सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटना यांच्यातील युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या दोघांत युद्ध सुरू असताना इराण समर्थित येमेनच्या हुथी बंडखोरांनी ‘गॅलेक्सी लीडर’नावाच्या व्यापारी जहाजाचे अपहरण केले आहे. इस्रायलला विरोध म्हणून हुथी बंडखोरांनी ही कारवाई केलेली आहे. या घडामोडी गडत असताना आता इराणच्या नौदलात ‘डेलमन डिस्ट्रॉयर’ नावाचे मोठी युद्धनौका दाखल झाली आहे. हे जहाज इरणने कॅस्पियन समुद्रात तैनात केले आहे. याच पार्श्वभूमीवर या युद्धनौकेचे वैशिष्य काय आहे? या युद्धनौकेमुळे इस्रायलला चिंता करण्याची गरज आहे का? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युद्धनौका ९५ मीटर लांब आणि ११ मीटर रूंद

इराणमधील उत्तरेकडील एका गावाच्या नावावरून या युद्धनौकेले डेलमन डिस्ट्रॉयर (Deilaman Destroyer) असे नाव देण्यात आले आहे. हे विनाशक एकूण १४०० टन वजनाचे असून ५६ किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असताना ते टॉरपीडोसच्या माध्यमातून हल्ला करू शकते. डेलमन डिस्ट्रॉयर ही एक युद्धनौका असून ती ९५ मीटर लांब आणि ११ मीटर रूंद आहे. एका वृत्तावाहिनीनुसार ही युद्धनौका आपल्या लक्ष्याचा शोध घेऊ शकते, त्याची ओळख पटवू शकते तसेच आवश्यक असल्यास हवा, भूपृष्ठावरील धोक्यांशीदेखील सामना करू शकते. या जहाजावर हेलिकॉप्टर उतरण्याची सोय आहे. तसेच हेलिकॉप्टर वाहून नेण्याचीही या जहाजात क्षमता आहे. Mehrnews com संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार हे जहाज मोवज श्रेणीतील जहाज आहे. ‘जेरुसलेम पोस्ट’ या वृत्तसंकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार डेलमन डिस्ट्रॉय हे स्वत: इराणने तयार केले आहे. या डिस्ट्रॉयरची रचना ही जमरान डिस्ट्रॉयरप्रमाणे आहे. जमरान डिस्ट्रॉयरचा २०१० साली इराणच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. मोवज श्रेणीतील हे पाचवे जहाज आहे. तेहरान टाईम्सच्या वृत्तानुसार मोवज श्रेणीतील अन्य युद्धनौकांची नावे देना, साहंद, दामावंद, जमरान अशी आहेत.

“आमचे इतर देशांशी सौहार्दपूर्ण संबंध”

अंझाली बंदरावर डेलमन युद्धनौका इराणच्या नौदलात सामील झाली. या युद्धनौकेच्या अनावरणादरम्यान सशस्त्र सेना जनरल स्टाफचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद हुसैन बाघेरी यांनी प्रतिक्रिया दिली. “इराणचे कॅस्पियन समुद्रकिनारा लाभलेल्या सर्वच देशांची सौहार्दपूर्ण संबंध आहेत. आम्ही हे जहाज तयार करून पुन्हा एकदा या देशांशी असलेल्या मैत्रीबद्दल संदेश दिला आहे. नौदलाच्या इतिहासातील हे जहाज एक उत्कृष्ट नमुना आहे,” असे बाघेरी म्हणाले. आमचे नौदल हे शांतता, व्यवसायाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली जहाजे यांची सुरक्षा तसेच दहशतवाद आणि भविष्यातील घटना यांचा सामना करण्याचे काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

डेलमन युद्धनौका जमरान युद्धनौकेची आधुनिक आवृत्ती

इराणचे नौदल प्रमुख रिअर अॅडमिरल शाहराम इराणी यांनीदेखील या युद्धनौकेबद्दल प्रतिक्रिया दिली. “डेलमन युद्धनौका ही जमरान युद्धनौकेची आधुनिक आवृत्ती आहे. ही युद्धनौका अतिशय प्रभावशाली असून डिटेक्शन, इंटरसेप्शन आणि रेस्क्यू करण्यासाठी फार उपयुक्त आहे,” असे इराणी म्हणाले.

“आम्ही शत्रूंना घुसखोरी करू देणार नाहीत”

“समुद्राच्या मार्गाने शत्रू इराणमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आमच्या देशाचे नौदल, भूदल तसेच इस्लामिक रिव्हॉल्यूशन गार्ड्स कॉर्प्स शत्रूंना घुसखोरी करू देणार नाहीत. आम्ही नेहमीच सतर्क असतो,” असेही इराणी म्हणाले.

इस्रायलने चिंता करायला हवी का?

इराणच्या वायुदलात डेलमन ही युद्धनौका दाखल झाल्यामुळे इस्रायलवर काय परिणाम पडू शकतो, असे विचारले जात आहे. मात्र खाजगी सागरी सुरक्षा कंपनी सीगल मेरीटाईमचे सीओओ दिमित्रीस मॅनिआटिस यांनी सांगितल्यानुसार इराणची ही युद्धनौका म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि इराण यांच्यातील असलेल्या संबंधांना जशास तसे उत्तर आहे. इराणला या युद्धनौकेच्या माध्यमातून होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आमचे नियंत्रण आहे, असे दाखवायचे आहे, असे दिमित्रीस यांनी सांगितले.

इराणच्या युद्धनौका रशिया, अझरबैजान नौदल तळांना भेट देतात

इराणने कॅस्पियन समुद्रात उतरवलेली ही सहावी युद्धनौका आहे. रशिया, अझरबैजान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान या देशांना कॅस्पियन समुद्राचा किनारा लाभलेला आहे. इराणच्या युद्धनौका या कधीकधी रशिया आणि अझरबैजानच्या नौदल तळांना भेट देतात. अझरबैजान आणि इस्रायल या दोन्ही देशांत चांगले लष्करी संबंध आहेत. याच कारणामुळे इराणकडून अझरबैजानवर टीका केली जाते. कारण इराण हा इस्रायलला आपला शत्रू मानतो.

इराणचे कॅस्पियन समुद्रात तीन तळ

दरम्यान, कॅस्पियन समुद्रात नौदलाच्या दृष्टीकोनातून रशिया हा सर्वांत शक्तिशाली देश आहे. १९६० सालापासून इराणने कॅस्पियन समुद्रात आपले वचर्स्व वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इराणी नौदलाचे कॅस्पियन समुद्रात सध्या तीन तळ आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran navy deilaman destroyer ship entered know what effect on israel prd
Show comments