पीएनएस रिझवान पाकिस्तानी नौदलात दाखल झालेली असली तरी तिची धुरा मात्र चिनी नौदलाकडेच आहे. पीएनएस रिझवान ही भारतीय नौदलाच्या आयएनएस ध्रुवपेक्षा आकाराने लहान असली तरी या हेरगिरीनौकेच्या निमित्ताने पाकिस्तानचा समावेश आता फ्रान्स, अमेरिका, यूके, रशिया, चीन आणि भारतासारख्या संशोधन व हेरगिरी करणाऱ्या नौका बाळगणाऱ्या देशांच्या यादीत झाला आहे. लोकप्रिय ओपन-सोर्स इंटेलिजन्स तज्ज्ञ डॅमियन सायमन यांनी या पाकिस्तानच्या या हेरगिरी नौकेसंदर्भातील पहिली प्रतिमा जगासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. ही प्रतिमा गेल्याच वर्षी टिपण्यात आली होती.
अधिक वाचा: Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय?
हेरगिरीनौकेच्या माध्यमातून चीनची खेळी
पाकिस्तानसारख्या महत्त्वाच्या मित्राला बळ देऊन चीनला हिंदी महासागर क्षेत्रात आपले हितसंबंध वाढवायचे आहेत, असे मत सामरिक तज्ज्ञांनी आजवर अनेकदा व्यक्त केले आहे. “पाकिस्तानच्या आधुनिकीकरणाच्या या प्रयत्नांना चीनने हिंद महासागर क्षेत्रातील आपल्या धोरणात्मक हितसंबंधांनी अधोरेखित करून पाठिंबा दिला आहे, एका महत्त्वपूर्ण मित्राच्या क्षमता वाढवून त्याचा फायदा स्वतःसाठी करून घेण्याची ही चिनी खेळी आहे,” असे ओपन-सोर्स इंटेलिजन्स तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी समाजमाध्यम एक्सवर (ट्विटर) नमूद केले आहे.
पीएनएस रिझवानची बांधणी
जून २०२३ मध्ये ही हेरगिरीनौका चीनमधून पाकिस्तानला आणण्यात आली. ही नौका पाकिस्तानी नौदलात दाखल करून घेण्याचा कार्यक्रमही औपचारिकरित्या पार पडला नाही. हे सारे प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गुपचूप उरकण्यात आले. गेल्या वर्षी ही हेरगिरीनौका चीनमधून इंडोनेशियापर्यंत मे ते जून या कालखंडात आणण्यात आली. पीएनएस रिझवानची बांधणी चीनमधील फुझोउमध्ये करण्यात आली. फुझोउमध्ये फुजियान मावेई शिपबिल्डिंग लिमिटेड ही कंपनी असून त्या कंपनीमार्फतच हे सारे काम पार पाडण्यात आले. १८६६ मध्ये तत्कालीन चिनी सरकारने स्थापन केलेली ही सर्वात जुनी जहाजबांधणी सुविधा आहे.
हेरगिरीनौकेची चिनी योजना कशासाठी?
पाकिस्तानच्या नौदलात पीएनएस रिझवानचा अलीकडेच करण्यात आलेला समावेश हा भारतासमोर सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करू शकतो, असे मत अनेक तज्ज्ञ सांगतात. भारताच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय किनारपट्टीजवळ ते तैनात केले जाऊ शकते. शिवाय हिंदी महासागर क्षेत्रामध्ये चीनच्या चालू असलेल्या गोपनीय माहिती संकलनाला चालना देण्यासाठीही रिझवानचा वापर करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या या हेरगिरीनौकेकडे आण्विक आंतरखंडिय क्षेपणास्त्राचा माग काढण्याची व परिसरातील क्षेपणास्त्रांची गुप्त माहिती गोळा करण्याची क्षमता आहे.
अधिक वाचा: Indo-China relations: “अरुणाचल आमचंच”, चीन लष्कराचा दावा; भारताचं प्रत्युत्तर, काय आहे प्रकरण?
आयएनएस ध्रुव
भारतीय नौदलाकडेही आयएनएस ध्रुव ही संशोधन नौका असून तिची बांधणी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडतर्फे करण्यात आली आहे. या संशोधननौकेमध्येही परिसरातील क्षेपणास्त्रांचा माग काढण्याची क्षमता आहे. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भारतीय नौदलातर्फे संयुक्तपणे आयएनएस ध्रुवचे काम पाहिले जाते. २०१९ साली बांधणी पूर्ण झाल्यानंतर या संशोधननौकेच्या सागरी चाचण्यांना सुरुवात झाली. ऑक्टोबर २०२० मध्ये ही संशोधननौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. तर १० ऑक्टोबर २०२१ रोजी विशाखापट्टणम नौदल तळावर झालेल्या छोटेखानी समारंभात ही नौका भारतीय नौदलात रितसर दाखल झाली. आयएनएस ध्रुवला उत्तर देण्यासाठीच पीएनएस रिझवानची योजना आखून चीनने ती तडीस नेली, असे सामरिकतज्ज्ञ मानतात.