आयपीएल संघांची ख्याती स्पर्धेपल्याडही पसरली आहे. दक्षिण आफ्रिका, युएई तसंच कॅरेबियन लीगमध्ये आयपीएल संघमालकांचे संघ आहेत. आयपीएल ब्रँड यशस्वी झाल्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण त्याचवेळी आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या लीगमधील संघांमुळे कसोटी क्रिकेट संपुष्टात येणार अशी भीती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी यासंदर्भात सूचक भाष्य केलं आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी दुय्यम संघ निवडण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या निर्णयासंदर्भात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टीव वॉ काय म्हणाले?
“कसोटी क्रिकेटच्या विनाशासाठी हा सूचक संकेत आहे. कसोटी क्रिकेट टिकावं यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांनी पुढाकार घ्यायला हवा. कसोटी खेळण्यासाठी जगभरात सगळ्या खेळाडूंना समान मानधन असं करता येऊ शकतं. ही परंपरा सुरू राहावी. पैसा आणि नफा एवढंच आपण पाहणार असू तर डॉन ब्रॅडमन, सर गारफिल्ड सोबर्स यांचा वारसा आपण जपू शकणार नाही. न्यूझीलंड दौऱ्यासाठी दुय्यम संघ पाठवण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय ही वाईटाची सुरुवात असू शकते. मी न्यूझीलंडच्या जागी असतो तर ही मालिकाच खेळलो नसतो. ते का खेळत आहेत कल्पना नाही. हा न्यूझीलंड क्रिकेटचा अपमान आहे”, असं वॉ यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दुय्यम संघ
काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेने संघ जाहीर केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. हा संघ पाहून अनेकांना काहीतरी चूक झालेय किंवा गडबड झाल्यासारखं वाटलं. कारण या संघात नेहमीचे खेळाडू दिसेना. कर्णधारही भलताच होता. हा दक्षिण आफ्रिकेचा अ संघ आहे का? अशीही विचारणा काहींनी केली. काहींनी हा फेक फोटो असल्याचं म्हटलं. कोणीतरी फोटोशॉप केलंय अशी टीकाही झाली. पण ही घोषणा खरी होती. साऊथ आफ्रिका क्रिकेटनेच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली होती. संघाचं नेतृत्व नील ब्रँड या खेळाडूकडे सोपवण्यात आल्याचं म्हटलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा टिळाही न लागलेल्या ब्रँडकडे संघाची धुरा सोपवण्यात आल्याने गूढ अधिकच वाढलं. १५ सदस्यीय संघात फक्त ७ खेळाडू असे आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. बरं हे सातही काही नावाजलेले खेळाडू नव्हेत. त्यांचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मर्यादितच म्हणावा असा. न्यूझीलंडमध्ये खेळणं नेहमीच आव्हानात्मक मानलं जातं. बोचरे वारे, थंडी, चेंडूला मिळणारा स्विंग यामुळे तिथे खेळणं कठीणच असतं. न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर सहजी हरत नाही. असं सगळं असताना तुल्यबळ संघ पाठवायचं सोडून हा कोणता संघ निवडला यावर सोशल मीडियावर काथ्याकूट झाला.

कसा आहे न्यूझीलंडचा दौरा?
दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यात दोन कसोटी खेळणार आहे. पहिली कसोटी ४ ते ८ फेब्रुवारी इथे माऊंट मांघनाई इथे होणार आहे. दुसरी कसोटी १३ ते १७ फेब्रुवारी या दरम्यान हॅमिल्टन इथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडमधली कसोटीतली कामगिरी सुधारण्याची संधी होती. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडमध्ये २२ कसोटी खेळल्या असून त्यापैकी ९ जिंकल्या आहेत, २ हरले आहेत तर ११ अनिर्णित राहिल्या आहेत. विशेष म्हणजे या दुय्यम अशा दक्षिण आफ्रिका संघाबरोबर नेहमीचा सपोर्ट स्टाफ असणार आहे.

लीगमुळे दुय्यम संघ निवडण्याची पहिलीच वेळ?
लीगमुळे राष्ट्रीय संघ दुय्यम निवडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्यावर्षी या लीगचे आयोजन सुरळीत व्हावं यासाठी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियात होणार असलेली वनडे सीरिज रद्द केली. ही सीरिज रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमधील सहभाग धोक्यात आला होता. पण नेदरलँड्सविरुद्धची मालिका जिंकत दक्षिण आफ्रिकेने वर्ल्डकपसाठी पात्र होण्याचा मान पटकावला.

लीगचा इतिहास
दक्षिण आफ्रिकेने २०१७ मध्ये ट्वेन्टी२० ग्लोबल लीग सुरू केली. प्रक्षेपण हक्क, प्रमुख प्रायोजक यांचीच वानवा असल्याने वर्षभरात या लीगने गाशा गुंडाळला. २०१८ मध्ये मझांसी सुपर लीग सुरू करण्यात आली. दोन वर्ष लीग आयोजित करण्यात आली पण आर्थिक पातळीवर यशस्वी होऊ शकली नाही. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे लीगचं आयोजन होऊ शकलं नाही. २०२२ मध्ये क्रिकेट साऊथ आफ्रिकेने ‘आफ्रिका क्रिकेट डेव्हलपमेंट लिमिटेड’ नावाची कंपनी स्थापन केली. त्याअंतर्गत SA20 लीगचं आयोजन सुरू करण्यात आलं. क्रिकेट साऊथ आफ्रिकेकडे ५० टक्के समभाग आहेत तर सुपरस्पोर्ट या प्रक्षेपणकर्त्या कंपनीकडे ३० टक्के समभाग आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ या लीगचा कमिशनर आहे. स्पर्धेत सहा संघ असून, पहिल्या वर्षी सनरायझर्स इस्टर्न केप संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं.

