आज कॉफी अनेकांच्या आवडीचे पेय आहे. एका हातात कॉफी आणि कुठल्यातरी गहण विषयावर चर्चा, किंवा कॉफी विथ बुक असे काहीसे इंटेलेक्चुअल चित्र आज सहजच आपल्या नजरेस पडते. किंबहुना इंटेलेक्चुअलस् आणि कॉफी यांचे वेगळेच समीकरण असल्याचे आपण पाहू शकतो. परंतु कॉफीला ‘इंटेलेक्चुअल’ हे वलय प्राप्त होण्यामागता इतिहासही तेवढाच रंजक आहे, हे मात्र येथे विसरून चालत नाही. लेखिका जेसिका पियर्स रोटोंडी यांनी हिस्टरी. कॉम वर नमुद केल्याप्रमाणे कॉफीच्या इतिहासात चौथा सुलतान मुराद याने त्याच्या ऑटोमन साम्राज्यात कॉफी पिणाऱ्यांसाठी मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली होती. तर दुसऱ्या किंग चार्ल्सने लंडनच्या कॉफीहाऊसमध्ये गुप्तहेर नेमले होते, त्याच्या मते राज्यातील सगळ्या अफवांची सुरुवात याच ठिकाणांवरून होते. व्हॉल्टेअर, रुसो आणि आयझॅक न्यूटन यांसारख्या तत्त्ववेत्त्यांनी, सिमोन डी ब्युवॉइर आणि जीन-पॉल सार्त्र सारख्या लेखकांनी याच कॉफी आणि कॉफी हाऊसच्या आश्रयाने आपल्या विचार विनिमयास वाट मोकळी करून दिली होती. त्यामुळेच कॉफी क्रांतिकारक कशी ठरली हे आजच्या दिवशी जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.

ऑटोमन साम्राज्यातील पहिले कॉफी हाऊस

कॉफी हाऊसची पहिली सुरुवात ऑटोमन साम्राज्यात झाली असे मानले जाते. ऑटोमन साम्राज्य, ऐतिहासिकदृष्ट्या तुर्की साम्राज्य म्हणून ओळखले जाते, १४ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात दक्षिणपूर्व युरोप, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेचा बराचसा भाग या साम्राज्याच्या अखत्यारीत होता. १६ व्या ते १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य युरोपच्या पूर्वेकडील प्रदेशावरही या साम्राज्याचे नियंत्रण होते. या साम्राज्यात मूलतः इस्लामिक धर्माच्या नियमाचे पालन करणाऱ्या बहुतांश जनतेसाठी दारू आणि बार यांचा वापर मर्यादित होता. त्याच पार्श्वभूमीवर कॉफीने तसेच कॉफी हाऊसने सामाजिक पातळीवर एकत्रित येण्यासाठी एक पर्यायी जागा दिली. तसेच कॉफीची परवडणारी किंमत, कोणीही सेवन करण्याची असलेली मुभा; या मुळे अनेक शतकांचा बंदिवास सुटला होता.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?

आणखी वाचा: बंगालमधील ‘हे’ मारवाडी व्यापारी घराणे ठरले होते मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनीचे कर्जदाते !

१६३३ सालामध्ये, चौथ्या सुलतान मुराद याने कॉफीचे सेवन हा गुन्हा ठरवला होता. कॉफीचे सेवन करणाऱ्यांना पकडण्यासाठी तो स्वतः वेषांतर करून फिरत असे, त्यांच्या कारकिर्दीत त्याने कॉफी पिणाऱ्या अनेकांचे शिरच्छेद केले होते. त्याच्या मते राज्यातील असंतुष्ट जनता कॉफी पिण्याच्या माध्यमातून एकत्र येत असे. केवळ तोच नाही तर त्याच्या नंतरच्या ऑटोमन सुलतानांनी राज्यातील असंतुष्टांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी १८ व्या शतकात कॉफीहाऊसवर बंदी घातली होती आणि कालांतराने मागे ही घेतली. पण तोपर्यंत, कॉफीहाऊस ही संकल्पना आधीच युरोपमध्ये पसरली होती.

