सी. ए. डॉ. विनायक म. गोविलकर
पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला?
Facts about of Indian Union Budget : भारताचा पहिला अर्थसंकल्प १८६० मध्ये स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश संसदेचे सदस्य जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. अपेक्षेप्रमाणे, तो इंग्रजीत मुद्रित होता, ज्यामुळे अनेक भारतीय लोकांसाठी तो दुर्गम होता.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचे पहिले वित्तमंत्री आर. के. शनमुखम चेट्टी यांनी सादर केला. हा अंतरिम अर्थसंकल्प होता, कारण तो केवळ सात महिन्यांसाठी होता. चेट्टी यांनी “अंतरिम अर्थसंकल्प” हा शब्दही तयार केला. निवडणुकीच्या वर्षांमध्ये भारतात अजूनही हा शब्द प्रचलित आहे.
हे ही वाचा… विश्लेषण : भारत-मॉरिशस विरुद्ध ब्रिटन-अमेरिका… भारताने मॉरिशसला पाठिंबा दिलेल्या शॅगोस बेटाचा वाद काय आहे?
अर्थसंकल्प हिंदीत कधी मुद्रित केला गेला?
अर्थसंकल्पाच्या इतिहासात १९५५ हे एक महत्त्वाचे वर्ष ठरले, कारण प्रथमच अर्थसंकल्प हिंदी आणि इंग्रजी भाषेत मुद्रित केला गेला. या ऐतिहासिक निर्णयाचे नेतृत्व त्या वेळचे वित्तमंत्री सी. डी. देशमुख यांनी केले होते. हा दस्तऐवज सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आणि समावेशक बनवण्यासाठी त्यांनी तो हिंदीतही छापण्याचा निर्णय घेतला.
अर्थसंकल्प आता डिजिटल स्वरूपात…
कोविड-१९ महामारीच्या काळात अर्थसंकल्प कागदविरहित स्वरूपात मांडला गेला. वित्तमंत्री आता संसदेत इलेक्ट्रॉनिक उपकरणातून अर्थसंकल्प वाचतात आणि खासदारांना अर्थसंकल्पाच्या डिजिटल प्रती मिळतात.
अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत बदल कधी?
१९९९ पर्यंत, अर्थसंकल्प संसदेत सायंकाळी ५ वाजता सादर केला जात होता. बजेटची घोषणा ब्रिटिश वेळेनुसार लंडन आणि भारतात एकाच वेळी करणे सोयीचे व्हावे म्हणून ही वेळ ठरवली होती. ब्रिटन भारतापेक्षा ५ तास ३० मिनिटे मागे आहे, त्यामुळे भारतातील संध्याकाळी ५ वाजता ब्रिटनमध्ये सकाळी ११.३० वाजलेले असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ही वेळ ५० वर्षांपेक्षा जास्त काळ तशीच राहिली.
हे ही वाचा… विश्लेषण : जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात… प्रवासी वाहतूक क्षेत्रात स्थित्यंतर घडविणार?
अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस बदलला…
२०१७ पर्यंत, ब्रिटिश परंपरेनुसार, अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही तारीख बदलून १ फेब्रुवारी केली. या बदलामुळे सरकारला एप्रिल १ पासून धोरणे आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा काळ अधिक मिळाला.
रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्र आहे का?
२०१७ पर्यंत, रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी सादर केला जात होता. मात्र, त्यानंतर तो केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. आता दोन्ही अर्थसंकल्प संयुक्तपणे संसदेत सादर केले जातात. या विलीनीकरणाचे उद्दिष्ट होते – केंद्र सरकारच्या वित्तीय स्थितीचा संपूर्ण आढावा देणे, महामार्ग, रेल्वे आणि जलमार्ग यांच्यातील वाहतूक नियोजन सुधारणे आणि मध्यवर्ती पुनरावलोकनाच्या वेळी वित्त मंत्रालयाला संसाधनांच्या वाटपात अधिक लवचिकता देणे.
सर्वात दीर्घ अर्थसंकल्प कोणता होता?
शब्दसंख्येच्या बाबतीत, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा १९९१ मधील अर्थसंकल्प सर्वात दीर्घ होता. त्याची शब्द संख्या होती १८,६५०. अर्थसंकल्प वाचनाच्या कालावधीच्या दृष्टीने, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे २०२० मधील भाषण सर्वात लांब म्हणजे २ तास ४० मिनिटांचे होते. (तरीही दोन पृष्ठे अपूर्ण राहिली.)
सर्वात लहान अर्थसंकल्प कोणता होता?
वित्तमंत्री एच. एम. पटेल यांचे १९७७ मधील अंतरिम अर्थसंकल्प भाषण हे केवळ ८०० शब्दांचे असून, सर्वात लहान आहे.
सर्वाधिक अर्थसंकल्प कोणाकडून?
मोरारजी देसाई यांनी संसदेत सर्वाधिक १० अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यांच्या पाठोपाठ पी. चिदंबरम (नऊ) आणि प्रणब मुखर्जी (आठ) आहेत.
पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर केले?
होय. जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग या पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर केले आहेत.
हे ही वाचा… वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात का होतात?
काही अर्थसंकल्पांना विशेष नाव?
होय, काही अर्थसंकल्पांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे किंवा परिणामांमुळे विशेष नावे आहेत :
ब्लॅक बजेट : यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेला ७३-७४ चा अर्थसंकल्प त्यातील उच्च वित्तीय तुटीमुळे ‘ब्लॅक बजेट’ म्हणून ओळखला जातो.
कॅरट अँड स्टिक बजेट : १९८६ मध्ये व्ही. पी. सिंग यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला कॅरट अँड स्टिक बजेट म्हणतात कारण त्यातून परवाना राज संपवण्याची सुरुवात आणि तस्कर, काळाबाजार करणारे, आणि करचुकवेगिरी करणाऱ्यांवर तीव्र मोहीम सुरू केली.
एपॉकल बजेट : उदारीकरणाचा अंगीकार करणारे १९९१ चे मनमोहन सिंग यांनी सादर केलेले बजेट म्हणजे एपॉकल बजेट होय.
ड्रीम बजेट : आयकर आणि सीमाशुल्कात मोठी कपात आणि स्वेच्छा उत्पन्न प्रकटीकरण योजना (VDIS) यामुळे पी. चिदंबरम यांनी सादर केलेला १९९८ चा अर्थसंकल्प ड्रीम बजेट म्हणून ओळखले जाते.
रोलबॅक बजेट : अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर सरकारला अनेक प्रस्ताव आणि धोरणे मागे घ्यावी लागल्याने २००२-०३ चा यशवंत सिन्हा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला रोलबॅक बजेट म्हटले जाते.
vgovilkar@rediffmail.com