Indus valley civilization सिंधू संस्कृती हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सिंधू संस्कृती अनेकविध गोष्टींसाठी ओळखली जाते. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपी. एखाद्या जागेचा इतिहास नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी लिखित स्वरूपातील कोणतेही साहित्य महत्त्वाचे ठरते. सिंधू संस्कृतीने भारतीय इतिहासातील नागरीकरणाचा पहिला टप्पा जगासमोर आणला. त्यामुळे भारतीय इतिहासात किमान ५००० वर्षांपासून लेखन कला अवगत होती हे उघड झाले. सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील लिपी सिंधू किंवा हडप्पा लिपी म्हणून ओळखली जाते. सिंधू लिपी इसवी सनपूर्व ३५०० ते २७०० या कालखंडात विकसित झाल्याचे बहुतांश अभ्यासक मानतात. उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन मृण्मय मुद्रा, मातीची भांडी यांसारख्या अनेक वस्तूंवर ही लिपी कोरलेली सापडली असली, तरी या लिपीचा उगम कोणता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आजही ही लिपी गूढ आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी या लिपीच्या उत्पत्तीविषयी काही महत्त्वाचे तर्क मांडले आहे. काही अभ्यासकांच्या मते या लिपीचे मूळ संस्कृतमध्ये आहे, तर काही अभ्यासक ते द्रविडीयन असल्याचे मानतात. त्याच पार्श्वभूमीवर या लिपीच्या उत्पत्तीसंदर्भात वेगवेगळ्या अभ्यासकांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

सिंधू आणि ब्राह्मी लिपी

भारतीय पुरातत्त्व विभागाचे पहिले संचालक सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना हडप्पा येथे पहिली मुद्रा सापडली होती, ज्यावर हडप्पाकालीन लिपी किंवा चिन्हं होती. या मुद्रेवर दक्षिण आणि आग्नेय आशियातील २०० पेक्षाअधिक लिपींची पूर्वज असलेली ब्राह्मी लिपीची चिन्हे आहेत असे मत कनिंगहॅम यांनी व्यक्त केले होते. कनिंगहॅमनंतर इतर अनेक विद्वानांनीही सिंधू लिपी ब्राह्मीशी जोडण्याच्या बाजूने युक्तिवाद केला. असे असले तरी अनेकांनी या युक्तिवादाला विरोधही केला आहे. त्यात अस्को पारपोला यांच्या नावाचा उल्लेख करणे अनिवार्य ठरते. पारपोला हे हेलसिंकी विद्यापीठातील (Emeritus) प्रोफेसर आहेत, ते कनिंगहॅम यांच्या गृहितकाशी सहमत नाहीत. “ब्राह्मी लिपी पर्शियन साम्राज्यात वापरल्या जाणाऱ्या अरमाईक लिपीच्या आधारे उदयास आली,” असे ते म्हणतात. ब्राह्मी एक वर्णमाला लिपी आहे, जी पर्शियन साम्राज्यातील नोकरशहांनी इसवी सन पूर्व पाचव्या शतकात सिंधू खोऱ्यात आणली होती, शिवाय ब्राह्मी लिपीवर इसवी सन पूर्व ३२६ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट बरोबर भारतात आलेल्या ग्रीक लिपीचाही प्रभाव आहे. परिणामी, सिंधू लिपीशी त्याचा काहीही संबंध असू शकत नाही कारण सिंधू संस्कृती खूप आधी नष्ट झाली होती, असे पारपोला नमूद करतात. हा पारपोला यांचा तर्क असला तरी सिंधू आणि ब्राह्मी लिपी यांच्यातील संबंधाचा पुरस्कार अनेक विद्वान करतात हेही तितकेच खरे आहे, त्यामुळे सिंधू लिपीचा जो पर्यंत पूर्ण उलगडा होत नाही, तो पर्यंत सिंधू आणि ब्राह्मी लिपीतील संबंध पूर्णतः नाकारता येत नाही.

सिंधू लिपी आणि संस्कृत

सिंधू लिपी संस्कृतशी जोडण्याचा प्रयत्नही काही विद्वानांनी केला होता. या संदर्भात सर्वात उल्लेखनीय नाव म्हणजे पुरातत्वशास्त्रज्ञ एस. आर. राव यांचे, त्यांनी लोथलसारख्या काही अत्यंत महत्त्वाच्या हडप्पा स्थळांचा शोध लावला. राव यांच्या युक्तिवादाला अनेक विद्वानांनी वैचारिक पूर्वग्रहाचा परिणाम म्हणून पाहिले. पत्रकार आणि लेखक अँड्र्यू रॉबिन्सन, त्यांच्या ‘लॉस्ट लँगवेज: द अनिग्मा ऑफ द वल्ड्स डिसायफर्ड स्क्रिप्ट्स’, २००८ या पुस्तकात लिहितात; राव यांनी मांडलेला तर्क हा त्यांच्या (राष्ट्रीय) विचारसरणीमुळे पूर्णतः रद्दबादल करणे चुकीचे आहे. सिंधू लिपी/ भाषा ही संस्कृतची पूर्वभाषा आहे, संस्कृत ही उत्तर भारतातील बऱ्याच भाषांची जननी आहे, त्यामुळे आर्यांच्या आक्रमणानंतर संस्कृत भाषा भारतात आली यापेक्षा या भाषेचे मूळ याच मातीत आहे, हे अधिक योग्य वाटते. “सिंधू संस्कृतीच्या नंतरच्या दुसऱ्या सहस्राब्दीमध्ये आर्य सिंधू खोऱ्यात आले हे सूचित करणारे पुरातत्वीय पुरावे आहेत,” म्हणूनच संस्कृतला सिंधू लिपीशी जोडले जाऊ शकत नाही, असे मत पारपोला यांनी व्यक्त केले आहे. मात्र आता मूळातच आर्य असे कुणी वेगळे नव्हतेच. भारतातीलच मंडळी बाहेर गेली आणि परत आली अशा प्रकारचे नवे संशोधन डीएनएच्या आधारे मांडले गेले असून ते आता मान्यता पावते आहे, त्यामुळे पारपोला यांचे गृहितक मोडीत निघते.

