भारतीय इतिहासातील एक समृद्ध पर्व म्हणून सिंधू संस्कृतीची ख्याती आहे. सिंधू संस्कृती ही जागतिक इतिहासातील चार प्राचीन संस्कृतींमधील एक असून सर्वात प्रगत आणि पहिल्या नागरीकरणासाठी ओळखली जाते. सिंधू संस्कृतीचा उदय कसा झाला आणि पतनास नेमकी काय कारणं होती, याविषयी नेहमीच चर्चा केली जाते. सिंधू संस्कृतीच्या भरभराटीचे वर्णन करताना व्यापार आणि त्या अनुषंगाने येणारी आर्थिक सुबत्ता याविषयी भरभरून लिहिले गेले आहे. किंबहुना या आर्थिक सुबत्तेची साक्ष देणारे पुरावे पुरातत्त्वीय उत्खननात उघडकीस आले आहेत. त्यामुळे या संस्कृतीच्या विकसित स्वरूपाविषयी दुमत नाही. असे असले तरी एखाद्या संस्कृतीचा अभ्यास सर्वांगाने करावा लागतो. व्यापार आणि कृषी ही या संस्कृतीची महत्त्वाची अंगे असली तरी आजच्या भाषेतील ‘इंडस्ट्रियल मॅन्न्यूफॅक्चरिंग’ कसे होतं होते हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. सिंधू संस्कृतीचा उत्पादक म्हणून इतिहास गूढ आणि आकर्षक आहे, त्याविषयी…
प्रगत तंत्रज्ञान
सिंधू संस्कृती आपल्या तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. या संस्कृतीतील नामशेष झालेल्या मेणाच्या तंत्राचा वापरकरून कांस्य बनविण्याचे, ५००० वर्षांहून जुने असलेले मणी तयार करण्याचे, मातीची भांडी तयार करण्याचे, कापड तयार करण्याचे तंत्र यामुळे सिंधू संस्कृतीलाच नाही तर आजही प्राचीन भारताला प्रमुख उत्पादक म्हणून गौरविले गेले आहे. बिंजोर या पुरातत्त्वीय स्थळावर सिंधू संस्कृतीकालीन औद्योगिक उत्पादनाचे पुरावे सापडले आहेत. ‘द प्रिंट’ने त्या स्थळावर प्रकाशझोत टाकला आहे, त्या निमित्ताने या सिंधूकालीन स्थळाचा घेतलेला वेध!
आज भारतात सिंधू संस्कृतीच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकणारी अनेक पुरातत्वीय स्थळं आहेत. परंतु उत्पादन आणि कारागिरीला वाहिलेली पूर्ण वसाहत दुर्मीळ आहे. हडप्पा, मोहेंजोदारो, राखीगढी, धोलावीरा या स्थळांवर असलेल्या हस्तकला केंद्रांच्या मदतीने ‘ट्रेड मॅट्रिक्स’चा कणा समजून घेण्यात मदत झाली आहे. तर बिंजोरसारख्या पुरातत्त्वीय स्थळांवर झालेल्या उत्खननामुळे तत्कालीन औद्योगिक उत्पादनाविषयी जाणून घेण्यास मदत होते. तरखानवाला डेरा आणि बरोरच्या अगदी जवळ बिंजोर या स्थळावर कारागिरांचे गाव सापडले आहे. या गावाने धातूशास्त्रज्ञ आणि कारागीर यांच्या तत्कालीन जीवनाचे दर्शनच घडविण्याचे काम केले आहे.
राजस्थानातील हडप्पापूर्व बिंजोर
बिंजोर हे ठिकाण राजस्थानमध्ये असून श्री गंगानगर जिल्ह्यातील अनुपगढ तालुक्यातील घग्गर- हाकरा नदीला विभाजित करणाऱ्या भारत-पाकिस्तान सीमेपासून सुमारे ४ किमी अंतरावर वसलेले आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक (१९५३-६८) आणि प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक ए. घोष यांनी १९५०-५२ साली राजस्थानमध्ये झालेल्या सर्वेक्षणात या स्थळाचा शोध लावला होता. त्यांनी त्यांच्या नोंदीत एकूण चार पुरातत्त्वीय टेकाडांचा उल्लेख केला होता. घोष यांच्यानंतर केटी दलाल यांनी बिंजोर ३ येथे प्राथमिक सर्वेक्षणासाठी ‘ट्रायल ट्रेंच’चे खणकाम केले होते. १९७० च्या दशकात १.७५ मीटर खोलवर हडप्पापूर्व संस्कृतीच्या अवशेषांची नोंदणी करण्यात आली होती.
अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?
