रॅप साँग गाणारा इराणमधील प्रसिद्ध गायक तुमाज सालेही याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि सरकारविरोधात गाणी गायल्याबद्दल त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुमाज सालेहीचा नेमका गुन्हा काय, इराणी सरकारविरोधात आंदोलन का पेटले याचा आढावा…

तुमाज सालेही कोण आहे?

तुमाज सालेही हा इराणमधील गायक आहे. विशेषत: रॅप साँग, हिप हॉप गाण्यांसाठी तो प्रसिद्ध आहे. सामाजिक विषय, सरकारी धोरणे यांविरोधात विशेषत: त्याची गाणी असतात. इराणमधील गर्ड बिशेह शहरात १९९०मध्ये जन्मलेला सालेही एका धातूच्या कारखान्यात मजदूर आहे. मात्र त्याच्या गाण्यांमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. आपल्या गाण्यांद्वारे त्याने निर्भयपणे इराणच्या नेतृत्वावर, त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि मतभेदांवर कडक टीका केली. इराणमध्ये २०२२ मध्ये सरकारविरोधातील आंदोलनात तो सहभागी झाल्याने त्याला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. पण जामिनानंतरही त्याने सरकारविरोधातील आंदोलन सुरू ठेवले. २०२२-२३च्या ‘जान, जिंदगी, आजादी’ (महिला, जीवन, स्वातंत्र्य) या आंदोलनातील आरोपांबाबत त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?

इराणमधील सरकारविरोधी आंदोलन…

इराणमध्ये संस्कृतिरक्षक पोलीस म्हणजे ‘गश्त-ए-अरशाद’ तैनात आहेत. इस्लामिक कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या वस्त्रासंबंधी नियमांच्या अंमलबजावणीसाठी इराण सरकारने हे पोलिसांचे पथक तयार केले आहे. २०२२ मध्ये हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर प्रकृती खालावल्याने महसाचा मृत्यू झाला. कट्टरपंथीय संस्कृतिरक्षकांनीच अमिनी यांचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला तेव्हा संतापाने पेटून उठल्या होत्या. अमिनी यांच्या मृत्यूनंतर अनेक संघटना, नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी संस्कृतिरक्षक पोलीस तसेच महिलांसाठीच्या नियमांचा कडाडून विरोध केला. संपूर्ण इराणमध्ये हे आंदोलन पेटल्यामुळे तेथील सरकार अडचणीत सापडले. याच आंदोलनात तुमाज सालेही याने सहभाग घेतला होता.

हेही वाचा : महायुतीत असूनही अमरावतीत बच्चू कडू भाजपच्या नवनीत राणांच्या विरोधात… ते सतत वादग्रस्‍त का ठरतात?

तुमाज सालेहीचा गुन्हा काय?

२०२२ मध्ये सरकारविरोधात आंदोलन पेटल्यानंतर तुमाजने त्यात सहभाग घेऊन सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. इराण सरकारची धोरणे आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात अनेक रॅप गाणी गायली. सरकारच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर विविध गुन्हे ठेवण्यात आले. आंदोलनाला समर्थन देऊन चुकीची माहिती पसरवली आणि जनभावना भडकाविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. सरकारविरोधात आंदोलन पेटविण्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला. या आरोपांबाबत त्याला २०२३ मध्येच मृत्युदंडाची शिक्षा होणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फाशीची शिक्षा टाळल्यानंतर त्याला जुलै २०२३ मध्ये सहा वर्षे आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सध्या त्याला जामीन मिळाला, पण त्याच्यावरील खटला न्यायालयात सुरूच होता. इस्फहानच्या क्रांतिकारी न्यायालयाने तुमाज सालेही याच्यावर पूर्वी निर्दोष सुटलेल्या आरोपांशिवाय नवीन आरोप लावले, असे त्याच्या वकिलाने ‘शार्क’ या वृत्तपत्राला सांगितले. क्रांतिकारी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या क्षमाशीलतेच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले आणि सर्वात कठोर शिक्षा देण्यासाठी नवीन आरोप जारी केले. सशस्त्र बंड, सत्ताधाऱ्यांविरोधात अपप्रचार, दंगल भडकावणे, संगनमत करून गुन्हा अशा अनेक आरोपांसाठी त्याला दोषी ठरविण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा : NOTAला सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होतं? का पुन्हा निवडणूक होते? जाणून घ्या नकाराधिकाराचा अर्थ

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काय?

तुमाज सालेहीला झालेल्या फाशीच्या शिक्षेची अनेक देशांच्या प्रतिनिधींनी कठोर शब्दांत निंदा केली. इराणमधील अमेरिकेच्या विशेष दूत कार्यालयाने तुमाजला झालेली शिक्षा चुकीची असल्याचे म्हटले आहे. विशेष दूत कार्यालयाने इराणच्या न्यायव्यवस्थेला स्वत:च्या नागरिकांचा क्रूर अत्याचार, मानवी हक्कांकडे दुर्लक्ष आणि इराणी नागरिक शोधत असलेल्या लोकशाही बदलाची भीती यांचे उदाहरण म्हणून संबोधले. इराणच्या मानवी हक्क संघटनांनीही तुमाजच्या शिक्षेची कठोर शब्दांत निंदा केली. मत व्यक्त करणे आणि कला सादर केल्याबाबत फाशी शिक्षा सुनावणे यांद्वारे हे सरकार किती अमानवी असल्याचे दाखवून देत आहे, असे इरणी मानवी हक्क संघटनेचे महमूद अमिरी-मोघदाम यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयाने तुमाजची सुटका करण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. कलात्मक अभिव्यक्तीसह सरकारी धोरणांवर टीका करणे हा अभिव्यक्त स्वातंत्र्याचा भाग असून हा गुन्हा ठरू शकत नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी सांगितले. नेदरलँड्स, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रिया यांसह विविध राष्ट्रांनी तुमाज सालेहीला झालेल्या शिक्षेचा निषेध केला.

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader