थायलंड मधील बान नॉन वाट या पुरातत्त्वीय स्थळावर सापडलेल्या मानवी सांगाड्याचे छायाचित्र अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुरातत्वीय स्थळांवर अशा प्रकारचे मानवी सांगाडे सापडणं साहजिकच आहे. परंतु या सांगाड्याच्या हातात असलेल्या भरगच्च बांगड्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बांगड्या मार्बल आणि शंखांपासून तयार केलेल्या आहेत. या बांगड्यांचा कालखंड इसवी सनपूर्व १००० आहे, म्हणजेच या बांगड्या ३००० वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. त्यामुळे बांगड्या वापरण्याची परंपरा किती जुनी याविषयी चर्चा सुरु झाली. बांगड्यांचा भारतीय स्त्रियांचाही जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत बांगड्यांचा संबंध समृद्धीशी जोडला जातो. त्याच निमित्ताने प्राचीन काळापासून भारतीय उपखंडातील शंखांपासून तयार करण्यात येणाऱ्या बांगड्यांचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

भारतीय इतिहासात पहिल्या नागरीकरणाच्या कालखंडात देशाच्या वेगवेगळ्या भागात शंखांपासून तयार करण्यात आलेल्या बांगड्या वापरण्याची परंपरा होती. म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या कालखंडात शंखापासून तयार केलेल्या बांगड्या ही नेहमीचीच बाब होती. हडप्पा संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणारे ‘डान्सिंग गर्ल’चे प्रसिद्ध कांस्य शिल्प किंवा वेगवेगळ्या पुरातत्त्वीय स्थळांवर उत्खननात उघडकीस आलेल्या मृण्मय मूर्तीं त्यांच्या हातातील बांगड्या भारतीय समाजातील या परंपरेला किमान ५००० वर्षांपासूनचा इतिहास असल्याचे सांगतात. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर या शंखांपासून तयार करण्यात आलेल्या बांगड्यांचे अवशेष सापडले आहेत. या बांगड्या संपूर्ण हातात-दंडापर्यंत घालण्याची परंपरा होती.

सिंधू संस्कृतीशी संबंधित बांगड्यांचे सर्वात प्राचीन पुरावे मेहेरगड या स्थळावर सापडले आहेत. हे स्थळ विद्यमान पाकिस्तानमधील बलुचिस्तानात आहे. या स्थळावर प्राथमिक टप्प्यावर नवाश्मयुगीन संस्कृती विकसित झाली. या संस्कृतीत पशुपालन आणि शेती करण्यास प्रारंभ केला होता. ही संस्कृती इसवी सनपूर्व ७००० ते ३००० या कालखंडात विकसित झाली होती. उत्खननात मिळालेले पुरावे या संस्कृतीच्या विकासाची साक्ष देतात. या संस्कृतीने नंतरच्या ताम्रपाषाण- सिंधू संस्कृतीचा पाया घातला. या स्थळावर झालेल्या उत्खननात सर्वात खालच्या स्तरावर जीर्ण झालेल्या शंखाच्या बांगड्यांचे अवशेष सापडले आहेत. या बांगड्यांचा कालखंड ८००० वर्षांपेक्षाही जुना आहे. या बांगड्याचे पुरावे हडप्पा, मोहेंजोदारो या सिंधू संस्कृतीशी संबंधित अनेक स्थळांवर सापडलेले आहेत. त्यामुळेच हा कुठलाही मौल्यवान दागिना नसला तरी मोठ्या प्रमाणात या बांगड्यांचे उत्पादन होत होते हे मात्र नक्की.

मूलतः मेहेरगढ हे स्थळ किनारपट्टीपासून बरेच लांब असूनही या स्थळावर शंख- शिंपल्यांपासून तयार करण्यात आलेल्या बांगड्या सापडतात. यासाठी साहजिकच व्यापार हे एक महत्त्वाचे कारण आहे. गेल्या १०० वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्थळांवर झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननात गुजरात आणि शंखांच्या बांगड्यांचा संबंध उघड झालेला आहे.

सौजन्य: विकिपीडिया

गुजरातमध्ये होत होते या बांगड्यांचे उत्पादन

गुजरात हे राज्य कलाकुसर आणि सागरी व्यापाराच्या दीर्घकालीन इतिहासासाठी ओळखले जाते. हडप्पाकाळात, धोलाविरा आणि लोथल ही प्रमुख बंदरे होती. धोलाविरा आणि लोथल या दोन्ही ठिकाणी शंख- शिंपल्यांपासून बांगड्या तयार करण्यात येत होत्या, याचे पुरावे सापडले आहेत. या कार्याचे पुरावे म्हणून लोथल येथे भट्टी आणि धोलाविरा येथे लॅपिडरी यांचे अवशेष सापडले आहेत. गुजरातमध्ये, धोलाविरा आणि लोथलपेक्षा आकाराने लहान वस्त्या होत्या आणि ज्या केवळ शेल- वर्किंगसाठी वापरात होत्या.

