इराणी तरुणी महसा अमिनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हजारो नागरिकांनी हिजाबविरोधी आंदोलन छेडले आहे. इराणमधील संस्कृतीरक्षक पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर संस्कृतीरक्षक पोलिसांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी यांना संस्कृतीरक्षक पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात महसा यांचा मृत्यू झाला. कट्टरपंथीय संस्कृतीरक्षकांनीच अमिनींचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला संतापाने पेटून उठल्या आहेत.
इराणमध्ये मुस्लिम महिला अचानक केस का कापू लागलेत? कारण…
इराणमधील संस्कृतीरक्षक पोलिसांचे काम काय?
इराणमध्ये संस्कृतीरक्षक पोलिसांना ‘गश्त-ए-अरशाद’ म्हटले जाते. इस्लामिक कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कपड्यासंबंधी नियमांच्या अंमलबजावणीसाठी इराण सरकारने या पोलिसांचे पथक तयार केले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांनी योग्य पद्धतीने हिजाब परिधान केला आहे का हे पाहणे या पोलिसांचे काम आहे. हिजाबच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास या पोलिसांकडून महिलांना अटक करण्यात येते. या पोलीस पथकामध्ये केवळ पुरुषांचा समावेश आहे.
इराणमध्ये हिजाबचे नियम काय आहेत?
इराणमधील सर्व महिलांना हिजाब घालणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. यासाठी वयाबाबत अस्पष्टता असली तरी लहाणपणीच वयाच्या सातव्या वर्षापासून मुलींनी हिजाब घालणे अपेक्षित आहे. लहान मुलींना सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणे बंधनकारक नाही. याशिवाय महिलांना घट्ट कपडे घालण्यास मनाई आहे.
Anti Hijab Protest: गायिकेनं चक्क स्टेजवर कापले केस; कारण जाणून आश्चर्य वाटेल, पाहा व्हिडीओ
महिलांनी डोक्यावर हिजाब घातल्यानंतर केस दिसू नयेत, असाही इराणमध्ये नियम आहे. याच कारणासाठी महसा अमिनींना संस्कृतीरक्षक पोलिसांनी अटक केली होती. सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणे इस्लामिक हिजाब नियमांनुसार दंडनीय गुन्हा आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून राष्ट्रीयत्व किंवा धार्मिक श्रद्धेचा विचार न करता सर्व महिलांनी केस, डोके आणि मान झाकणारा हिजाब घालणे आवश्यक आहे.
विश्लेषण: इराणमधील हिजाब विरोधी आंदोलन जगभर पोहोचवणाऱ्या मसीह अलीनेजाद कोण आहेत?
केस कापून हिजाबचा इराणी महिलांकडून विरोध
मसिह अलिनेजाद या इराणी पत्रकार आणि कार्यकर्तीने ट्विटरवर महिलांचे केस कापतानाचे व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. अलिनेजाद यांच्या पोस्टनंतर अनेक इराणी महिलांनी केस कापतानाचे व्हिडीओ पोस्ट करत हिजाबला विरोध दर्शवला आहे. काही महिलांनी पुरूषी वेष परिधान करत अभिनव पद्धतीने निषेधही व्यक्त केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत काही इराणी महिलांनी हिजाबही जाळला आहे.