– प्रशांत केणी
सर्वाधिक पाच विजेतेपदे खात्यावर असणाऱ्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी संघ म्हणून ओळखले जाते. पण यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात अडखळती झाली आहे. पहिले तीन सामने त्यांनी गमावल्यामुळे गतहंगामाप्रमाणेच मुंबई साखळीत गारद होणार का, ही चर्चा रंगते आहे. परंतु सुरुवातीच्या सामन्यांमधील अपयशानंतर उत्तरार्धात कामगिरी उंचावत बाद फेरी गाठण्याचा पराक्रम मुंबईने अनेकदा दाखवला आहे. त्यामुळेच हा संघ कुठवर झेप घेणार, याबाबत भाष्य करणे कठीण आहे. दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून या संघांकडून पराभव पत्करणाऱ्या मुंबईचे नेमके काय चुकते आहे, याचा घेतलेला आढावा-
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीत कोणत्या उणिवा जाणवत आहेत?
गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्सची फलंदाजी भक्कम मानली जाते. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव यांच्यासारखे फलंदाज संघात टिकून आहेत, तर लिलावाद्वारे इशान किशनलाही संघात राखले आहे. परंतु प्रत्यक्षात तीन सामन्यांमध्ये मुंबईची फलंदाजी अपेक्षेनुसाार बहरली नाही. रोहितच्या खात्यावर तीन सामन्यांमध्ये फक्त ५४ धावा जमा आहेत. लिलावात ८.२५ कोटी भाव कमावणाऱ्या टिम डेव्हिडने दोन सामन्यांत फक्त १३ धावा काढून घोर निराशा केली आहे. याशिवाय पोलार्ड, डिवॉल्ड ब्रेव्हिस, अनमोलप्रीत सिंग यांच्याकडूनही मोठ्या धावा झालेल्या नाहीत. दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांत खेळू न शकलेल्या सूर्यकुमार यादवने कोलकाताविरुद्ध खेळताना ५२ धावा केल्या आहेत. त्यामुळे इशान, सूर्यकुमार आणि नवोदित टिलक वर्मा यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची फळी समतोल आहे का?
मुंबईच्या गोलंदाजीच्या फळीत अनुभव आणि दर्जाला साजेसा खेळ फक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडून होतो आहे. परंतु टायमल मिल्स, डॅनियल सॅम्स, बशिल थम्पी, पोलार्ड आणि मुरुग्गन अश्विन यांच्याकडून बुमराला अपेक्षित साथ मिळत नाही. गेल्या हंगामात राहुल चहर, ट्रेंट बोल्टसारखे गोलंदाज त्यांच्याकडे हाेते. सॅम्सकडे ७ आणि मिल्सकडे १२ ट्वेन्ट-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी आहे. मिल्सने मुंबईकडून सर्वाधिक सहा मिळवले आहेत, तर सॅम्सने फक्त एक बळी मिळवला आहे. पण दोघेही महागडे ठरले आहेत. मिल्सची ९.९ आणि सॅम्सची १२.६३ धावसरासरी आहे. कोपराला झालेल्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरला संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली, हीच त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.
सामना जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू हा मुंबईचा प्रमुख कच्चा दुवा आहे का?
गतहंगामापर्यंत हार्दिक पंड्यासारखा दर्जेदार विजयवीर खेळाडू मुंबईच्या संघात होता. परंतु लिलावाआधी निवड प्रक्रियेत गुजरात टायटन्सनी पंड्याला संघात घेऊन कर्णधारपदही सोपवले. यंदा कृणाल पंड्यासुद्धा मुंबईच्या संघात नाही. डॅनियल सॅम्सला अष्टपैलू खेळाडू म्हणून मुंबईने संधी दिली. परंतु तो संघाचा तारणहार बनू शकलेला नाही. पोलार्डच्या खेळात आता पहिल्यासारखी स्फोटकता राहिलेली नाही.
रोहितचे नेतृत्व मुंबईला तारेल का?
रोहितला ‘आयपीएल’मधील सर्वांत यशस्वी कर्णधार मानले जाते. २०१३ला रोहितने नेतृत्व स्वीकारल्यानंतर मुंबईने आतापर्यंत पाच विजेतेपदे पटकावली आहेत. मात्र यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये धावांसाठी झगडणाऱ्या रोहितच्या कर्णधारपदाचे कौशल्यही अद्याप दिसून आलेले नाही. सांघिक समतोल साधणारी संघरचना रोहितला साकारता आलेली नाही. भारतीय संघाचे तिन्ही प्रकारांत नेतृत्व करणारा रोहित संघाला विजयपथावर आणून बाद फेरीपर्यंत नेईल, अशी आशा जाणकारांकडून केली जात आहे.
मुंबई इंडियन्सनी याआधीच्या हंगामांमध्येही सुरुवातीच्या अपयशांनंतर बाद फेरी गाठली होती का?
सुरुवातीच्या टप्प्यातील अनेक सामन्यांत पराभव पत्करूनही उत्तरार्धातील सामन्यांमध्ये कामगिरी उंचावत बाद फेरी गाठणे, ही मुंबई इंडियन्सची ‘आयपीएल’मधील खासियत आहे. २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१५, २०१७, २०१९, २०२० असे नऊ वेळा या संघाने बाद फेरी गाठली आहे. २०११मध्ये मुंबईने पहिल्या १० सामन्यांपैकी ८ सामने जिंकत सुरुवात चांगली केली. पण तीन सामने गमावल्यामुळे आव्हान टिकवणे त्यांना कठीण झाले होते. पण अखेरच्या सामन्यातील विजयामुळे त्यांना तारले. २०१२च्या हंगामात पहिल्या आठ सामन्यांपैकी मुंबईला चार सामने जिंकता आले होते. परंतु उर्वरित आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकत या संघाने बाद फेरी गाठली. २०१४च्या हंगामातील संयुक्त अरब अमिरातीमधील पहिल्या टप्प्यात मुंबईने पहिले पाचही सामने गमावले. त्यामुळे त्यांच्याकडून माफक अपेक्षा केल्या जात होत्या. परंतु भारतातील दुसऱ्या टप्प्यात या संघाने कात टाकली आणि उर्वरित नऊपैकी सात सामने जिंकत बाद फेरीत स्थान मिळवले. यापैकी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात १९० धावांचे लक्ष्य अपेक्षित १४.३ षटकांत पेलल्यामुळेच मुंबईला चौथे स्थान मिळवता आले. २०१५मध्येही खराब गोलंदाजीमुळे मुंबईने पहिले चार सामन्यांत ओळीने पराभव पत्करला. पण त्यानंतर १० पैकी आठ सामने जिंकून मुंबईने रुबाबात बाद फेरीत प्रवेश केला. याशिवाय २०१६, २०१८, २०२१ या हंगामांमध्ये मुंबईला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने बाद फेरीचे स्वप्न अधुरे राहिले. परंतु २०१०, २०१७, २०१९, २०२०च्या हंगामांमध्ये साखळीत अव्वल आणि २०१३च्या साखळीत दुसरे स्थान मिळवत मुंबईने बाद फेरीत स्थान मिळवले होते.