इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामाला शनिवारपासून (२२ मार्च) सुरुवात झाली. या स्पर्धेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून कोणता संघ जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणार याची चर्चा केली जात आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणे अपेक्षित आहे. त्यांच्यासह अन्य कोणते संघ चमक दाखवू शकतात याचा आढावा.
मुंबई इंडियन्स (जेतेपदे : २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०)
‘आयपीएल’ इतिहासात सर्वांत यशस्वी संघांपैकी एक म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते. मुंबईचा संघ २३ मार्चला चेन्नईविरुद्ध या हंगामातील पहिला सामना खेळेल. गेला हंगाम मुंबईसाठी निराशाजनक ठरला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील हा संघ अखेरच्या स्थानी राहिला. त्यांना १४ पैकी दहा सामन्यांत पराभूत व्हावे लागले. आता कामगिरी उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
बलस्थाने
– मुंबईच्या संघाकडे जागतिक स्तराचे फलंदाज आहेत. सलामीला अनुभवी रोहित शर्मा आहे. त्याला रायन रिकेल्टनची साथ मिळेल. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स आणि हार्दिक पंड्या यांच्यामुळे मुंबईची फलंदाजी मजबूत दिसते.
– मुंबईकडे चांगले अष्टपैलू आहेत, ज्यामध्ये फिरकी व वेगवान गोलंदाजीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. सँटनर, जॅक्स, युवा राज बावा आणि स्वत: हार्दिक दोन्ही विभागांत योगदान देऊ शकतील.
कच्चे दुवे
– गेल्या हंगामातील निराशा मागे सोडून मुंबईच्या संघाला नव्याने उभारी घ्यावी लागेल. गेल्या आणि यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामादरम्यान हार्दिकची कामगिरी सुधारली आहे. आता त्याचे नेतृत्वही महत्त्वाचे असेल.
– वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळणार नसल्याने मुंबईच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे. ट्रेंट बोल्ट व दीपक चाहर यांच्यावर संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदार असेल.
चेन्नई सुपर किंग्ज (जेतेपदे : २०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३)
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करेल. गेल्या हंगामात ते पाचव्या स्थानी होते. महेंद्रसिंह धोनी नेहमीच आकर्षण राहिलेला आहे. यंदाही त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. चेन्नईकडे डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज यांसारखे चांगले सलामीवीर आहे. त्यातच रचिन रवींद्र आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे संघ आणखी भक्कम दिसतो. या दोघांशिवाय शिवम दुबे, दीपक हुडा, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, सॅम करन यांसारखे अष्टपैलूंचे पर्याय उपलब्ध आहेत,
बलस्थाने
– चेन्नईची फलंदाजी भक्कम दिसत आहे. ऋतुराज गेल्या काही हंगामात संघासाठी निर्णायक कामगिरी करीत आहे. मधल्या फळीत राहुल त्रिपाठी, जडेजा व धोनी यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.
– लिलावातील खेळाडूंच्या खरेदीमुळे चेन्नईकडे अष्टपैलूंचे चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. संघाकडे तब्बल ११ अष्टपैलू आहेत. त्यामुळे इतर संघांच्या तुलनेने ते उजवे ठरतात.
कच्चे दुवे
– चेन्नईने तुषार देशपांडे आणि दीपक चहर यांसारख्या वेगवान गोलंदाजांना संघमुक्त केले. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची भिस्त मथीश पथिरानाला सांभाळावी लागणार आहे.
– चेन्नई संघात अष्टपैलूंची संख्या मोठी असल्याने नक्की कोणाला संधी द्यायची हे ठरविताना चेन्नईच्या व्यवस्थापनाचा गोंधळ होऊ शकेल.
पंजाब किंग्ज
यंदाच्या हंगामातील जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये पंजाब किंग्ज संघाचे नाव घ्यावे लागले. गेल्या हंगामात पंजाबचा संघ नवव्या स्थानावर होता. मात्र, त्यानंतर लिलावात सर्वाधिक लक्ष हे पंजाबने वेधले होते. श्रेयस अय्यरवर दुसरी सर्वाधिक बोली लावत पंजाबने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार असलेल्या अय्यरवर यंदा पंजाबने नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. या लिलावामध्ये पंजाबने संघबांधणी चांगली केली. पंजाब आपल्या मोहिमेची सुरुवात गुजरात टायटन्सविरुद्ध २५ मार्चला करेल.
बलस्थाने
– जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू या संघाकडून खेळताना दिसतील. यामध्ये मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यान्सन आणि अझमतुल्ला ओमरझाई यांचा समावेश आहे.
– संघाची वेगवान गोलंदाजीही यंदा चांगली दिसते आहे. अर्शदीप सिंगसह लॉकी फर्ग्युसन, यान्सन सांरखे गोलंदाज संघाकडे आहे.
कच्चे दुवे
– पंजाबने अनुभवी फिरकीपटू यजुवेंद्र चहलला मोठ्या किमतीत खरेदी केले. मात्र, त्याच्या व्यतिरिक्त पंजाबकडे अनुभवी फिरकीपटू नाही. हरप्रीत ब्रारने यापूर्वी काही सामन्यांत चांगली कामगिरी केली असली तरी त्यात सातत्य नाही.
