-ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघ कायमच सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमधील आक्रमकता त्यांना ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खूप उपयोगी ठरते. लघुत्तम क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा कुठल्याही क्रमांकावरील फलंदाज खुलून खेळतो. झटपट धावा या ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या गुणधर्माशी वेस्ट इंडिजचे खेळाडू मिसळून गेले. दोन वेळा त्यांनी ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावला. मात्र, यंदा वेस्ट इंडिज संघाचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. दोन वेळच्या विजेत्यांवर ही वेळ का आली, याचा घेतलेला आढावा.

वेस्ट इंडिज क्रिकेटमधील दुफळीचा किती परिणाम झाला?

वेस्ट इंडिज आणि क्रिकेट यांची चर्चा सुरू होते, तेव्हा अनेक नावे डोळ्यासमोरून झटकन येऊन जातात. मात्र, अलीकडच्या काळात वेस्ट इंडिजमध्ये गुणवान क्रिकेटपटू शिल्लक आहेत का, असाच प्रश्न पडू लागला आहे. क्रिकेटपटू आणि संघटना यांच्यातील वादात वेस्ट इंडिजमधील क्रिकेट भरडले गेले. त्यानंतर खेळाडूंमधील अंतर्गत कलह वाढू लागले होते. सहाजिक या सगळ्याचा परिणाम विंडीज क्रिकेटवर होऊ लागला आणि त्याचा प्रत्यय यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आला.

संघनिवडच चुकली का?

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा प्रत्येक खेळाडू आपली छाप पाडून गेला आहे. आंद्रे रसेल आणि सुनील नरीन हे दोन खेळाडू ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून नावारूपाला आले. एरवी केवळ फिरकी गोलंदाज म्हणून माहीत असलेल्या नरीनने ‘आयपीएल’मध्ये फलंदाजीतही चमक दाखवली. रसेलने विंडीजची आक्रमकता पुढे नेली. कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या षटकांत चार षटकार ठोकून विंडीजला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. मात्र, या सर्व खेळाडूंची बस या वेळी चुकली. रसेल आणि नरीन लयीत असतानाही त्यांना वगळण्यात आले.

लौकिक असणारा एकही खेळाडू संघात नव्हता का?

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात लौकिक असणारा असा एकही खेळाडू नाही. विंडीज क्रिकेट परिवर्तनातून जात असल्याची चर्चा आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटचा बादशाह मानला जाणारा ख्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो, ड्वेन ब्राव्हो, कार्लोस ब्रेथवेट यांसारखे खेळाडू प्रवाहाबाहेर गेले. किरॉन पोलार्ड निवृत्त झाला. या संघात धडकी भरवणारे गोलंदाजही दिसून येत नाहीत. आर्थिक विवंचनेतून वेस्ट इंडिजच्या बहुतेक प्रमुख खेळाडूंनी फ्रेंचायझी क्रिकेटचा आसरा घ्यायला सुरुवात केली आणि विंडीज क्रिकेटचा दरारा संपुष्टात येऊ लागला.

फलंदाजी, गोलंदाजीत अपयश ठरले कारणीभूत?

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीत प्रमुख फलंदाजांच्या गैरहजेरीत काएल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, एविन लुईस, कर्णधार निकोलस पूरन यांच्यापैकी एकही फलंदाज स्पर्धेत धावा करू शकला नाही. प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकेल असा एकही गोलंदाज विंडीजच्या संघात नव्हता. प्रतिस्पर्धी संघ वेस्ट इंडिजची गोलंदाजी सहज खेळताना दिसून आले. मार्शल, रॉबर्टस दूर राहिले, पण त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या कोर्टनी वॉल्श, ॲम्ब्रोस, पॅटरसन यांच्या जवळपासही वेस्ट इंडिजचा आजचा गोलंदाज पोहचू शकत नाही.

सातत्याचा अभाव?

सातत्याचा अभाव ही अडचण विंडीज संघाला नवी नाही. ती जणू त्यांची परंपरा आहे. मात्र, फलंदाजीत अपयश आले, तर गोलंदाज ते पुसून काढण्याचा प्रयत्न करत होते. गोलंदाजी फसली की फलंदाजी त्यांना तारून नेत होती. परंतु या स्पर्धेत त्यांच्या एकाही खेळाडूच्या कामगिरीत सातत्य नव्हते. प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करायची, चेंडू सीमारेषेबाहेर मारायचा हेच त्यांचे धोरण आणि याचा फटका त्यांना बसला. विंडीजचा संघ स्पर्धेबाहेर गेल्यानंतर कर्णधार निकोलस पूरननेही हे कबूल केले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ireland knock two time champs west indies out of t20 world cup print exp scsg
Show comments