Culinary Heritage of the Indus Valley Civilization: यंदा सिंधू संस्कृतीच्या (IVC) शोधाला तब्बल १०० वर्षे पूर्ण झाली, ही संस्कृती अनेक कारणांसाठी ओळखली जाते. या संस्कृतीची उत्कृष्ट नगर रचना, व्यापारी जाळे आणि सांस्कृतिक प्रगल्भता ही वैशिष्ट्ये आजही आपल्याला भुरळ घालतात. या प्राचीन संस्कृतीच्या कमी परिचित परंतु तितक्याच आकर्षक पैलूंमध्ये तिची समृद्ध खाद्यसंस्कृतीदेखील आहे. सिंधू संस्कृतीची खाद्यसंस्कृती ही तिथल्या लोकांच्या समृद्ध परंपरेचा आरसा आहे. या लेखात हडप्पा आणि मोहेंजोदारोच्या शोधयात्रेचा प्रवास, वसाहत कालखंडातील उलगडा, स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्त्वज्ञांची भूमिका आणि हडप्पा खाद्यसंस्कृतीचे रुचकर तपशील यांचा वेध घेतला आहे.
शोध हडप्पा आणि मोहेंजोदारोचा
सिंधू संस्कृतीच्या शोधाची कहाणी ही कोण्या एका पुरातत्त्व अभ्यासकाच्या कार्यापुरती मर्यादित नसून ती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) सामूहिक प्रयत्नांची यशोगाथा आहे. लुईगी पिओ टेसिटोरी, राखाल दास बॅनर्जी आणि जॉन मार्शल यांसारख्या दूरदर्शी संशोधकांनी हडप्पा आणि मोहेंजोदारोच्या अवशेषांचा शोध लावला. त्यांच्या या शोधकार्यामुळे भारताच्या प्राचीन इतिहासाची ओळख नव्या दृष्टिकोनातून झाली आणि हजारो वर्षांपूर्वी समृद्ध झालेली ही संस्कृती आपल्यासमोर आली. मात्र १९४७ साली भारताच्या फाळणीमुळे या सांस्कृतिक वारशाची विभागणी झाली. हडप्पा आणि मोहेंजोदारोमधील मौल्यवान वस्तू भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटल्या गेल्या. मोहेंजोदडोतील प्रसिद्ध दागिने आणि सोनेरी माळा या विभागणीची प्रतीके ठरली.
अधिक वाचा: १०० वर्षांपूर्वी खोवला गेला मानाचा तुरा आणि भारतीय संस्कृती ठरली तब्बल ५००० वर्षांहून अधिक प्राचीन!
भारतीय पुरातत्त्वज्ञांची आघाडी
या स्थळांचा शोध ब्रिटिश कालखंडात लागलेला असला तरी स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्त्वज्ञांनी हडप्पा संस्कृतीच्या अभ्यासाची जबाबदारी यशस्वीरित्या पुढे नेली. अमलानंद घोष आणि एस.आर. राव यांसारख्या संशोधकांनी भारतातील सिंधू संस्कृतीच्या शोधात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पंजाबमधील रोपर आणि उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर येथील उत्खननांनी प्रागैतिहासिक काळापासून ते मध्ययुगापर्यंतच्या सांस्कृतिक सातत्याचा उलगडला केला. पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि बडोद्याच्या एमएस विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांनीही या संशोधनामध्ये भर घातली. त्यामुळे भारताच्या प्राचीन संस्कृतींचे सखोल आकलन होण्यास मदत झाली आहे.
हडप्पाकालीन आहार: प्राचीन काळातील स्वादिष्ट मेजवानी
हडप्पा संस्कृतीतील लोकांचा आहार मांस, मासे, धान्य, डाळी, फळे, भाज्या आणि मसाल्यांनी समृद्ध होता. त्यांची खाद्यसंस्कृती प्रगत होती. अलीकडील संशोधनांनी हडप्पा खाद्यसंस्कृतीबाबत अनेक मनोरंजक तपशील उघड केले आहेत. दगडी उखळ, भांडी आणि मानवी दातांवर सापडलेल्या स्टार्चच्या कणांनी ते आंबा, केळी आणि लसूण यांसारख्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया आणि त्याचे सेवन करत होते, असे निष्पन्न झाले आहे. सुरकोटडा येथे एका मातीच्या भांड्यात आढळलेल्या भाजक्या बीयांनी त्यांच्या कृषी पद्धतींच्या जटिलतेचे दर्शन घडवले आहे. भारतात संरक्षित अन्न किंवा कोप्रोलाइट्स ( मानवी विष्ठेचे जीवाश्म) यांसारखे थेट पुरावे सापडत नसले तरी आधुनिक तंत्रांनी हडप्पा आहाराचे बारकावे उलगडले आहेत.
पुरातत्त्वशास्त्रातील नवकल्पना: भूतकाळाचा उलगडा
आधुनिक पुरातत्त्वशास्त्राने प्राचीन अन्नपद्धतींच्या अभ्यासात क्रांती घडवली आहे. स्टार्च विश्लेषण, फाइटोलिथ अभ्यास आणि रेसिड्युअल टेस्टिंग यांसारख्या तंत्रज्ञानांचा उपयोग संशोधकांना हडप्पा संस्कृतीतील खाद्यपद्धती समजून घेण्यासाठी होत आहे. उदाहरणार्थ, फर्माना येथे भांडी आणि प्राण्यांच्या दातांवर सापडलेल्या स्टार्चच्या कणांमुळे उरलेल्या मानवी अन्नाचा प्राण्यांच्या आहारासाठी वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या टिकाऊ अन्नपद्धतीचा पुरावा मिळाला आहे. क्रोनोमेट्रिक डेटिंगसाठी प्रयोगशाळा वाढवल्यास भारताच्या प्रागैतिहासिक कालक्रमाविषयी मौल्यवान माहिती मिळू शकते असे तज्ज्ञ सांगतात.