अधिक वाचा: तब्बल ९३ वर्षांनी मोहेंजोदारोमध्ये सापडला ‘हा’ खजिना! 

खंबातच्या आखातात गोला धोरो नावाचे एक छोटेसे खेडे आहे. त्यालाच बगसरा असेही म्हणतात, हे शेल- वर्किंगचे केंद्र होते. व्ही. एच. सोनावणे, कुलदीप एस. भान, पी. अजितप्रसाद आणि एस. प्रतापचंद्रन यांच्यासह बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पुरातत्त्व आणि प्राचीन इतिहास विभागातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या पथकाने १९९६ ते २००५ या कालखंडात या ठिकाणी उत्खनन केले होते. या उत्खननात शेल- वर्किंगचे अद्वितीय पुरावे उघड झाले. उत्खननातून असे दिसून आले आहे की, वस्तीचा उगम एका लहान शेतकरी समुदायातून झाला असावा. त्यानंतर, या स्थळाच्या उत्तरेकडील अर्ध्या भागात, ५.२० मीटर रुंदीची भव्य तटबंदीचे अवशेष सापडले. तर उरलेल्या भागात शंख शिंपल्यांपासून वस्तू तयार करण्याची कार्यशाळा होती. या स्थळाच्या कच्छच्या आखाताजवळील भौगोलिक स्थानाने त्याच्या आर्थिक विकासाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. संशोधन असे सूचित करते की, गोला धोरोचे रहिवासी शंख-शिंपले, अर्ध-मौल्यवान खडे, आणि तांबे यांसारख्या सामग्रीचा वापर करून विविध प्रकारच्या हस्तकला वस्तू आणि गुळगुळीत तकाकी असणाऱ्या सिरॆमिकसदृश्य भांड्यांच्या उत्पादनात गुंतले होते. याव्यतिरिक्त, ते विविध प्रकारच्या कच्च्या मालाच्या वितरणात देखील गुंतलेले होते. कच्छच्या आखाताच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरील नागेश्वर ही आणखी एक प्रमुख परिपक्व हडप्पा कालखंडातील शेल-वर्किंग साठी ओळखली जाणारी वसाहत होती. येथे सापडलेल्या पुराव्यांवरून असे लक्षात येते की, या ठिकाणचे रहिवासी शंख शिंपल्यांपासून वस्तू तयार करत होते. या ठिकाणी खलबत्ते, पाटे-वरवंटे यांसारख्या वस्तूही सापडल्या आहेत. तसेच या ठिकाणी सापडलेला शंख शिंपल्यांचा ढीग नागेश्वर हे प्रमुख उत्पादन केंद्र असल्याचा थेट पुरावा देतो. पुराव्यावरून असे सूचित होते की, येथील रहिवासी शंख शिंपल्यांच्या वस्तू तयार करत होते, तुटलेले दागिने, भांडी आणि कवच निर्मितीचा प्रचंड कचरा हे नागेश्वर हे प्रमुख उत्पादन केंद्र असल्याचा थेट पुरावा आहे. या ढिगाऱ्यात र्बिनेला पायरम या शंखाचे अवशेष आहेत. हा शंख जाड आणि मजबूत असतो. तो कच्छच्या आखाताच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर आढळतो. या शंखाचा वापर प्रामुख्याने बांगड्या तयार करण्यासाठी केला जात होता. वडनगर येथील अलीकडच्या उत्खननात मोठ्या शेल-वर्किंग कार्यशाळेचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे गुजरात ५००० वर्षांहून अधिक कालखंड शंख शिंपल्यांपासून बांगड्या तयार करण्याच्या व्यवसायात अग्रेसर होते हे समजते.

सौजन्य: विकिपीडिया

अशाच प्रकारचे पुरावे पाकिस्तानमधील बालाकोट (२०१९ मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने हल्ला केलेले ठिकाण) येथे देखील आढळतात. या स्थळाचा पुरातत्त्व अभ्यासक जॉनथन मार्क केनॉयर यांनी एक प्रायोगिक अभ्यास केला होता. त्यामुळे शेल-वर्किंगची बारकावे समजण्यास मदत झाली.

बदल हा अपरिहार्यच

एकूणच हडप्पा संस्कृती संदर्भात विचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे या संस्कृतीचा झालेला ऱ्हास. या संस्कृतीच्या ऱ्हासाबरोबरीने अनेक प्रथा परंपरा नष्ट झाल्या असतील असे मानले जाते. परंतु हडप्पाची ‘डान्सिंग गर्ल’ असो किंवा थार आणि कच्छच्या स्त्रिया, किंवा थायलंडमध्ये दूरवर दफन केलेली व्यक्ती असो, काही परंपरा काळाच्याही सीमा ओलांडल्या जातात, याचीच आठवण करून देतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indus valley civilization history of indian bangles 8000 years old the history of bangles in the harappan culture svs
First published on: 19-06-2024 at 14:42 IST