कालांतराने या स्थळावर एकच टेकाड शिल्लक राहिले. २०१४-१७ या कालखंडात भारतीय पुरातत्त्व खात्याचे संजय मंजूल आणि अरविन मंजुल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले. आणि यात अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड झाल्या. या उत्खननातून तीन महत्त्वाचे टप्पे समोर आले. त्यात हडप्पापूर्व/ प्रारंभिक, प्रारंभिक ते विकसित, विकसित ते उत्तरार्ध असे तीन कालखंड समोर आले. या स्थळाची नोंद ‘सेमी रूरल’ अर्थात अर्ध-ग्रामीण म्हणून करण्यात आलेली असली तरी या स्थळावरील पुरावे महत्त्वाचे ठरले आहेत. या स्थळावर झालेल्या उत्खननातून इसवी सन पूर्व ४५०० ते १९०० कालखंडातील प्रारंभिक, संक्रमण आणि विकसित हडप्पा संस्कृतीचे अवशेष समोर आले आहेत. यात मातीच्या विटांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या बहुसंख्य खोल्या, वर्कशॉपचे ठिकाण, अंगण आणि वस्तीच्या सभोवतालची एक भव्य तटबंदी यासह बहुतेक संरचना मातीच्या विटांनी तयार केलेल्या आहेत. वाघाचे आणि माशांचे चित्र असलेली मातीची भांडी, मृण्मय मुद्रा, कार्नेलियन, अगेट, जेड, लॅपिस लाझुली, क्वार्ट्स यांपासून तयार केलेले मौल्यवान खडे, तांब्याच्या वस्तू इत्यादींचा समावेश होतो. हे ठिकाण प्राचीन व्यापारी मार्गावर स्थित आहे.
शिल्पकारांचे गाव
बिंजोरच्या उत्खननात हे स्थळ औद्योगिक केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे. या ठिकाणी २५० हून अधिक चुली तसेच भट्ट्यांचे अवशेष समोर आले आहे. सुरुवातीच्या कालखंडात चुली या केवळ घरगुती वापरापुरत्याच मर्यादित होत्या. चुलींची संख्या वाढल्याचे विकसित कालखंडात दिसून येते, जे औद्योगिक उत्पादनाच्या वाढीचे द्योतक आहे. इसवी सनपूर्व २६०० ते २००० या कालखंडात ही वाढ झाली होती. चुलीच्या/ भट्ट्यांच्या आकारावरून आणि संबंधित सामग्रीवर आधारित वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
तांब्याच्या अवजारांचे उत्पादन
या चुली-भट्ट्यांच्या परिसरातून टेराकोटा क्रूसिबल्स आणि मोल्ड्स, स्टोन एनव्हिल्स, हॅमर, पॉलिशर्स, तांब्याची छिन्नी आणि इतर साधने यासारख्या वस्तू; इंधन म्हणून लाकडाचे पुरावे, टेराकोटा केक (भाजलेले, न भाजलेले स्टोरेज), भाजलेली हाडे; विविध वजनं आणि मापे इत्यादी पुरावे सापडले आहेत. जे औद्योगिक व्यवस्थापनाचे सूचक आहेत. या ठिकाणी तांब्याच्या अवजारांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते, असे हे पुरावे सूचित करतात.
अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?
ऱ्हास
इसवी सनपूर्व २६०० मध्ये सिंधू संस्कृतीचा समकालीन संस्कृतींशी व्यापारी संबंध वाढल्यावर या उपखंडात तयार होणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढली. यामुळे पूर्वेला कालीबंगन, उत्तरेला हडप्पा आणि पश्चिमेला मोहेंजोदारो यांना जोडणाऱ्या बिंजोरसह हडप्पा क्षेत्रामध्ये हस्तकला केंद्रे आणि उद्योगांची निर्मिती झाली. या स्थळावरील औद्योगिक विकासाला परिपक्व हडप्पा काळात सुरुवात झाल्याचे या उत्खननात तसेच शास्त्रीय संशोधनात लक्षात आले आहे. इसवी सनपूर्व २००० च्या उत्तरार्धात येथील रहिवाश्यांनी हे स्थळ सोडण्यास सुरवात केली. ही घटना इथल्या नागरीकरणाचा ऱ्हास सूचित करते. बरोर आणि तारखानवाला डेरा ही स्थळे जवळच आहेत आणि तेथेही भट्ट्या आणि चुलींचे पुरावे सापडले आहेत. परंतु औद्योगिक उत्पादक स्थळ म्हणून त्यांचे वर्णन करता येत नाही. परंतु बिंजोर येथील पुरावे या स्थळाचे औद्योगिक महत्त्व स्पष्ट करते.