इंडोनेशियाची सर्वात मोठी डेटा सेंटर कंपनी डीसीआय इंडोनेशियाच्या अध्यक्षा मरीना बुडीमान यांनी केवळ तीन दिवसांत आपली ३.५ अब्ज डॉलर्सची म्हणजेच अंदाजे ३१,१०० कोटी रुपयांची संपत्ती गमावली आहे. ही माहिती ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समधून समोर आली आहे. मरीना बुडीमान या इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक होत्या. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार सलग तीन आठवडे त्यांची संपत्ती प्रत्येक दिवशी ३५० मिलियन डॉलर्स म्हणजेच ३००० कोटी रुपयांनी वाढत गेली. मात्र, त्यानंतर केवळ तीनच दिवसांत त्यांनी आपली अर्धी संपत्ती गमावली. त्यामागील नेमके कारण काय? कोण आहेत मरीना बुडीमान? जाणून घेऊ.

नेमके प्रकरण काय?

मार्च २०२५ च्या मध्यापर्यंत मरीना बुडीमान यांची एकूण संपत्ती ७.५ अब्ज इतकी झाली होती. ही संपत्ती शेअर बाजारातील तेजीमुळे वाढली होती. परंतु, नशीब कधीही पालटते असे म्हणतात. तसेच काहीसे मरीना बुडीमान यांच्याबरोबरही घडले. डीसीआय इंडोनेशियाच्या शेअर्सचे मूल्य घसरले आणि केवळ तीन दिवसांत बुडीमान यांनी आपली अर्धी संपत्ती गमावली. १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान त्यांना ३.६ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले, त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ३.९ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

या नाट्यमय घसरणीचा परिणाम डीसीआय कंपनीचे सह-संस्थापक आणि प्रमुख भागधारक ओटो टोतो सुगीरी आणि हान आर्मिंग हनाफिया यांच्यावरही झाला आणि त्यांनीदेखील आपल्या संपत्तीतील मोठा भाग गमावला. यापूर्वीदेखील मरीना बुडीमान चर्चेत होत्या, कारण त्यांनी इंडोनेशियाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्या कंपनीद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले. डीसीआय इंडोनेशिया कंपनी वाढत्या डेटा सेंटर उद्योगात आघाडीवर होती. परंतु, देशाच्या शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे मरीना बुडीमान यांचे नशीब पालटले आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला असण्याचे स्थानही त्यांनी गमावले.

शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?

इंडोनेशियाच्या शेअर बाजारात कायमच चढउतार पाहायला मिळतात, त्यामुळे डीसीआय इंडोनेशियाच्या शेअर्समधील चढउतारही याला अपवाद नाहीत. अनेक कंपन्या अशाही आहेत, ज्यांच्या शेअर्समध्ये १००० टक्क्यांहून अधिकची वाढ आणि घट पहायला मिळाली आहे. डीसीआय इंडोनेशिया कंपनीच्या शेअरची वाढ आर्थिक मूलभूत गोष्टींपेक्षा जास्त असल्याने, तो मंदीसाठी अत्यंत असुरक्षित ठरला. डीसीआय शेअर्सच्या अस्थिरतेला कारणीभूत असलेला एक प्रमुख घटक म्हणजे त्याची केंद्रित मालकी. बुडीमान, सुगीरी, हनाफिया आणि अब्जाधीश उद्योजक अँथोनी सलीम यांच्याकडे एकत्रितपणे कंपनीचे ७८ टक्के शेअर्स आहेत; ज्यामुळे सार्वजनिक व्यापारासाठी फारशी जागा उरली नाही. त्यामुळेच शेअरच्या किमतीत तीव्र चढउतार होण्याची शक्यता जास्त होती.

इंडोनेशियाच्या शेअर बाजारात कायमच चढउतार पाहायला मिळतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

“डीसीआयच्या किमतीतील चढउतारासाठी त्याची केंद्रित मालकी कारणीभूत आहे. खरेदी आणि विक्री करणाऱ्यांमध्ये फार कमी अंतर असल्याने (नेरो बिड-ऑफर स्प्रेड) मोठा व्यापार होत असताना स्टॉकमध्ये मोठे बदल होतात,” असे सिंगापूरमधील एसजीएमसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड फंड मॅनेजर मोहित मीरपुरी यांनी ‘ब्लूमबर्ग’ला सांगितले. इंडोनेशियाच्या शेअर बाजारात नाट्यमयरीत्या बदलत्या स्टॉकची ही पहिली घटना नाही. अलीकडच्या काळात, अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किमती १००० टक्क्यांनी किंवा त्याहून अधिक वाढल्या आहेत, परंतु नंतर त्या कोसळल्या आहेत. यापैकी अनेक शेअर्समध्ये तरलतेचा अभाव आहे, त्यामुळे किमतीतील अस्थिरता वाढली आहे आणि यामुळेचे अचानक संपत्तीत वाढ व तोटा इंडोनेशियाच्या उच्चभ्रू गुंतवणूकदारांमध्ये वारंवार घडताना दिसून येत आहे.