इंग्रजी कॉफी हाऊसेस आणि किंग चार्ल्स दुसरा

लंडनच्या समाजात क्रांती घडवून आणणारा ‘पास्क्वा रोझी’ याने १६५२ साला मध्ये लंडनमध्ये पहिले कॉफी हाऊस उघडले. कॉफी हाऊसची संकल्पना जरी ऑटोमन या साम्राज्यात जन्माला आली तरी या संकल्पनेचा विस्तार हा युरोपियन संस्कृतीने अधिक केला होता. ब्रिटिश संस्कृतीत कॉफी आणि कॉफी हाऊस वृत्तपत्रांच्या-बातम्यांच्या जगातील महत्त्वाचे ठिकाण होते. या कॉफी हाऊस मध्ये अनेक प्रकारच्या बातम्या लिहिल्या गेल्या. मार्कमन एलिस यांनी ‘द कॉफी हाऊस: अ कल्चरल हिस्ट्री’ या आपल्या पुस्तकात ब्रिटन मधल्या कॉफी हाऊस संस्कृतीवर प्रकाशझोत टाकलेला आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे इंग्रजी कॉफी हाऊसचे निश्चित वैशिष्ट्य म्हणजे वृत्तपत्रे आणि पॅम्प्लेट्सने झाकलेले सांप्रदायिक टेबल, जेथे अतिथी खाण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि बातम्या लिहिण्यासाठी जमत असत. कॉफीहाऊस हे १८ व्या शतकातील लंडनमधील बातम्यांच्या उद्योगाचे प्रमुख केंद्र होते, असे एलिस स्पष्ट करतात.

किंग चार्ल्स दुसरा याचे वडील, चार्ल्स पहिले, यांचा इंग्रजी गृहयुद्धादरम्यान शिरच्छेद करण्यात आला होता. १२ जून १६७२ रोजी, चार्ल्स दुसरा याने “खोट्या बातम्यांचा प्रसार, आणि राज्य तसेच सरकार यांच्या विषयी चुकीचे बोलणे रोखण्यासाठी काही आदेश काढले होते, त्यानुसार केवळ कॉफी हाऊस मध्येच नव्हे तर इतर कुठेही सरकार विरोधात निंदनीय बोलणे शिक्षेस पात्र होते. याविरोधात कार्यवाही म्हणून तत्कालीन परराष्ट्र सचिव सर जोसेफ विल्यमसन यांनी लंडनच्या कॉफी हाऊसमध्ये हेरांचे जाळे प्रस्तापित केले होते तसेच डिसेंबर १६७५ साला मध्ये चार्ल्स दुसरा याने लंडनमधील सर्व कॉफी हाऊस बंद करण्याचे आदेश दिले. परंतु ही बंदी केवळ ११ दिवस टिकली. चार्ल्स दुसरा याला त्याच्या विरोधातील खुल्या चर्चेची भीती वाटत होती.

