दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू कॉर्बिन बॉशने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात सहभागी करून घेतले. यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘आयपीएल’ व ‘पीएसएल’ लीगमधील वादामुळे पुन्हा एकदा या दोन्ही बोर्डांत संघर्षाची ठिणगी पडली आहे. हे प्रकरण नक्की काय, ‘पीसीबी’कडून बॉशवर कोणती कारवाई करण्यात येईल, ‘पीसीबी’ला नेहमीच ‘आयपीएल’बाबत का चिंता असते, याचा घेतलेला हा आढावा.

बॉशच्या ‘आयपीएल’ सहभागाचे कारण

दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशला त्याच्याच देशातील जायबंदी खेळाडू लिझाड विल्यम्सच्या जागी मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले. विल्यम्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. जगातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयपीएल’मध्ये खेळण्याची संधी मिळालेल्या बॉशने ‘पीएसएल’ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ‘पीएसएल’मध्ये पेशावर झाल्मी संघाने हीरक श्रेणीमधून (डायमंड ग्रेड) जानेवारीत झालेल्या लिलावात खरेदी केले होते. यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम हा २२ मार्च ते २५ मे दरम्यान पार पडणार आहे. तर, ‘पीएसएल’चे आयोजन ११ एप्रिल ते १८ मेदरम्यान होईल.

‘पीसीबी’ला ‘आयपीएल’विषयी चिंता का?

‘पीएसएल’च्या संघमालकांना आणखी काही विदेशी खेळाडू ही लीग सोडतील याची चिंता सतावत आहे. बॉशवर ‘पीसीबी’ने कायदेशीर कारवाई केली नाही किंवा कठोर पावले उचलली नाहीत, तर आगामी काळातही ‘पीएसएल’शी करारबद्ध होऊनही संधी मिळाल्यास ‘आयपीएल’मध्ये खेळण्यास जाऊ शकतात, असे संघमालकांचे म्हणणे आहे. ‘आयपीएल’ ही जगातील सर्वात मोठी लीग असून प्रत्येक खेळाडू यामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतो. ‘पीएसएल’च्या तुलनेने यामध्ये पैसेही कितीतरी अधिक मिळत असल्याने खेळाडूंना यामध्ये फायदा होतो. कोणताही खेळाडू जायबंदी झाल्यास लिलावात बोली न लागलेल्या खेळाडूंना संघात सहभागी करता येते. त्यामुळे खेळाडूही ‘आयपीएल’ला प्राथमिकता देत आहेत. ‘‘सर्व देशांच्या मंडळांनी आपल्या खेळाडूंना ‘आयपीएल’ खेळण्यापासून रोखले पाहिजे. ‘बीसीसीआय’ आपल्या खेळाडूंना अन्य लीग खेळण्यासाठी पाठवत नसल्याने इतर मंडळांनीही आपल्या खेळाडूंना ‘आयपीएल’साठी पाठवू नये,’’ असे पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक म्हणाला. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्यासपीठावर आपला एकही अधिकारी नसल्याबाबत ‘पीसीबी’ने ‘आयसीसी’कडे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, स्पर्धा सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत त्यांनी ‘बीसीसीआय’ला डिवचण्याची संधी सोडली नाही. भारताने चॅम्पियन्स करंडकाचे आपले सर्व सामने दुबईत खेळल्याने यजमान म्हणून ‘पीसीबी’ला एक पाऊल मागे घ्यावे लागले होते.

कायदेशीर नोटिशीमध्ये काय?

‘‘बॉशला कायदेशीर नोटीस त्याच्या एजंटमार्फत बजावण्यात आली आहे आणि खेळाडूला त्याच्या व्यावसायिक व करारातील वचनबद्धतेपासून माघार घेण्याच्या त्याच्या कृतीबाबत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. ‘पीसीबी’ व्यवस्थापनाने लीगमधून त्याच्या बाहेर पडण्याचे परिणामदेखील स्पष्ट केले आहेत आणि निर्धारित वेळेत त्याच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. ‘पीसीबी’ या विषयावर पुढील कोणतीही टिप्पणी करणार नाही,’’ असे बॉशला पाठविलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये ‘पीसीबी’ने उल्लेख केला आहे.

‘पीएसएल’च्या तारखांमध्ये बदल का ?

पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) आयोजन फेब्रुवारी-मार्च दरम्यान होते. मात्र, यंदा ‘पीसीबी’चे ‘पीएसएल’ स्पर्धा मार्च-एप्रिलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. अधिकाधिक विदेशी खेळाडू या लीगमध्ये सहभागी व्हावेत हा या निर्णयामागचा हेतू होता. जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान ‘एसए२०’, ‘आयएलटी२०’ आणि ‘बीपीएल’ सारख्या लीगही होतात. त्यामुळे ‘पीएसएल’ला इतर लीगसोबत प्रतिस्पर्धा करावी लागते. अनेक विदेशी खेळाडू या लीगमध्ये खेळण्यास व्यग्र असल्याने ते ‘पीएसएल’मध्ये सहभागी होण्यास प्राथमिकता देत नाहीत. यावेळी ‘पीएसएल’च्या खेळाडूंचा ड्राफ्टही ‘आयपीएल’च्या लिलावानंतर ठेवण्यात आला, जेणेकरून विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत स्पष्टता येण्यास मदत मिळू शकेल. यावेळी ‘आयपीएल’ लिलाव हा नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला. तर, ‘पीएसएल’चा ड्राफ्ट हा जानेवारी २०२५ मध्ये ठेवण्यात आला.

बॉशला अनुभव किती?

कॉर्बिन बॉशने आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले होते. तर, पाकिस्तानविरुद्धच त्याने पहिला कसोटी सामना खेळला. बॉशकडे ‘एसए२०’ व ‘सीपीएल’ लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने ‘एसए२०’मध्ये तीन संघांकडून १४ सामने खेळले असून त्याने यामध्ये १३ गडींसह ७८.९४च्या स्ट्राइक रेटने धावाही केल्या. ‘सीपीएल’मध्ये दोन संघांकडून त्यांना १९ सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्याने ३२१ धावा व ९ बळी मिळवले. बॉशला २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने नॅथन कुल्टर-नाइलच्या जागी सहभागी केले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. एकूण ट्वेन्टी-२० कारकीर्दीत बॉशने ६६३ धावा केल्या असून ५९ गडी बाद केले आहेत.

आयपीएल वि. पीएसएल

आयपीएलची गणना जगातील पहिल्या पाच श्रीमंत खेळ लीगमध्ये होते. आतापर्यंत पाच खेळाडूंना (ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, मिचेल स्टार्क, वेंकटेश अय्यर, पॅट कमिन्स) २० कोटींपेक्षा अधिक लेतन जाहीर झाले आहे. याशिवाय १० ते २० कोटींच्या टप्प्यात असंख्य क्रिकेटपटू आहेत. या तुलनेत पीएसएलमध्ये सर्वाधिक प्लॅटिनम श्रेणीतील क्रिकेटपटूंना साडेतीन कोटींपर्यंत वेतन मिळते. याशिवाय इतर स्पॉन्सरशिप आणि टीव्ही प्रक्षेपणातून आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआयला मिळणाऱ्या, तसेच वैयक्तिक स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून फ्रँचायझींना मिळणाऱ्या रकमेची मोजदाद करणेही अशक्य आहे. या सर्वच पातळ्यांवर पीएसएलचा आवाका आयपीएलपेक्षा फारच तोकडा ठरतो. 

Story img Loader