International Dance Day आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेने आधुनिक बॅले डान्सचे निर्माते समजले जाणारे जॉर्जेस नोवेर यांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करायचे ठरवले. विशेषतः जगभरात हा दिवस नृत्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. नृत्यकला हे भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे; जे विविध संस्कृतींशी जोडले गेले आहे. नृत्यावरून त्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. नृत्य ही एक अशी कला आहे; जी केवळ सादरकर्त्यालाच नाही, तर पाहणार्यालाही सुखद अनुभव देते. नृत्य ही आजची कला नाही. असे म्हटले जाते की, त्रेतायुगात नृत्य हे आध्यात्मिक उपासनेचे साधन होते. भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? भारतात कोणकोणते प्रमुख नृत्यप्रकार आहेत आणि खरेच नृत्यामुळे आरोग्य सुधारते का? याबद्दल जाणून घेऊ या.
भारतीय नृत्यकलेचे बदललेले स्वरूप
ब्रिटिशांच्या शासनकाळात भारतीय संस्कृतीतील नृत्यकलेसह अनेक पारंपरिक कलांचा ओढा असणाऱ्यांकडे असंस्कृत म्हणून पाहिले जायचे. त्यामुळे पारंपरिक कलाकारांचा दर्जा कमी होऊ लागला होता. १९४७ नंतर भारतीय पारंपरिक कला प्रकाशझोतात येऊ लागल्या. प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी शास्त्रीय नृत्याला पुनरुज्जीवित केले. असे म्हणतात की, केवळ अरुंडेल यांनी नृत्य क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच आज अनेक स्त्रिया भरतनाट्यमसह इतर शास्त्रीय नृत्याची साधना करू शकत आहेत.
हेही वाचा : डॉक्टरांना उपचार नाकारण्याचा अधिकार आहे का? कायदा काय सांगतो?
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस आधुनिक नृत्याचे जनक उदय शंकर यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याला पाश्चात्त्य नृत्यनाट्यासह इतर जागतिक कलांशी जोडले. त्यांनी भारतीय नृत्यपरंपरेत आधुनिक बॅले नृत्याचा समावेश केला. भारतीय नृत्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच आज ‘कंटेम्पररी’सारख्या नृत्यप्रकाराला ओळख मिळाली. विसाव्या शतकाच्या मध्यात बॉलीवूड नृत्याच्या उदयाने नृत्यकलेला मुख्य प्रवाहात आणले. बॉलीवूड नृत्यामध्ये पाश्चात्त्य नृत्यशैलींसह शास्त्रीय आणि लोकपरंपरेतील नृत्यांचादेखील समावेश होतो. बॉलीवूड नृत्याने चित्रपट, नृत्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवली. बॉलीवूड नृत्य जगभरात एक मान्यताप्राप्त आणि प्रसिद्ध नृत्यप्रकार झाला आहे.
कंटेम्पररी आणि फ्यूजन नृत्य
भारतातील कंटेम्पररी नृत्यात वैविध्य आहे. त्यात शास्त्रीय प्रकार, लोकपरंपरा आणि आंतरराष्ट्रीय नृत्यशैलीचा समावेश आहे. फ्यूजन नृत्य हा प्रकारदेखील अलीकडे खूप प्रसिद्ध झाला आहे. वेगवेगळ्या नृत्यप्रकारांना एकत्र करून फ्यूजन नृत्य तयार केले जाते. काही जण याला कलात्मक अभिव्यक्ती म्हणतात; तर काही जण हा प्रकार तणाव दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे सांगतात.
अगदी शास्त्रीय नृत्यापासून ते आजच्या फ्यूजन नृत्यापर्यंत या कलेतील प्रकार बदलत गेले आहेत. भारतात ही कला लोकप्रिय करण्याचे श्रेय रुक्मिणी देवी अरुंडेल आणि उदय शंकर यांच्यासारख्या नर्तकांना जाते. मराठी मातीतून जन्मलेली लावणी, केरळमधील मोहिनीअट्टम, पंजाबमधील भांगडा, तमिळनाडूतील भरतनाट्यम, आंध्र प्रदेशमधील कुचिपुडी आदी सर्व नृत्यप्रकारांना जगात ओळख मिळाली आहे. नृत्य केवळ एक कला नसून, तो सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. असे म्हणतात की, नृत्यामुळे व्यक्तीच्या जैविक प्रणालीवर सकारात्मक परिणाम होतो; ज्यामुळे त्याला आरोग्यदायी जीवन लाभते. नृत्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
नृत्याचे आरोग्यदायी फायदे
नृत्यामुळे व्यक्ती जीवनातील समस्या विसरून जाते. त्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर याचा उत्तम परिणाम होतो. एरोबिक डान्स प्रकारामुळे स्मरणशक्ती नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागाची झीज कमी प्रमाणात होते, असे एका अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. वय झाल्यावर हा भाग आकुंचन पावण्याचे प्रमाण वाढते. त्यासह नृत्य करताना वेगवेगळ्या हालचाली लक्षात ठेवाव्या लागतात; ज्यामुळे मेंदूला व्यायाम मिळतो. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, कामाचे नियोजन करण्यासारखी संज्ञानात्मक कौशल्येदेखील नृत्यामुळे सुधारतात.
नृत्याशी संबंधित हालचालींमुळे शरीराची लवचिकता वाढते आणि सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, नृत्यामुळे सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढू शकते; ज्यामुळे तुमचा मूड सुधारू शकतो. नैराश्य किंवा स्मृतिभ्रंश असणार्या रुग्णांमध्येही नृत्यामुळे सकारात्मक बदल दिसून येतात. एका अभ्यासात असे आढळून आले की, ज्या रुग्णांना ‘नृत्य थेरपी’ देण्यात आली, त्या रुग्णांमधील नैराश्याशी संबंधित लक्षणे कमी झाली.
तसेच वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्यामुळे किंवा जॉगिंग करण्यामुळे जितके वजन कमी होते, तितकेच वजन नृत्यामुळेही कमी होते. नृत्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यासदेखील मदत होते. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, नृत्यामुळे शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि ऊर्जेची पातळी वाढते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी नृत्य हा उत्तम मार्ग आहे. या व्यायामामुळे हृदयाचे ठोके स्थिर राहतात. तुम्ही जितक्या वेगाने नृत्य करता तितक्या वेगाने तुमचे हृदय धडधडते आणि त्यामुळे ते निरोगी राहण्यास मदत होते. त्यासह शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
हेही वाचा : इस्रोच्या अहवालातून हिमनदी तलावांबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; भविष्यात तलावफुटीच्या घटना वाढणार?
आजकाल प्रत्येक ठिकाणी नृत्य वर्ग आहेत. नवीन मित्र जोडण्यासाठी नृत्य वर्ग हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे आनंदाची भावना वाढू शकते, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. एका अभ्यासात असे दिसून आले की, नृत्यामुळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तरुण वयापासून नृत्य करण्यास सुरुवात केली, तर शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य उत्तम राहील, असे तज्ज्ञ सांगतात.