अधिक वाचा: तब्बल ९३ वर्षांनी मोहेंजोदारोमध्ये सापडला ‘हा’ खजिना! 

सिंधू आणि द्रविडियन लिपी

पारपोला यांनी १९६४ साली सिंधू लिपीवर काम करण्यास सुरुवात केली, तत्पूर्वी ते ‘ग्रीक लिनियर बी लिपी’वर काम करत होते, यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी सिंधू लिपीच्या क्षेत्रात संगणकाचा वापर करण्यास सुरुवात केली, हे तंत्रज्ञान त्यावेळी नवीन होते. त्यांचा बालपणीचा मित्र सेप्पो कोस्केनेमी हा संगणक तज्ज्ञ होता आणि त्यांचा भाऊ सिमो पारपोला , हे त्यावेळी मेसोपोटेमियन ‘क्यूनिफॉर्म लिपी’वर काम करत होते, या तिघांनी सिंधू लिपीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तिघांच्या अभ्यासातून या लिपीची मुळे द्रविडियन असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पारपोला यांनी स्पष्ट केले की, इसवी सन पूर्व २५०० या कालखंडात जगातील सर्व प्रमुख संस्कृतींमध्ये ‘लोगोसिलॅबिक लिपी’ वापरली गेली. ते म्हणतात, “मुळात त्या कालखंडात लिपी (चिन्हे) ही चित्रे होती, हे एक चिन्ह/ चित्र पूर्ण शब्दासाठी वापरले जात होते.” त्यांच्या मते सिंधू लिपीमध्ये वापरण्यात आलेली संकल्पना आज आपण ‘रिबस’ म्हणून ओळखतो (रिबस म्हणजे आकृतीद्वारे शब्द किंवा वाक्यांश ओळखण्याचे एक प्रकारचे कोडे). “म्हणूनच जर आपल्याला ही लिपी ज्या भाषेवर आधारित आहे ती भाषा माहीत असेल तर आपल्याला लिपीतील काही चिन्हे उलगडण्याची शक्यता आहे,” असे पारपोला म्हणतात. यासाठी पारपोला सिंधू मुद्रांवर सापडणाऱ्या माशाच्या चिन्हाचे उदाहरण देतात. पारपोला यांच्या गृहितकाला पश्चिमेकडील आणि भारतातील अनेक विद्वानांचा पाठिंबा मिळाला आहे, त्यात भारतातील अग्रगण्य सिंधू लिपी संशोधक इरावथम महादेवन यांचाही समावेश आहे. बहता अनसुमाली मुखोपाध्याय (सिंधू लिपी अभ्यासक) देखील भाषिक पुरावे सिंधूकालीन लोक द्रविड भाषा बोलत असावे असे सूचित करतात. भाषाशास्त्रज्ञ पेगी मोहन, जे सिंधू खोऱ्यातील भाषेवर काम करत आहेत, ते म्हणतात की “सिंधू संस्कृतीतील समाज बहुधा द्रविडीयन समाज होता, परंतु त्यांच्या भाषेत आज दक्षिणेत बोलल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा भिन्नत्त्व आढळते.

अधिक वाचा: Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय?

याशिवाय सिंधू लिपीला इतर संस्कृतींशी जोडण्याचा प्रयत्नही झाला आहे, यात प्रामुख्याने ज्या संस्कृतींचे सिंधू संस्कृतीबरोबर व्यापारी संबंध होते त्यांचा समावेश होतो. १९३२ साली इजिप्टॉलॉजिस्ट सर फ्लिंडर्स पेट्री यांनी सिंधू लिपी ही इजिप्तच्या पिक्टोग्राफिक लिपीप्रमाणे हाताळली जावी असे नमूद केले होते. १९८७ मध्ये, ॲसिरिओलॉजिस्ट जे. व्ही. किनियर विल्सन यांनी सिंधू खोरे आणि मेसोपोटेमिया यांच्यातील संबंधांवरून युक्तिवाद केला होता. असाच एक प्रयत्न हंगेरियन अभियंता, विल्मोस हेवेसी यांनी केला होता, त्यांनी १९३२ साली पॅसिफिक महासागरातील इस्टर बेटावरील रोंगोरोंगो मुद्रा आणि सिंधू लिपी यांच्यातील संबंध सुचवला होता. एकूणच अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने सिंधू लिपीच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे असले तरी आजही या लिपीचा उलगडा झालेला नाही. मात्र या संशोधनाने घेतलेले नवे वळण म्हणजे आता या लिपीचा संबंध हा द्रविडी भाषेशी जोडला गेला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indus valley civilization is the indus script related to the dravidian script what does the new research say svs