भारताची दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने १० जानेवारीला टेक्सास फेडरल कोर्टात प्रतिस्पर्धी कॉग्निझंट विरुद्ध प्रतिवाद दाखल केला आहे. अमेरिकन कंपनी कॉग्निझंट आणि त्याचे सीईओ रवी कुमार यांनी इन्फोसिसच्या आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म ‘इन्फोसिस हेलिक्स’च्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्यासाठी स्पर्धाविरोधी डावपेचांचा आणि संवेदनशील माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप इन्फोसिसने केला आहे. कॉग्निझंटची उपकंपनी कॉग्निझंट ट्रायझेट्टोने इन्फोसिसवर आरोग्य सेवा विमा सॉफ्टवेअरशी संबंधित ट्रेड सिक्रेट चोरल्याचा आरोप केल्यानंतर हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिसने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. काय आहे दोन नामांकित आयटी कंपन्यांमधील वाद? त्याविषयी जाणून घेऊ.
इन्फोसिसने खटला दाखल करतेवेळी काय म्हटले?
कॉग्निझंटच्या विरोधात टेक्सासच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टमध्ये दाखल केलेल्या ५० पानांच्या प्रतिदाव्यामध्ये, बंगळुरू येथील इन्फोसिस कंपनीने दावा केला की, कॉग्निझंटला इन्फोसिसच्या कायदेशीर स्पर्धेची इतकी भीती वाटते की ती स्पर्धा रोखण्यासाठी त्यांनी कठोर उपायांचा अवलंब केला आहे. तसेच कॉग्निझंटच्या सीईओवर गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याचा आरोपही या खटल्यात करण्यात आला आहे. “कॉग्निझंटने आपल्या बहिष्कृत एनडीएए (नॉन-डिस्क्लोजर आणि ॲक्सेस करार) तरतुदींद्वारे कृत्रिमरित्या प्रवेश अडथळे निर्माण केले आहेत आणि इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांच्या निष्ठावानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याची स्पर्धात्मकदृष्ट्या संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी त्याच्या शक्तीचा वापर करून अयोग्यतेत गुंतले आहे,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
खटल्यानुसार इन्फोसिसने आरोप केला आहे की, हेलिक्स प्लॅटफॉर्मच्या विकास आणि विक्रीमध्ये आघाडीवर असलेल्या कुमार यांना गोपनीय माहितीची जाणीव होती आणि त्यांनी नवीन प्रोग्रामिंग टॅलेंटला प्रकल्पात जागा न दिल्याने प्लॅटफॉर्मची सुरुवात मंदावली, असे बिझनेसच्या वृत्तात म्हटले आहे. “कुमार यांनी इन्फोसिसमध्ये वरिष्ठ पदावर असताना इन्फोसिस हेलिक्सविषयी उत्साह दाखवला होता, पण कुमारचा इन्फोसिस हेलिक्स उत्पादनाबद्दलचा आशावाद आणि उत्साह २०२२ च्या मध्यात अचानक बदलला. त्यांनी इन्फोसिस हेलिक्सचा पाठिंबा मागे घेण्यास सुरुवात केली, आवश्यक संसाधनांच्या विनंत्या नाकारल्या; ज्यामुळे इन्फोसिस हेलिक्सचे काम पूर्ण होण्यास किमान १८ महिन्यांनी विलंब झाला,” असे खटल्यात पुढे सांगण्यात आले आहे.
कुमार यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये इन्फोसिसमधून राजीनामा दिला आणि नंतर ते कॉग्निझंट सीईओ म्हणून रुजू झाले. “इन्फोसिस नेतृत्वाची नियुक्ती करण्याव्यतिरिक्त, कॉग्निझंट इन्फोसिसला कॉग्निझंट उत्पादनांसह इंटरऑपरेबिलिटीमध्ये कृत्रिम अडथळे निर्माण करून इन्फोसिस हेलिक्ससह देयदारांचे गैर-कॉग्निझंट सॉफ्टवेअर बदलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे,” असे त्यात म्हटले आहे. इन्फोसिसने तिप्पट नुकसान भरपाई तसेच वकील शुल्क आणि खटल्याशी संबंधित खर्चाची मागणी केली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, फाइलिंगमध्ये नुकसानीचे प्रमाण उघड केले गेले नाही.
कॉग्निझंटने इन्फोसिसवर कशाचा आरोप केला आहे?
कॉग्निझंटची उपकंपनी ट्रायझेट्टोने ऑगस्टमध्ये इन्फोसिसवर आरोग्य सेवा विमा सॉफ्टवेअरशी संबंधित ट्रेड सिक्रेट चोरल्याचा आरोप केला होता. कॉग्निझंटने ऑगस्ट २०२४ मध्ये यूएस फेडरल कोर्टात इन्फोसिसवर खटला दाखल केला आणि आरोग्य सेवा विमा सॉफ्टवेअरशी संबंधित ट्रेड सिक्रेट आणि मालकीची माहिती चोरीचा आरोप केला. कॉग्निझंटने टेक्सास कोर्टात दावा केला आहे की, इन्फोसिसने प्रतिस्पर्धी उत्पादन विकसित करण्यासाठी या माहितीचा वापर करून TriZetto’s Facets आणि QNXT सॉफ्टवेअरमधून बेकायदापणे डेटा ॲक्सेस केला.
इन्फोसिसने बेकायदापणे कॉग्निझंटच्या डेटाबेसमधील डेटा चोरल्याचा आरोप केला. ही माहिती चोरी करून नवीन सॉफ्टवेअर विकसित केल्याचा आरोपही कंपनीने केला. इन्फोसिसने यावर प्रत्युत्तर देत हे सर्व आरोप फेटाळले आणि हा खटला दाखल झाल्यानंतर कंपनी न्यायालयात आपली बाजू मांडणार असल्याचेही सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर १० जानेवारी रोजी इन्फोसिसने प्रतिदावा दाखल केला. इन्फोसिसच्या प्रवक्त्यानेही हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
या वादामुळे पुन्हा एकदा इन्फोसिस कंपनी चर्चेत आली आहे. यापूर्वी नारायण मूर्ती यांनी गेल्या वर्षी भारतीयांनी आठवड्याला किती तास काम करावे, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या मते भारतीयांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवे. याचाच अर्थ दिवसाला १० तास आणि एकही सुट्टी न घेता आपण काम केले पाहिजे, अशी भूमिका नारायण मूर्ती यांनी मांडली होती. ते स्वत: ‘इन्फोसिस’च्या स्थापनेवेळी आठवड्याला ८५ ते ९० तास काम करायचे, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यावेळी त्यांच्या या भूमिकेवर अमानवी असल्याची टीकाही झाली होती, त्यानंतर अनेक मुलाखतींत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.
हेही वाचा : स्किझोफ्रेनियाग्रस्त आईने केली मुलाची हत्या; काय आहे हा विकार?
नुकतंच इन्फोसिस पगारवाढीच्या निर्णयामुळे चर्चेत आली होती. ‘इन्फोसिस’ने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढीची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीने २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने नफ्यात जवळपास पाच टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर काही महिन्यांनी हा निर्णय समोर आला आहे.