काय आहे दुय्यम संघनिवडीमागचं कारण?
दक्षिण आफ्रिका बोर्डातर्फे आयपीएलच्या धर्तीवर ट्वेन्टी२० लीग आयोजित करण्यात येते. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ही लीग होते. या लीगमध्ये क्रिकेट साऊथ आफ्रिका मुख्य भागीदार आहे. लीगच्या करारानुसार, SA20 लीगमधील फ्रँचाइजींशी करारबद्ध खेळाडूंचा कसोटी निवडीसाठी विचार होणार नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर लीग सुरू असताना कसोटी मालिका आयोजित करण्यात आली तर करारबद्ध खेळाडूंना लीगमध्येच खेळावं लागेल. दक्षिण आफ्रिका बोर्डाची स्वत:चीच लीग असल्याने या स्पर्धेत सगळ्या प्रमुख खेळाडूंना खेळणं क्रमप्राप्त आहे. लीगच्या काळातच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका होते आहे. करारानुसार सगळे प्रमुख खेळाडू लीगमध्ये खेळणं अनिवार्य असल्यामुळे त्यांचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी विचार होऊ शकलेला नाही. यामुळेच न्यूझीलंड दौऱ्यासाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा संघ निवडण्यात आला.

कोण आहेत ट्वेन्टी२० लीगमधील संघचालक?
आयपीएल संघांनीच या ट्वेन्टी२० लीगमधील संघ खरेदी केली आहेत. आयपीएलमधल्या लखनौ सुपरजायंट्स संघमालकांच्या संघाचं नाव ‘डरबान सुपर जायंट्स’ असं आहे. धोनीचा संघ म्हणून प्रसिद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या मालकांनी ‘जोहान्सबर्ग सुपर किंग्स’ असा संघ तयार केला आहे. आयपीएल स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने ‘एमआय केपटाऊन’ असा संघ उभारला आहे. आयपीएल स्पर्धेत २००८ साली पहिलंवहिलं जेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने ‘पार्ल्स रॉयल्स’ संघाची बांधणी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने इथे ‘प्रिटोरिया कॅपिटल्स’ची रचना केली आहे तर सनरायझर्स हैदराबादने ‘सनरायझर्स इस्टर्न केप’ असा बंधू संघ निर्माण केला आहे. स्पर्धा दक्षिण आफ्रिकेची असली आणि खेळाडूही प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेचे असले तरी संघचालक मात्र भारतीय आहेत. या लीगमधूनच फ्रँचाइजींना दक्षिण आफ्रिकेतील गुणवान खेळाडूंना माहिती मिळते. हे खेळाडू कालांतराने आयपीएल स्पर्धेत दिसू लागतात. संघमालक भारतीय असले तरी या लीगमध्ये भारतीय खेळाडू खेळू शकत नाहीत. कारण बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय पुरुष खेळाडूंना जगात अन्यत्र ट्वेन्टी२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही.

आयपीएल फ्रँचाइजींचा वाढता पसारा
आफ्रिकेतील लीगव्यतिरिक्त युएईत ‘IL ट्वेन्टी२० लीग’ आयोजित करण्यात येते आहे. या लीगमध्ये ‘दुबई कॅपिटल्स’ हा संघ आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघाच्याच मालकीचा आहे. याच स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या मालकीचा ‘एमआय एमिरेट्स’ हा संघ आहे. याच स्पर्धेतला ‘अबू धाबी नाईट रायडर्स’ हा कोलकाता नाईट रायडर्सच्या मालकाचांच संघ आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या मालकीचा ‘बार्बाडोस रॉयल्स’ हा संघ आहे. केकेआरची सहमालकी असलेला ‘त्रिनिदाद अँड टोबॅगो नाईट रायडर्स’ हा संघ आहे. ‘सेंट ल्युसिया किंग्ज’ हा पंजाब किंग्जच्या मालकीचाच संघ आहे. जगभरातले प्रमुख खेळाडू या ट्वेन्टी२० लीगमध्ये खेळतात. जवळपास प्रत्येक देशात लीग आयोजित केली जाते. प्रत्येक लीग किमान महिनाभर चालते. लीगच्या माध्यमातून चांगला पैसा मिळत असल्याने राष्ट्रीय संघासाठी खेळणं आणि त्यातही कसोटी खेळणं हे खेळाडूंसाठी प्राधान्य राहिलेलं नाही.

आयसीसीचं मानधन प्रारुप
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं मानधन प्रारुप मोठ्या संघांना धार्जिणं आहे. आयसीसीला मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी ३८.५० टक्के रक्कम बीसीसीआयला मिळते. इंग्लंडला ६.८९ तर ऑस्ट्रेलियाला ६.२५ टक्के पैसे मिळतात. भारत-इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांना टॉप थ्री म्हटलं जातं. क्रिकेट साऊथ आफ्रिकेला या रचनेत फक्त ४.३७ टक्के एवढीच रक्कम मिळते. मानधन मिळकत उतरंडीत ते नवव्या स्थानी आहेत. साहजिक आयसीसीकडून दक्षिण आफ्रिका बोर्डाला जेमतेम प्रमाणात निधी मिळतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl franchise growing entourage alarming sign for test cricket psp
Show comments