– या हंगामात कायम राखलेल्या प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंह या खेळाडूंवर अधिक दडपण असेल. तसेच सलामीला कोणाला पाठवायचे हासुद्धा पंजाबसमोर प्रश्न आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (जेतेपदे : २०१२, २०१४, २०२४)
गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने लिलावापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरला संघमुक्त केले. यावेळी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या हंगामातील जेतेपदात गौतम गंभीरचे मोलाचे योगदान होते. मात्र, गंभीर भारताचा प्रशिक्षक झाल्याने त्याला कोलकाताचा प्रेरक (मेन्टॉर) म्हणून काम करता येणार नाही. त्यामुळे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यावर अधिक लक्ष असेल. कोलकाता सलामीला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध खेळेल.
बलस्थाने
– कोलकाताची फलंदाजी चांगली आहे. क्विंटन डिकॉक, रहमानुल्ला गुरबाझ, रोव्हमन पॉवेल, रहाणे यासारखे फलंदाज संघाकडे आहे. तसेच, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर व आंद्रे रसेल सारख्या अष्टपैलूंचा भरणा संघात आहे.
– कोलकाताची गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. संघात सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती सारखे फिरकीपटू असून ते सामन्याला कलाटणी देण्यास सक्षम आहेत. यासह हर्षित राणा, आनरिक नॉर्किएसारखे वेगवान गोलंदाज संघाकडे आहेत.
कच्चे दुवे
– अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची जबाबदारी दिल्याने त्याला नव्याने संघरचना करावी लागेल. स्थानिक स्पर्धेत रहाणेने मुंबईला ट्वेन्टी-२० प्रारूपात यश मिळवून दिले होते. त्यामुळे कोलकाताचे जेतेपद कायम राखण्यात तो कितपत यशस्वी ठरतो हे पाहावे लागेल.
– कोलकाताची मदार ही नेहमीच फिरकीवर राहिली आहे. मात्र, यंदा त्यांना जेतेपद कायम राखायचे झाल्यास वेगवान गोलंदाजांना कामगिरी उंचावणे अपेक्षित आहे.
सनरायजर्स हैदराबाद (जेतेपद : २०१६)
गेल्या हंगामातील उपविजेत्या सनरायजर्स हैदराबादचे लक्ष यंदा कामगिरी उंचावण्याचे असेल. हैदराबादने नेहमीच प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यातच संघ सर्वच आघाड्यांवर चांगला दिसत आहे. यावेळी त्यांच्या फलंदाज व अष्टपैलूंकडून पुन्हा सर्वांना अपेक्षा असणार आहेत. त्यांच्या फलंदाजांनी आपल्या आक्रमक खेळाने लक्ष वेधले होते. ते राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळतील.
बलस्थाने
– हैदराबादची फलंदाजी ही नेहमीच त्यांची ताकद राहिली आहे. संघाकडे ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासन, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि इशान किशन सारखे आक्रमक फलंदाज आहेत.
– संघाचा वेगवान गोलंदाजी मारा चांगला आहे. कर्णधार कमिन्स व मोहम्मद शमी सारखे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले गोलंदाज संघात आहेत. त्यांना हर्षल पटेल, विआन मुल्डर यांची साथ मिळेल.
कच्चे दुवे
– संघाच्या आघाडीच्या फळीत आक्रमक फलंदाज असल्याने ते बाद झाल्यानंतर मध्यक्रमात तशा तोडीचे फलंदाज नाहीत. त्यामुळे सुरुवातीलाच बळी गमावल्यास संघ अडचणीत येऊ शकतो.
– ॲडम झॅम्पा आणि राहुल चाहर वगळल्यास संघात इतर चांगले फिरकीपटू नाहीत. त्यामुळे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर संघाला अडचण येऊ शकते.
राजस्थान, बंगळूरुला संधी?
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघांनी गेल्या हंगामात ‘प्लेऑफ’पर्यंत मजल मारली होती. यंदाही या दोन्ही संघांचा प्रयत्न कामगिरीत सातत्य राखण्याचा असणार आहे. अजूनही जेतेपदापासून वंचित असलेल्या बंगळूरुची धुरा यंदा रजत पाटीदारकडे आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाकडे सर्वांचे लक्ष असेल. ट्वेन्टी-२० प्रारुपात सॅमसन चांगल्या लयीत आहे. यशस्वी जैस्वालही चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. यासह दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्सही इतर संघांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. दिल्ली व लखनऊ संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत, तर गिलकडे गुजरातचे नेतृत्व कायम आहे.
यंदा नऊ भारतीय कर्णधार…
यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात नऊ भारतीय खेळाडू नेतृत्व करताना दिसतील. केवळ पॅट कमिन्स हा परदेशी खेळाडू सनरायजर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवेल. यावेळी ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज), अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स), शुभमन गिल (गुजरात टायटन्स), अजिंक्य रहाणे (कोलकाता नाइट रायडर्स), ऋषभ पंत (लखनऊ सुपर जायंट्स), हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स), श्रेयस अय्यर (पंजाब किंग्ज), संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स), रजत पाटीदार (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) हे भारतीय खेळाडू कर्णधाराची भूमिका बजावतील.