लग्न म्हणजे दोन हृदयांचे मिलन, असे म्हणतात. जगभरात लग्न या संकल्पनेभोवती अनेक संकल्पना गुंफल्या आहेत. काही गोष्टी तर आपल्या पचनी पडणार नाहीत, अशा आहेत. इंडोनेशियन गावातही काही वेगळेच चित्र आहे. इंडोनेशियातील पुंकाक मधील महिला ‘प्लेजर मॅरेज’ करीत आहेत. त्याची चर्चा जगभर सुरू आहे. या प्रथेला ‘निकाह मुताह’, असे नाव आहे. मात्र, या प्रथेने इंडोनेशियात उद्योगाचे स्वरूप घेतले आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिला पैशाच्या मोबदल्यात पुरुष पर्यटकांबरोबर विवाह करीत आहेत. मात्र, अनेक पर्यटक स्थानिक महिलांचा गैरफायदा घेत असल्याने या प्रथेवर टीका होत आहे. काय आहे ‘प्लेजर मॅरेज’? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘प्लेजर मॅरेज’ म्हणजे काय?

मध्य पूर्वेतील महिला प्रामुख्याने इंडोनेशियातील महिलांसाठी ‘प्लेजर मॅरेज’ हे उपजीविकेचे साधन ठरत आहे. प्लेजर मॅरेज हा एक अल्प कालावधीसाठी करण्यात येणार्‍या लग्नाचा प्रकार आहे. गरीब महिला पर्यटक पुरुषांबरोबर पैशांसाठी अल्पकालीन विवाह करतात. ‘लॉस एंजेलिस टाइम्स’च्या मते, ही प्रथा पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. पश्चिम इंडोनेशियातील पुंकाक येथे या प्रथेद्वारे विशेषतः अरब पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. अगदी सुरुवातीला पर्यटक आणि महिलांची ओळख कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांद्वारे करून दिली जायची.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांची हत्या; चिनी प्रकल्पांवर का होतायत हल्ले?

मात्र, आता त्यासाठी वेगळ्या कंपन्यादेखील तयार करण्यात आल्या आहेत, ज्या हा व्यवसाय चालवतात. कोटा बुंगा या हायलँड रिसॉर्टमध्ये एजन्सीद्वारे पर्यटकांची स्थानिक महिलांशी ओळख करून दिली जाते. दोन्ही पक्षांच्या संमतीने आयोजित केलेल्या एका अनौपचारिक विवाह सोहळ्यानंतर पुरुष आणि महिला काही दिवस एका जोडप्याप्रमाणे राहतात. त्यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित होतात आणि जेव्हा पर्यटक परत जातो, तेव्हा त्यांचा घटस्फोट होतो.

अशा विवाहांची उदाहरणे

‘प्लेजर मॅरेजला बळी पडलेल्या काहाया नावाच्या एका इंडोनेशियन महिलेने तिच्या त्रासदायक अनुभवाबद्दल सांगितले. तिने ‘एलए टाइम्स’ला सांगितले की, तिने १५ पेक्षा जास्त वेळा पश्चिम आशियाई पर्यटकांशी लग्न केले आहे. तिचा पहिला नवरा ५० वर्षांचा होता, जो सौदी अरेबियाचा होता. त्याने लग्नाकरिता ८५० डॉलर्स (सुमारे ७१,४०० रुपये) दिले होते. परंतु, अधिकार्‍यांनी तिला त्यातील केवळ अर्धी रक्कम दिली. लग्नानंतर पाच दिवसांनी तो घरी निघून गेला आणि त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, वयाच्या १३ व्या वर्षी जेव्हा काहायाचे लग्न झाले होते तेव्हा तिला ही प्रथा कळली. तिच्या आजी-आजोबांनी लग्नासाठी तिच्यावर जबरदस्ती केली होती.

पण, काही काळानंतर तिच्या पतीने तिला सोडले. तिने जनरल स्टोअर्स आणि शूज तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करण्याचा विचार केला; परंतु तिथे तिला पुरेसा पगार मिळाला नाही. काहायाने उघड केले की, ती एका लग्नाचे ३०० ते ५०० डॉलर्सदरम्यान कमावते आणि आजारी आजी-आजोबांना मदत करते. “माझ्या आईला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मला खूप इच्छा होती. त्यांना याबाबत काहीच कल्पना नाही. त्यांना कळले, तर मी जिवंत राहणार नाही,” असे तिने ‘एलए टाइम्स’ला सांगितले. ‘प्लेजर मॅरेज’ला बळी गेलेल्या निसा नावाच्या दुसर्‍या एका महिलेने कमीत कमी २० वेळा लग्न केले; मात्र आता ती या चक्रातून सुटली असल्याचे तिने सांगितले. तिने एका इंडोनेशियन इमिग्रेशन ऑफिसरशी लग्न केले आणि नवीन आयुष्याची सुरुवात केली.

‘प्लेजर मॅरेज’ चिंतेचा विषय का ठरतोय?

‘प्लेजर मॅरेज’मुळे दुर्बल महिलांचे शोषण आणि महिलांच्या हक्कांसाठी सुरक्षा उपायांचा अभाव याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘प्लेजर मॅरेज’ किंवा ‘निकाह मुताह’ची प्रथा शिया इस्लाममध्ये आहे. परंतु, बहुतेक विद्वानांनी या संघटनांना अस्वीकार्य मानले आहे. याव्यतिरिक्त हे तात्पुरते करार इंडोनेशियन कायद्याद्वारे स्वीकारले जात नाहीत. कारण- इंडोनेशियातील कायद्यात विवाहाचे वय १९ वर्षांचे आहे. इंडोनेशियन विवाह कायदे मोडण्यासाठी दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे. इस्लामिक कौटुंबिक कायदा तज्ज्ञ ययान म्हणाले, “लोकांना वाटते की, सरकारने धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. राज्य कायदा विवाहाच्या कायदेशीरपणाची व्याख्या करीत नाही. कारण- तो धर्माने निर्धारित केला आहे. हीच समस्या आहे.”

हेही वाचा : भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर; या दौर्‍यामागील त्यांचा उद्देश काय?

समीक्षक व इंटरनेटवरील लोकांनीदेखील या प्रथेची निंदा केली आहे आणि अशी टीका केली आहे की, यामुळे दारिद्र्यग्रस्त समुदायांचा फायदा घेऊन मानवी तस्करी, गैरवर्तन आणि शोषणसारख्या समस्या वाढतील. त्याला कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही, असे जकार्ता फेमिनिस्ट या कार्यकर्ता संघटनेचे कार्यक्रम संचालक अनिंद्य रेस्तुवियानी म्हणाले. “आमच्याकडे कायदा आहे; पण त्याची अंमलबजावणी खूप आव्हानात्मक आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले.