उत्क्रांतीच्या टप्प्यावरील अत्यंत प्रगत मानव म्हणजे होमो सेपिअन्स. म्हणजे आपले पूर्वज. त्यांनी कुठून, कसा प्रवास केला, ते सातही खंडांपर्यंत कधी पोहोचले की ते पृथ्वीवर सर्वत्र होते, याबद्दल आपल्याला कायम कुतूहल राहिले आहे. याबद्दल खूप संशोधनही झाले आहे. अनेक गृहितके मांडली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफ्रिकेतूनच अन्य खंडांमध्ये?

आधुनिक मानव आता अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडात कायमस्वरूपी वास्तव्य करतो. पण पूर्वी ही परिस्थिती नव्हती. होमो सेपिअन्स आफ्रिका खंडात सुमारे तीन लाख वर्षांपासून आहेत. त्यापैकी अनेक जण भटकंती करत बाहेर पडले आणि जगभर पसरले असे मानले जाते. मानवी उत्क्रांतीबद्दल  ‘आफ्रिकेतून बाहेर’ ही स्वीकृत संकल्पना आहे.  यानुसार होमो सेपिअन्स आफ्रिका खंडात उत्क्रांत झाले आणि अन्य खंडांमध्ये पसरले. होमोजिनसचे अन्य सदस्य ज्यांना होमिनिन्स म्हणून ओळखले जाते, त्यांना विस्थापित करून हे होमोसेपिअन्स बाहेर पडले.

कँडेलाब्रा गृहितक काय आहे?

काही शास्त्रज्ञांनी कँडेलाब्रा गृहितक विकसित केले. या कँडेलाब्रा किंवा बहुप्रादेशिक गृहितकानुसार, होमो सेपिअन्स युरोप आणि आशिया खंडासारख्या अन्य प्रदेशांतदेखील उत्क्रांत झाले. पण हे बहुप्रादेशिक गृहितक आता नाकारण्यात आले आहे. कारण या भूप्रादेशिक मॉडेलला कोणताही ठोस आधार नाही. सर्व पुरावे आफ्रिकेतून होमो सेपियन्सची उत्पत्ती आणि हालचाल दर्शवितात, अशी माहिती ब्रिस्बेनमधील ग्रिफिथ विद्यापीठातील ऑस्ट्रेलियन रिसर्च सेंटर फॉर ह्यूमन इव्होल्यूशनचे संचालक मानववंशशास्त्रज्ञ मायकेल पेट्राग्लिया यांनी ‘लाइव्ह सायनस’ ला दिली. अलिकडच्या अभ्यासानुसार, होमो सेपियन्स सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतील पूर्वीच्या होमिनिन्सपासून उत्क्रांत झाले आणि आपली प्रजाती सुमारे २००,००० वर्षांपूर्वी किंवा उत्क्रांत झाल्यानंतर सुमारे १००,००० वर्षांनी तिथून प्रथम पसरली, असे पेट्राग्लिया म्हणतात.

आशियामध्ये होमो सेपिअन्स कधी आले?

आपल्या प्रजाती प्रथम आफ्रिकेतून पूर्व भूमध्यसागर प्रदेशात पसरल्या, कदाचित इजिप्त, जॉर्डन आणि इस्रायलजवळील सिनाई प्रदेशातून हे स्थलांतर झाले. सिनाई हा आता वाळवंटी प्रदेश आहे, परंतु शास्त्रज्ञांना वाटते की मानवांनी पहिल्यांदा तिथे प्रवास केला तेव्हा तिथे खूपच हिरवाई होती.

आणखी एका गृहितकानुसार, सुरुवातीच्या आधुनिक मानवांनी आफ्रिकेतून लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या भू-पुलावरून ‘बाब अल मंडेब’ ओलांडून अरबी द्वीपकल्पात स्थलांतर केले आणि हा द्वीपकल्प तेव्हा शेकडो हजार वर्षांपूर्वी हिरवागार असल्याचे मानले जाते. मात्र, २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की असा कोणताही भू-पुल नव्हता. परंतु संशोधकांनी असे नमूद केले की बाब अल मंडेब काही मैल रुंद होता आणि म्हणूनच तो पायी पार केला जात असण्याची शक्यता होती.

पूर्व भूमध्य समुद्रातून, होमो सेपियन्स पूर्वेकडील आशियात लवकर पसरले. पेट्राग्लिया यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले की, सुरुवातीच्या मानवांचे अनेक समूह सुमारे एक लाख वर्षांपूर्वी आशियाच्या जवळच्या किनारपट्टीवर वसले असतील आणि नंतर त्यांच्या अंतर्गत प्रदेशात गेले असतील. ५४,००० ते ४४,००० वर्षांपूर्वी, काही होमो सेपियन्सनी डेनिसोव्हन्स या आणखी एक सुरुवातीच्या मानवी प्रजातीसोबत प्रजनन केले आणि म्हणूनच डेनिसोव्हन्समधील जनुक रूपे आताही अनेक आशियाई लोकांच्या जनुकांमध्ये आढळतात.

युरोपमध्ये आदिमानव कसे आले?

युरोपमध्ये होमो सेपियन्सचे सर्वात जुने पुरावे दक्षिण ग्रीसमधील अ‍ॅपिडिमा गुहेतून मिळाले आहेत आणि ते सुमारे २,१०,००० वर्षांपूर्वीचे आहेत, असे युकेमधील हडर्सफील्ड विद्यापीठातील उत्क्रांतीवादी मानववंशशास्त्रज्ञ मार्टिन रिचर्ड्स यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले.

शास्त्रज्ञ सामान्यतः हे मान्य करतात की आपल्या प्रजाती ५०,००० ते ६०,००० वर्षांपूर्वी युरोपमध्ये कायमस्वरूपी आल्या आणि या काळात त्यांनी त्यांच्याचसारखी अन्य प्रजाती असलेल्या निअँडरथल्ससोबत संघर्ष केला आणि त्यांना नष्ट करून त्यांची जागा घेतली.

ओशियानियामध्ये कधी आगमन?

पॅसिफिक महासागरातील प्रदेश म्हणजे ओशियानिया. पुढे हा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी वगैरे आग्नेय आशियातील बेटांचा प्रदेश झाला. माइटोकॉन्ड्रियल डीएनए डेटिंगवरून असे दिसून आले आहे की होमो सेपिअन्स सुमारे ६०,००० वर्षांपूर्वी आग्नेय आशियात आले होते . तिथून ते प्रागैतिहासिक सुंडा आणि साहुल प्रदेशात पसरले. हे प्रदेश त्यावेळी कोरडे होते.

पुरातत्त्वीय पुरावे असे दर्शवतात की आधुनिक मानव ५०,००० वर्षांपूर्वीपर्यंत न्यू गिनी प्रदेशात होते. आता शास्त्रज्ञांना वाटते की तेथून ते पॅसिफिक बेटांवर पसरले.

उत्तर अमेरिकेत कधी आणि कसे?

मूळ उत्तर अमेरिकन लोकांच्या उत्पत्तीचा प्रमुख सिद्धान्त एके काळी असा होता की ‘पॅलिओ-इंडियन’ लोक सुमारे १३,००० वर्षांपूर्वी सायबेरियाहून बेरिंगिया नावाच्या भू-पुलावरून अलास्कामध्ये आले होते. परंतु पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आता क्लोविसपूर्व वसाहतींचे आणि अगदी जुन्या मानवी पावलांचे ठसे न्यू मेक्सिकोमधून सापडले आहेत, जे सूचित करतात की पहिले उत्तर अमेरिकन लोक त्या मार्गाने आणि कदाचित पॅसिफिक किनाऱ्यावर किमान २३,००० वर्षांपूर्वी आले होते.

दक्षिण अमेरिकेत कधी वसले?

पुरातत्त्व आणि अनुवांशिक पुरावे असे दर्शवतात की सुरुवातीचे आधुनिक मानव उत्तर अमेरिकेतून, मध्य अमेरिकेतून दक्षिण अमेरिकेत पसरले होते, जिथे जीवाश्म आणि पुरातत्त्वीय कलाकृती सूचित करतात की ते सुमारे १५,००० वर्षांपूर्वी आले होते.

अंटार्क्टिकाबाबतचा दावा वादग्रस्त का? अंटार्क्टिकामध्ये पहिला माणूस अमेरिकन शोधक प्रवासी जॉन डेव्हिस होता. तो १८२१ मध्ये या खंडात पोहोचला होता असे म्हटले जाते. मात्र, त्याचा दावा वादग्रस्त आहे. नॉर्वेजियन व्यापारी हेन्रिक बुल किंवा नॉर्वेजियन शोधक कार्स्टन बोर्चग्रेविंक या दोघांनीही १८९५ मध्ये तिथे गेल्याचा दावा केला होता. माओरी आदिवासी सातव्या शतकाच्या सुरुवातीला न्यूझीलंडहून अंटार्क्टिकाला गेले होते, असेही म्हटले जाते, पण अनेक इतिहासकार आणि शास्त्रज्ञांना ते मान्य नाही.