अमोल परांजपे
अमेरिकेने २० वर्षांपूर्वी, १९-२० मार्चच्या मध्यरात्री इराकमध्ये सैन्य घुसविले. सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हे युद्ध छेडले गेले. तीन आठवडय़ांनी एका तळघरात दडून बसलेल्या सद्दाम हुसेन यांना अटक झाली आणि हे युद्ध संपले. मात्र युद्धाने नेमके काय साध्य केले, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
युद्धासाठी अमेरिकेने कोणती कारणे दिली?
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी इराकवर हल्ला करण्यासाठी दोन मुख्य कारणे दिली होती. सद्दाम हुसेन यांच्याकडे सामूहिक संहाराची अस्त्रे (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन) आहेत आणि ९/११च्या हल्ल्यासाठी हुसेन यांनी लादेनला मदत केली आहे. मात्र ही दोन्ही कारणे तकलादू असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. इराकमध्ये संहारक अस्त्रे सापडली नाहीतच, शिवाय लादेन, अल कायदाशी सद्दाम यांचा संबंधही उघड झाला नाही.
हल्ल्यामागचा खरा हेतू कोणता होता?
आखाती युद्धानंतर हुसेन यांची सत्ता अंतर्गत संघर्षांमुळे संपुष्टात येईल, असे अमेरिकेला वाटत होते. मात्र हा कयास खोटा ठरला. हुसेन यांची सत्ता अधिक मजबूत झाल्याने अमेरिकेचा स्वाभिमान दुखावला गेला. १९९८ साली ‘इराक मुक्ती कायदा’ करून अमेरिकेने सद्दाम यांना हटविण्यासाठी कंबर कसली. तेव्हापासून हल्ला करण्याची योजना आखली जात होतीच, पण ९/११ हल्ल्याने बुश यांच्या हाती आयते कोलीत दिले.
युद्धात कोणत्या देशांचा सहभाग होता?
‘कॉअॅलिशन ऑफ द विलिंग’ या नावाने अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि पोलंड या देशांच्या संयुक्त फौजांनी इराकवर हल्ला केला. हल्ल्याची कारणे पुरेशी नसल्याचे कारण देऊन जर्मनीने प्रत्यक्ष सहभागास नकार दिला असला तरी छुप्या पद्धतीने युद्धाला मदत केली. लढाऊ विमानांना हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिली. तसेच जर्मनीतील अमेरिकन तळांना वाढीव सुरक्षा, इराकविरोधात गोपनीय माहिती आणि आर्थिक मदतही जर्मनीने केली.
आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली?
इराक हल्ल्यासाठी खोटी कारणे देताना अमेरिकेने अनेक आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडविल्याचे आता स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला अनुसरून हल्ला नसेल, तर तो केवळ आत्मसंरक्षणासाठी करता येतो. मात्र इराक हल्ल्यासाठी असे कोणतेही सबळ कारण नसल्याचे संयुक्त राष्ट्रांचे तत्कालीन महासचिव कोफी अन्नान यांनी स्वत:च स्पष्ट केले होते. इतर देशांवर हल्ले करण्यासाठी महासत्तांनी कोणतेही कारण दिले तरी चालते, हा चुकीचा धडा या युद्धाने घालून दिला.
अमेरिकेच्या सैनिकांचे इराकमध्ये युद्धगुन्हे?
सगळय़ा जगाला नैतिकतेचे डोस पाजत फिरणाऱ्या अमेरिकेच्या लष्कराने इराकमध्ये अनेक युद्धगुन्हे केल्याचे एव्हाना सिद्ध झाले आहे. सद्दाम हुसेन यांच्या काळात कुप्रसिद्ध झालेल्या ‘अबू गरेब’ तुरुंगामध्ये नंतर अमेरिकेच्या सैनिकांनीही युद्धकैद्यांचा छळ केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. २००५ साली पश्चिम इराकमधील हदिथा शहरामध्ये ‘यूस मरिन्स’मधील सैनिकांनी २४ नि:शस्त्र नागरिकांना ठार केले. अमेरिकेतील खासगी सुरक्षा कंत्राटदार, ब्लॅकवॉटरच्या सैनिकांनी २००७ मध्ये जमावावर गोळीबार करून १७ जणांना ठार केले. ‘विकिलिक्स’वर प्रसृत झालेल्या एका चित्रफितीनुसार हेलिकॉप्टरमधून गोळीबार करून एका रॉयटर्सच्या पत्रकारासह १२ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला.
अमेरिकेने रंगवलेले इराक चित्र कसे होते?
१ मे २००३ रोजी ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या युद्धनौकेवरून बुश यांनी इराक युद्धातील विजयाची घोषणा केली. नंतरच्या काळात त्यांनी इराकबाबत अनेक स्वप्ने रंगविली. पाश्चिमात्य धाटणीची लोकशाही आणण्याचा पण बुश यांनी केला होता. आखाती प्रदेशातील अन्य देशांना लोकशाहीसाठी प्रेरित करणारे प्रशासन इराकमध्ये असेल आणि त्यामुळे पश्चिम आशियातील चित्र बदलेल, असा त्यांचा दावा होता. मात्र प्रत्यक्षात यापैकी काय साध्य झाले, हे जगासमोर आहे.
या युद्धातून अमेरिकेने काय साध्य केले?
तब्बल एक लाख सैनिकांचे पायदळ, २९ हजार १६६ बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा वर्षांव, सात हजार सामान्य नागरिकांसह किमान एक लाख लोकांचे बळी घेतल्यानंतर इराकमध्ये ‘खरी लोकशाही’ अद्याप प्रस्थापित झालेली नाही. यंदाच्या एकटय़ा फेब्रुवारी महिन्यात बंडखोरांच्या हल्ल्यांत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे सरकार, संसद असली तरी त्याचा फारसा परिणाम दोन दशकांनंतरही झालेला दिसत नाही. प्रत्येक प्रदेशाची मानसिकता आणि राज्यकर्त्यांबाबत त्यांच्या संकल्पना वेगळय़ा असतात, हे ध्यानात न घेता आपली पद्धत जगावर लादण्याच्या अमेरिकेच्या अट्टहासामुळे इराकमध्ये मोठा विध्वंस घडला. कदाचित त्यामुळेच ब्राझिल, दक्षिण आफ्रिका, भारतासारखे देश अमेरिकेवर पूर्ण विश्वास टाकत नसावेत..
amol.paranjpe@expressindia.com