शेअर्समधील घसरणीची इतर कारणे

शेअर्समधील या घसरणीसाठी आर्थिक आणि राजकीय घटकही कारणीभूत आहेत. गेल्या काही काळात इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. याचे एक कारण म्हणजे ऑक्टोबर २०२४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी तयार केलेली आर्थिक धोरणे. त्यांच्या प्रशासनाने महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या खर्चावर लक्ष केंद्रित केल्याने वित्तीय स्थिरतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत.

बाजार विश्लेषकांनी इंडोनेशियाच्या अलीकडच्या शेअर बाजारातील घसरणीसाठी अनेक गोष्टींना कारणीभूत ठरवले आहे. त्यामध्ये अर्थ मंत्रालयाच्या नेतृत्वाभोवती असलेली अनिश्चिततादेखील कारणीभूत असल्याचे त्यांचे सांगणे आहे. मुख्य म्हणजे जागतिक स्तरावर अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांसारख्या बाह्य दबावांमुळे आणि वाढत्या व्यापार तणावामुळे बाजारातील अस्थिरतेत आणखी भर पडली आहे.

इंडोनेशियाच्या शेअर बाजाराचा इतिहास

इंडोनेशियाच्या शेअर बाजारात अचानक तेजी आणि त्यानंतर तीव्र घसरणीच्या अनेक घटना नोंदवल्या आहेत. डीसीआय इंडोनेशियाचे प्रकरण हे या घटनांचे अगदी ताजे उदाहरण आहे. या प्रकरणात गुंतवणूकदार सुरुवातीला वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यात सामील झाले होते. डेटा सेंटर्स इंडोनेशियाच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग आहेत. विशेष म्हणजे या उद्योगांनी परदेशी गुंतवणूकदारांनाही आकर्षित केले आहे. ओरेकल कॉर्पोरेशनसारख्या कंपन्या क्लाउड सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी इंडोनेशियन सरकारशी चर्चा करत आहेत, त्यामुळे या क्षेत्राचा आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. मंदीपूर्वी, डीसीआय इंडोनेशियाला या ट्रेंडचा फायदा झाला होता, त्यामुळेच कंपनीच्या शेअर्सकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले होते.

मरीना बुडीमान कोण आहेत?

मंदीनंतरही डीसीआय इंडोनेशिया कंपनी आग्नेय आशियातील डेटा सेंटर क्षेत्रात एक प्रमुख खेळाडू आहे. त्यांनी कंपनीच्या विस्तारासाठी अनेक योजना आखल्या आहेत. क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाढत्या मागणीमुळे ओरॅकल कॉर्पसारख्या टेक कंपन्यांशी झालेल्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांमध्ये कंपनीचे आकर्षण निर्माण झाले आहे. २०११ मध्ये सुगीरी आणि हनाफिया यांच्याबरोबर डीसीआयची सह-स्थापना करणाऱ्या बुडीमान यांचा इंडोनेशियाच्या तंत्रज्ञान उद्योगात मोठा इतिहास आहे.

कंपनीच्या स्थापनेपूर्वी त्या १९८५ मध्ये बँक बाली येथे काम करत होत्या. त्यानंतर १९८९ मध्ये त्या आयटी फर्म सिग्मा सिप्टा कारकामध्ये सामील झाल्या. १९९४ मध्ये त्यांनी इंडोनेशियाची पहिली इंटरनेट सेवा प्रदाता असलेल्या इंडोनेटची सह-स्थापना केली. ही कंपनी त्यांनी आणि त्यांच्या सह-संस्थापकांनी २०२३ मध्ये विकली. सरकार बाजारातील अस्थिरता कशी हाताळते आणि भविष्यात अशा नाट्यमय किमतीतील चढउतार कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करते, यावर बाजारातील पुढील हालचाली अवलंबून आहेत.