कॉफी हाऊसेस विद्येचे दुसरे माहेर घर

प्रबोधना कालखंडात युरोपात नवीन कल्पनांचा स्फोट झाला. ऑक्सफर्डमध्ये, स्थानिकांनी कॉफी हाऊसला “पेनी युनिव्हर्सिटी” म्हणायला सुरुवात केली होती. यामागील मुख्य कारण म्हणजे एक पेनी कप कॉफी बरोबर, तुम्हाला बौद्धिक चर्चा आणि गंभीर वादविवादात प्रवेश मिळू शकत होता. सॅम्युअल पेपिसने त्याच्या डायरीमध्ये कॉफी हाऊसमध्ये वारंवार ऐकलेल्या उत्तेजक संभाषणाविषयी लिहिले आहे. तत्कालीन कॉफी हाऊसेस काही विशिष्ट ग्राहकांसाठी ओळखली जाता होती; फ्लीट स्ट्रीटजवळील ग्रीसियन कॉफी हाऊस हे व्हिग्स तसेच आयझॅक न्यूटन सारख्या रॉयल सोसायटीच्या सदस्यांच्या बैठकीचे ठिकाण होते, त्यांनी एकदा एका डॉल्फिनचे कॉफी हाऊसच्या टेबलावरच विच्छेदन केले होते. कवी जॉन ड्रायडेन, अलेक्झांडर पोप आणि लेखक जोनाथन स्विफ्ट यांचा वावर विल्स कॉफी हाऊसमध्ये असायचा. किंबहुना लंडन स्टॉक एक्सचेंजचा जन्म जोनाथन कॉफी हाऊसमुळेच झाला होता. लंडन स्टॉक एक्सचेंजपूर्वी शेअर्सच्या व्यापारासाठी जोनाथन कॉफी हाऊसमध्ये गर्दी होत असे, या कॉफी हाऊस मधील अधिकृत व्यापाराचे तास बंद झाल्यानंतर लंडन स्टॉक एक्सचेंजचा जन्म झाला. अशाच प्रकारे लंडन विमा मार्केटची पाळेमुळेही लॉयड्स कॉफी हाऊस मध्ये रोवली गेली होती.

आणखी वाचा: ३३ टक्के महिला आरक्षणाचे मूळ रोवणाऱ्या महिला खासदार कोण होत्या? काय आहे त्यांचा इतिहास?

जर्मनीच्या इतिहासातील कॉफीवरील बंदी

जर्मनीचा ‘फ्रेडरिक द ग्रेट कॉफीच्या इतक्या विरोधात होता की त्याने १३ सप्टेंबर १७७७ रोजी हे पेय पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला. कॉफीच्या आयातीमुळे त्याच्या राज्याला आर्थिक नुकसान होत होते, असे त्याचे मत होते. या भीतीने त्याने मित्रांशिवाय इतर सर्वांना कॉफी विक्रीचे परवाने नाकारले होते, कॉफेची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी रस्त्यावर सैनिकही उभे केले होते. त्याच्या १७९९ च्या एका पत्रात त्याचे कॉफी विषयीचे विचार कळतात, या पत्रानुसार कॉफीचा वापर कमी करण्यासाठी लोकांमध्ये बिअर-सूप पिण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे असे त्याचे मत होते. त्याच्या मृत्यूनंतर कॉफीवरील बंदी उठवण्यात आली.

कॉफी आणि अमेरिकन-फ्रेंच क्रांती

बोस्टन टी पार्टीनंतर अमेरिकेतील वसाहतींमध्ये कॉफी हे देशभक्तीपर पेय म्हणून पाहिले जात असे ज्या वेळेस चहा पिणे कमी झाले. त्या वेळी, अमेरिकन टॅव्हर्नमध्ये दारूबरोबर कॉफी दिली जात होती. बोस्टनमधील ‘ग्रीन ड्रॅगन टॅव्हर्नला’ डॅनियल वेबस्टरने (प्रसिद्ध अमेरिकन वकील) “क्रांतीचे मुख्यालय” असे टोपणनाव दिले होते. कारण येथे अनेक क्रांतिकारी मोहीमा आखल्या गेल्या होत्या. किंबहुना असाच काही प्रकार फ्रेंच क्रांती दरम्यानही घडला होता. कॅफे, क्लब हेच आंदोलक आणि संघटनांसाठी एक आदर्श स्थान होते. या क्रांतीनंतर ही, पॅरिसियन कॅफे संस्कृती विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि त्यांच्या पुढील उत्कृष्ट कृतीवर काम करण्यासाठी लेखक आणि विचारवंतांचा अड्डा बनली होती.

एकूणच ऑटोमन साम्राज्यापासून इंग्लंडपर्यंत, युनायटेड स्टेट्सपासून फ्रान्सपर्यंत, कॉफीहाऊसने विचारांच्या नवीन लहरींना प्रेरणा देणार्‍या मनांची-बुद्धिवंतांची बैठक घडवून आणली.