इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामात षटकांच्या धिम्या गतीसाठी आणि इतरही कारणांमुळे खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या दंडाची रक्कम ही लाखांमध्ये असते. या खेळाडूंवर कोणत्या नियमांअंतर्गत कारवाई केली जाते, त्याची अंमलबजावणी कशी होते, तसेच दंडाची रक्कम नक्की कोणाकडून भरली जाते, याचा आढावा.
धिम्या षटकगतीसंदर्भात नियम काय आहे?
‘आयपीएल’साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये सामना वेळेत संपावा यासाठी कडक नियम आहेत आणि त्याचे पालन न झाल्यास दंडही आकारला जातो. धिम्या षटकांसाठी नियमावलीच्या २.२२ अनुच्छेदाचा वापर केला जातो. प्रत्येक संघाला २० षटके पूर्ण करण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी असतो. यामध्ये अडीच मिनिटांच्या दोन ‘टाइम-आऊट’चा समावेश असतो. या ९० मिनिटांमध्ये ‘डीआरएस’, खेळाडूला दुखापत किंवा पंचांकडून केल्या जाणाऱ्या समीक्षेचा समावेश नाही.
धिम्या गतीसाठी कारवाई काय?
एखाद्या संघाला २० षटके निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास अपयश आल्यास या नियमांअतर्गत प्रथम संघाच्या कर्णधाराकडून १२ लाखांचा दंड आकारला जातो. एकाच हंगामात संघाने दुसऱ्यांदा ही चूक केल्यास कर्णधाराला २४ लाख रुपये दंडाच्या रूपाने द्यावे लागतात. तसेच सामन्यात खेळलेल्या अन्य सर्व खेळाडूंना (‘इम्पॅक्ट प्लेयर’ही) सहा लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम यापैकी जी कमी असेल ती दंड स्वरूपात द्यावी लागते. नुकताच राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनवर अशी कारवाई करण्यात आली. याआधी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध राजस्थान संघाला वेळेत षटके टाकता आली नव्हती. त्या वेळी रियान पराग राजस्थानचे नेतृत्व करत होता आणि त्याला १२ लाखांचा दंड झाला होता.
नियमात कोणता बदल?
एका हंगामातील तीन सामन्यांत षटकांची गती धिमी राखल्यास यापूर्वी संघाच्या कर्णधारावर ३० लाख रुपये दंड आणि एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात येत होती. सामन्यात खेळलेल्या अन्य सर्व खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कम यापैकी जी कमी असेल ती दंड स्वरूपात द्यावी लागत होती. यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामापूर्वी सर्व संघाच्या कर्णधारांबरोबर बैठक घेण्यात आली. यामध्ये कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्याचा नियम मागे घेण्यात आला. त्यांना केवळ दोषांक दिले जातील. मात्र, तरीही गतहंगामात मुंबईच्या संघाने तीन वेळा षटकांची गती धिमी राखल्याने हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले.
दिग्वेश, इशांत, मॅक्सवेलवर काय कारवाई?
लखनऊचा फिरकीपटू दिग्वेश राठी आपल्या गोलंदाजीपेक्षा फलंदाजाला बाद केल्यानंतर करण्यात येणाऱ्या कृतीसाठी लक्ष वेधत आहे. तो फलंदाजाला बाद केल्यावर त्याचे नाव आपल्या ‘डायरी’त लिहिल्याची कृती करून आनंद साजरा करतो. मात्र, त्यामुळे तो अडचणीतही सापडला आहे. त्याने दोनदा अनुच्छेद २.५ नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात आली. तसेच त्याच्या नावावर दोन दोषांकही जमा आहेत. यासह अनुभवी इशांत शर्मा आणि आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलवरही अनुच्छेद २.२ नियमानुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन्ही खेळाडूंकडून सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के रक्कम आकरण्यात आली आणि त्यांच्या नावावर एक दोषांकाची नोंद झाली. अनुच्छेद २.२ नियमानुसार स्टम्पला लाथ मारणे, जाहिरातींचे बोर्ड, ड्रेसिंग रूमचे दरवाजे किंवा अन्य कोणत्याही वस्तूचे नुकसान केल्यास खेळाडूंवर कारवाई होते.
खेळाडू दंडात्मक रक्कम कशी भरतात?
खेळाडूंवर कारवाई झाल्यास हा दंड नक्की कोण भरतो, असा प्रश्न चाहत्यांकडून अनेकदा उपस्थित केला जातो. दंड भरण्याबाबत कठोर असा कोणताच नियम नाही. अनेक प्रकरणांत ‘आयपीएल’ संघच आपल्या खेळाडूंवरील दंडात्मक रकमेचा बोजा उचलतात. तसेच काही संघ आपल्या खेळाडूंच्या सामन्यातील मानधनातून ही रक्कम वजा करतात अशीही चर्चा होती. मात्र, त्याचा ठोस पुरावा नाही.
या हंगामात सामन्याचे मानधन किती?
‘आयपीएल’च्या सध्या सुरू असलेल्या हंगामात खेळाडूंना प्रति सामना ७.५ लाख रुपये (जवळपास ९००० अमेरिकन डॉलर) इतके मानधन मिळते आहे. ही रक्कम त्यांच्या संघाबरोबरच्या करारातील रकमेपेक्षा वेगळी असते. याकरिता ‘बीसीसीआय’कडून संघांना आपल्या रकमेत १२.६० कोटी वाढ करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे एक खेळाडू लीगमध्ये सर्व साखळी सामने खेळल्यास त्याच्या खात्यात कराराच्या रकमेशिवाय १.०५ कोटी अतिरिक्त रुपये मिळणार आहेत. ‘बीसीसीआय’ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी तीन लाख रुपये मानधन देते.
© The Indian Express (P) Ltd