भारताचा माजी क्रिकेटपटू तथा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संपत कुमार यांनी २०१३ सालच्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग खटल्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे. याच काराणामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असा दावा करत महेंद्रसिंह धोनीने संपत कुमार यांच्याविरोधात ही याचिका केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर नजर टाकुया.
हेही वाचा >>> विश्लेषण : भाजपाच्या लोकांकडून आमदारांना लाच? कथित ‘डील’च्या व्हिडीओने खळबळ, चंद्रशेखर राव यांचे आरोप काय?
धोनीने दाखल केलेल्या याचिकेत काय आहे?
धोनीने दाखल केलेल्या याचिकेबद्दल livelaw.in, ने अधिक माहिती दिलेली आहे. त्यानुसार ‘आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच मद्रास उच्च न्यायालयाबाबत अवनानकारक भाष्य केले आहे. या भाष्यामुळे सामान्य माणसाचा न्यायालयावरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. हा न्यायालयचा अवामान आहे,’ असे धोनीने आपल्या याचिकेत म्हटलेले आहे. न्यायमूर्ती मुदगल समितीने २०१३ सालच्या मॅच फिक्सिंग प्रकरणाशी संबंधित एक अहवाल न्यायालयासमोर सादर केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यातील काही भाग स्वत:कडेच ठेवला. तसेच हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) दिला नाही, असा दावा संपत कुमार यांनी केला होता. संपत कुमार यांनी मद्रास उच्च न्यायालय तसेच महाधिवक्ता, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे काही वरिष्ठ वकील यांच्यावही आरोप केले आहेत, असे धोनीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. तर धोनी यांनी दाखल केलेली याचिका म्हणजे माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रकार आहे, असा आरोप संपत कुमार यांनी केला आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप सातत्याने बंद पडण्यामागचं कारण काय?
१०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई
धोनीने २०१४ साली संपत यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. त्यावेळेस संपत हे इनस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावर कार्यरत होते. मॅच-फिक्सिंगसंदर्भात संपत यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धोनीने न्यायालयामध्ये धाव घेतली होती. संतप यांनी आपल्याविरोधात अशी कोणतीही विधानं करु नयेत असे निर्देश न्यायालयाने द्यावेत अशी धोनीची मागणी होती. तसेच झालेल्या आब्रुनुकसानीचा मोबदला म्हणून १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी अशीही मागणी धोनीने केली होती. न्यायालयाने या पोलीस अधिकाऱ्याला धोनीविरोधात विधानं न करण्याचे निर्देश दिले होते. आयपीएलमध्ये झालेल्या मॅच-फिक्सिंग प्रकरणानंतर या गोष्टी घडल्या होत्या.
२०१३ आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरण काय आहे?
२०१३ साली दिल्ली पोलिसांनी मॅच फिक्सिंगच्या नावाखाली श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण या भारतीय क्रिकेटपटूंना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. हे सर्व खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाशी संबंधित होते. या तीन क्रिकेपटूंसोबतच ११ बुकींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पुढे या प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंग यांनादेखील अटक करण्यात आली होती. या प्रकरणात नंतर आयपीएलमधील काही संघांच्या मालकांचेही नाव समोर आले होते. पुढे या तिन्ही क्रिकेटपटूंची निर्दोष मुक्तता करण्यात आली.