प्रमुख पिके आणि कृषी पद्धत
सिंधू संस्कृतीच्या अन्न अर्थव्यवस्थेमध्ये शेती केंद्रस्थानी होती. सिंधू लोकांनी गहू, बार्ली (जव), बाजरी, मसूर आणि हरभऱ्याची विविध प्रकारची पिके घेतली. तांदूळही या काळात अस्तित्वात होता, परंतु तो या संस्कृतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात फारसा प्रचलित नव्हता. या प्रमुख धान्यांवर दगडी उपकरणे आणि उखळ-दळण वापरून प्रक्रिया केली जात असे. हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील उत्खननांमध्ये अशा उपकरणांचे अवशेष सापडले आहेत. हरियाणातील फर्माना येथे करण्यात आलेल्या अलीकडील अभ्यासांमध्ये दगडी उखळ आणि मातीच्या भांड्यांवर स्टार्चचे कण सापडले आहेत. यावरून असे दिसते की, धान्याचे पीठात रूपांतरित करून भाकरी किंवा पेजेसारखे पदार्थ तयार केले जात असत. हडप्पा येथील धान्यकोठारांच्या शोधाने शहरी केंद्रांना अन्नधान्य पुरवण्यासाठी शेती उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?
पशुपालन आणि मांसाहार
सिंधू संस्कृतीतील लोक शेतीबरोबर पशुपालनही करत असत. गायी, मेंढ्या, शेळ्या आणि म्हशी यांसारख्या पाळीव प्राण्यांचे अवशेष सिंधू संस्कृतीच्या स्थळांवर आढळले आहेत. ज्यावरून दूध, मांस आणि श्रमासाठी या प्राण्यांचा उपयोग होत होता असे लक्षात येते. मोहेंजोदारो आणि इतर स्थळांवर सापडलेल्या प्राण्यांच्या हाडांवर कापल्याच्या खुणा आढळल्या आहेत. ज्यामुळे मासे आणि पक्ष्यांचाही सिंधू संस्कृतीतील आहारात महत्त्वाचा सहभाग होता हे समजते. मासेमारीसाठी वापरले जाणारे हुक्स आणि जाळी यांसारखी साधने उत्खननातून सापडली आहेत. यावरून नद्यांमधून आणि जलस्रोतांमधून प्रथिनांचा सातत्यपूर्ण पुरवठा मिळत असल्याचे स्पष्ट होते.
फळे, भाज्या आणि मसाले
सिंधू संस्कृतीतील आहारामध्ये फळे आणि भाज्यांचा महत्त्वाचा समावेश होता. उत्खननांमधून झेंडू, द्राक्षे, खजूर आणि अंजिराच्या बियांचे पुरावे सापडले आहेत. त्यावरून या फळांचे सेवन होत असल्याचे स्पष्ट होते. लसूण, आलं आणि हळद यांचा स्वादवर्धक घटक म्हणून वापर केला गेला असावा, परंतु या मसाल्यांचे थेट पुरावे तुलनेने कमी आहेत.
स्वयंपाक तंत्र आणि मातीची भांडी
सिंधू संस्कृतीतील लोक विविध स्वयंपाक तंत्रांचा वापर करत असत. ज्यामध्ये उकडणे, भाजणे आणि बेकिंग यांचा समावेश होता. उत्खनन स्थळांवर मोठ्या प्रमाणात सापडलेली मातीची भांडी स्वयंपाक आणि अन्नसाठवणीसाठी महत्त्वाची होती. मोठ्या साठवणीच्या भांड्यांमुळे अन्न टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अंदाज येतो तर लहान भांडी वैयक्तिक खानपानासाठी वापरली जात असावीत. भांड्यांवरील तुकड्यांवर आढळलेल्या धान्यांच्या ठशांवरून त्यात कोणते पदार्थ शिजवले गेले असावेत याचा अंदाज मिळतो. कालीबंगन येथे सापडलेल्या चुली आणि भट्ट्यांवरून स्वयंपाकासाठी अग्नीचा उपयोग किती महत्त्वाचा होता हे समजते. हरियाणातील फर्माना येथे साधनांवर आणि मानवी दातांवर सापडलेल्या स्टार्चच्या कणांनी आंबा आणि केळ्यांच्या वापराचे संकेत दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या वनस्पती-आधारित आहारातील वैविध्य अधोरेखित होते. जवळच्या जंगलांमधून गोळा केलेल्या वन्य वनस्पतींच्या बियाही त्यांच्या आहाराचा भाग होत्या.
सिंधू संस्कृतीची खाद्यसंस्कृती केवळ त्यांच्या प्रगत शेती, पशुपालन आणि अन्नप्रक्रिया तंत्रांपुरती मर्यादित नव्हती, तर ती त्यांच्या जीवनशैलीचा आरसा होती. विविध प्रकारचे धान्य, फळे, भाज्या, मसाले, मासे आणि मांस यांचा समावेश असलेल्या समृद्ध आहाराने या संस्कृतीच्या सर्जनशीलतेला आणि संसाधनक्षमतेला अधोरेखित केले आहे.