Intermittent Fasting सध्या प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. जवळ-जवळ सर्वांनाच तासनतास एकाच जागेवर बसून काम करावे लागते. यामुळे रोगांसह लठ्ठपणाही वाढतो. हाच लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही लोक जीमचा पर्याय निवडतात, तर काही जण डाएट करतात. यातच आजकाल ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ हा ट्रेंड सुरू आहे. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ म्हणजे काय, तर अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपवास ठेवणे. डाएटसारखाच वजन कमी करण्याचा हा एक उपाय आहे. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण संतुलित होते, असेही सांगण्यात येते. परंतु, अलीकडील एका अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’मुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित विकारामुळे होणार्या मृत्यूचा धोका ९१% वाढतो, असे या अभ्यासात समोर आले आहे.
एका आंतरराष्ट्रीय परिषदेत या अभ्यासाचे निष्कर्ष सादर करण्यात आले. तज्ज्ञांनी सांगितले की, अभ्यासातील माहिती जरी निर्णायक नसली, तरी अधूनमधून उपवास केल्याने विकार उत्पन्न होऊ शकतात हे सिद्ध होते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास, डाएट करू नये असेही तज्ज्ञांनी सांगितले. खरंच उपवास केल्याने मृत्यूचा धोका वाढू शकतो का? तज्ज्ञ काय सांगतात? ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ म्हणजे काय व ते कोणी आणि कसे करावे? याबद्दल सविस्तर समजून घेऊ या.
अभ्यासात काय?
‘इंटरमिटेंट फास्टिंग’मध्ये तुम्ही दिवसातल्या काही ठराविक तासांमध्ये आहार घेऊ शकता. दिवसातील आठ ते १२ तासांच्या कालावधीतच तुम्ही आहार घेऊ शकता. या वेळेव्यतिरिक्त दिवसभर उपवास केला जातो. एखादी वेळ ठरवून तुम्ही आहार घेतला, त्यानंतर तुम्हाला बरेच तास काही खाता येत नाही. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’मध्ये १६/८ असं एक गणित आहे. त्यानुसार तुम्ही दिवसातले १६ तास खाण्यापासून दूर राहता आणि उरलेल्या ८ तासांतच काही खाऊ शकता.
अशा आहाराचे पालन करणार्या काही व्यक्तींचा अनुभव एका अभ्यासात दिला आहे. या अभ्यासात तीन महिने ते एक वर्ष ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ करणार्या व्यक्तींचा अनुभव जाणून घेण्यात आला आहे. या अभ्यासात वजन कमी करणे, इन्सुलिनची वाढलेली संवेदनशीलता आणि मधुमेहावर नियंत्रण यांसारखे फायदे दिसून आले आहेत. परंतु नुकत्याच सादर केलेल्या एका अभ्यासात, यूएस डेटाबेसच्या आधारावर ८ ते १७ वर्षांच्या कलावधीत २० हजार व्यक्तींवर ‘इंटरमिटेंट फास्टिंग’मुळे झालेल्या परिणामाचा शोध घेण्यात आला. त्यात असे आढळून आले की, जे लोक दररोज आठ तासांपेक्षा कमी वेळेत आहार घेतात, त्यांच्यात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगामुळे होणार्या मृत्यूचा धोका ९१ टक्के जास्त आहे. आधीच ज्यांना हृदयविकार आहे, अशांनी उपवास केल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे होणार्या मृत्यूचा धोका ६६ टक्क्यांनी वाढला आहे.
उपवास करणे किती घातक?
नवी दिल्लीतील फोर्टिस सी-डॉक हॉस्पिटल फॉर डायबिटीज अँड अलाईड सायन्सेसचे अध्यक्ष अनुप मिश्रा यांनी काही स्पष्टीकरण दिले. “हा प्रकार लोकप्रिय होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की, ते आठ तासांच्या कलावधीत त्यांना जे आवडेल ते खाऊ शकतात. दिवसातून आठ तासात पिझ्झा आणि बर्गर खाणे हे आरोग्यदायी नाही”, असे डॉ. मिश्रा म्हणाले.
हार्वर्डच्या अभ्यासात, १२ क्लिनिकल चाचण्यांमध्ये उपवास करणार्या गटाची आणि खाण्यातील कॅलरी कमी करणार्या गटाची तुलना करण्यात आली, त्यामध्ये वजन कमी करण्याच्या परिणामांमध्ये कोणताही फरक आढळला नाही. डॉ. मिश्रा म्हणाले की, दीर्घकाळ ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ निरोगी हृदयासाठी हे घातक ठरू शकते. जेव्हा आपण काही खातो तेव्हा शरीरात साखरेची पातळी वाढते, ज्याचा परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होतो.”
अभ्यासाबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
मॅक्स हॉस्पिटल्समधील कार्डियाक सायन्सेसचे मुख्य संचालक आणि एम्स-नवी दिल्ली येथील कार्डिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. व्ही. के. बहल म्हणाले, “ही पद्धत स्पष्ट नाही. शिवाय असे दिसते की, संशोधक आहाराच्या पद्धती निर्धारित करण्यासाठी प्रश्नावलीवर अवलंबून आहेत. दुसरे म्हणजे यात ‘फूड रिकॉल’ हीदेखील एक समस्या आहे. कारण अनेक लोक, त्यांनी काही दिवसांपूर्वी काय खाल्ले किंवा कधी खाल्ले हे सांगू शकत नाहीत. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अभ्यासात सादर केलेल्या आकडेवारीमध्ये व्यक्तींना मधुमेह आहे की नाही, यासाठी ते औषधे घेत होते की नाही, ते चांगला आहार आणि व्यायाम करत होते का हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे डॉ. मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले.
‘इंटरमिटेंट फास्टिंग’चे काही सकारात्मक परिणाम
गेल्या काही वर्षांपासून असे अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. यात काही सकारात्मक बाबीही पुढे आल्या आहेत. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’मुळे चरबी कमी होण्यास मदत होते, पचन सुधारते, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, ‘इंटरमिटेंट फास्टिंग’मुळे ऑटोफॅजी सुधारते. ऑटोफॅजी ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शरीर पेशींच्या आतमध्ये असलेल्या रचनांची पुनर्निर्मिती सुरू करते आणि कर्करोगासारख्या परिस्थितींमध्ये मदत करते. स्मृतिभ्रंशासाठीदेखील हे फायद्याचे ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांवर ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ केल्याने नेमका काय परिणाम होतो, यावर अद्याप कोणताही अभ्यास झालेला नाही.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे नवे शस्त्र ‘AI’
कोणी आणि कसे करावे?
तज्ज्ञ म्हणतात की, ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ करणे सर्वांसाठी नाही. जास्त कॅलरीची आवश्यकता असणार्या २५ वर्षांखालील तरुण आणि गर्भवती महिलांनी उपवास करू नये. तसेच, मधुमेह असणार्यांनी आणि हृदयविकार असलेल्यांनीही उपवास करू नये, असे डॉ. बहल यांनी सांगितले. दुसरी अत्यावश्यक गोष्ट म्हणजे जेवणाचा कालावधी दिवसा असावा, रात्री उशिरापर्यंत खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’मध्ये जेवणाच्या ज्या वेळा निश्चित केल्या आहेत, त्याच वेळेस जेवण करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कराव्यात, असे तज्ज्ञ सांगतात.