सीरियाची राजधानी दमास्कसमधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १३ अधिकारी ठार झाले होते. त्याचाच बदला म्हणून आता इराणने इस्रायलच्या दिशेने ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती, ज्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ३० क्रूझ क्षेपणास्त्रे आणि किलर ड्रोन यांचा समावेश होता. इराणवरील हल्ल्यामागे ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ या गटाचा हात असल्याचं बोललं जात आहे. परंतु ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ या गटाला अप्रत्यक्षपणे इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स मदत करीत आहे. या हल्ल्यातही इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची महत्त्वाची भूमिका होती. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत इस्रायलवरील आमचे हल्ल्याचे प्रयत्न यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, आमचे उद्दिष्टही साध्य झाल्याचं इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख कर्मचारी मोहम्मद बागेरी यांनी सांगितले. विशेष म्हणजे या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा IRGC चर्चेत आली आहे. ते नेमके कोण आहे आणि इराणमध्ये त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेणार आहोत.
IRGC म्हणजे काय?
IRGC ला सेपाह-ए-पसदारन असेही म्हणतात. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC )ची स्थापना १९७९ मध्ये इराणच्या क्रांतीनंतर झाली. त्याची स्थापना करण्याचा निर्णय इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खेमेनी यांनी घेतला होता. देशातील इस्लामिक व्यवस्था कायम राखणे आणि नियमित सैन्यासह सत्तेचा समतोल राखणे हा त्याचा उद्देश होता. इराणमधील शाह यांच्या सत्तेच्या पतनानंतर देशामध्ये सत्तेवर आलेल्या सरकारने नव्या राजवटीचे संरक्षण करण्यासाठी अशा सैन्याची स्थापना केली. इराणच्या मौलवींनी नवीन कायद्याचा मसुदा तयार केला, ज्यामध्ये देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करण्याची जबाबदारी नियमित सैन्याला देण्यात आली आणि रिव्होल्युशनरी गार्डला सत्तेवर असलेल्यांचे रक्षण करण्याचे काम देण्यात आले. परंतु सध्या जमिनीवर दोन्ही सेना एकमेकांच्या आड येत आहेत. उदाहरणार्थ, रिव्होल्युशनरी गार्ड कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात मदत करते आणि लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचे समर्थन सतत मिळत असते. कालांतराने रिव्होल्युशनरी गार्ड इराणच्या लष्करी आणि राजकीय शक्तीसाठी महत्त्वपूर्ण झाले आहे. सध्या रिव्होल्युशनरी गार्डमध्ये १.२५ लाख सैनिक आहेत. यामध्ये भूदल, नौदल, हवाई दल यांचा समावेश आहे आणि ते इराणच्या सामरिक शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही घेतात. IRGC ला घटनात्मकदृष्ट्या कायदेशीर अस्तित्व आणि क्रांतिकारी शासन आणि त्याच्या धोरणांचे रक्षण करण्यासाठी राजकीय हालचालीत सामील होण्याचा कायदेशीर अधिकार दिला गेला, असंही सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. इराणचे संस्थापक सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी IRGC चे वर्णन इस्लामचे सैनिक असे केले होते.
हेही वाचाः Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
IRGC म्हणजे इराणच्या सशस्त्र दलांच्या समांतर एक शक्ती
थिंक टँक कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (CFR) नुसार, IRGC म्हणजे इराणच्या सशस्त्र दलांच्या समांतर एक शक्ती आहे. लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या शाखेचा यात समावेश आहे. कुड्स फोर्स हे रिव्होल्युशनरी गार्डची विशेष सैन्य तुकडी आहे आणि त्याची जबाबदारी परदेशी भूमीवर संवेदनशील कारवाया करणे आहे. खरं तर कुड्स फोर्स ही हिजबुल्लाह, इराकचे शिय्या लढवय्ये किंवा इराणच्या जवळच्या सशस्त्र गटांना शस्त्रे आणि प्रशिक्षण देते. याशिवाय इराणमध्ये बसिज फोर्सदेखील आहे, जी स्वयंसेवकांची फौज आहे. यामध्ये सुमारे ९० हजार स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. बसिज फोर्स गरज पडल्यास १० लाख स्वयंसेवक एकत्र करू शकते. बसिज फोर्सचे पहिले काम म्हणजे देशातील सरकारविरोधी कारवायांना सामोरे जाणे आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिका मोठा राक्षस आणि इस्रायलला लहान राक्षस म्हटलं होतं. १९७९ च्या क्रांतीपासून इराण अमेरिकेच्या निर्बंधांखाली आहे. इराण आणि इस्रायलमधून वास्तवही जात नाही. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही देशांचं शत्रुत्व जगानं उघडपणे पाहिले आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात छुप्या कारवाया करीत असतात. इराणचा आण्विक कार्यक्रम हा इस्रायलला धोका वाटतो, तर इस्रायलने इराणविरोधात सायबर हल्ला केल्याचाही संशय आहे. कुड्स फोर्स ही शिया दहशतवादी गटाला लष्करी अन् आर्थिक मदत करते. इस्रायली आणि अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले करण्यासाठी इराणकडून कुड्स फोर्सचा वापर केला जातो. २०१९ मध्ये अमेरिकेनं IRGC ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
IRGC कसे कार्य करते?
खरं तर IRGC हा इराणच्या राजकारणाचा आणि लष्कराचा अविभाज्य भाग आहे. इराणमधील प्रबळ लष्करी शक्ती मानले जात असलेले IRGC इस्रायलवरील हल्ल्यासह देशाच्या अनेक प्रमुख लष्करी कारवायांच्या मागे आहे. इराणच्या हवाई दलातही IRGC ची मोठी उपस्थिती आहे. पश्चिम आशिया क्षेत्रात ही ताकद सक्रिय आहे. सीरियातील सुन्नी मुस्लिम अतिरेकी आणि उत्तर इराकमधील कुर्दिश इराणी विरोधी गटांवर अंकुश ठेवण्याचे काम IRGC करते. अमेरिका आणि सौदी अरेबियाने २०१९ च्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले होते, ज्यामुळे सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल प्रक्रिया प्रकल्प उद्ध्वस्त झाले. परंतु इराणने यातील आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते. ट्रम्प प्रशासनाने २००३ ते २०११ दरम्यान इराकमध्ये ६०८ अमेरिकन सैनिकांच्या हत्येसाठी IRGC ला जबाबदार धरले होते.तसेच IRGC ची कुड्स फोर्स लेबनॉनचे हिजबुल्लाह आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यासह अमेरिकेच्या विरोधातील दहशतवादी गटांना जोपासण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी ओळखली जाते.IRGC अशा गटांना निधी, प्रशिक्षण, शस्त्रे आणि उपकरणे प्रदान करते.
इराणच्या राजकारणात IRGC ची भूमिका काय आहे?
IRGCचे सध्या नियंत्रण इराणमधील दुसरे सर्वोच्च नेते अली खेमेनी यांच्याकडे असल्याचं बोललं जातंय. इराणच्या राजकारणात त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. अनेक IRGC अधिकारी इराणच्या राजकीय आस्थापनांमध्ये प्रमुख पदांवर कार्यरत आहेत. २०१३ च्या अध्यक्षीय निवडणुकीत IRGC ने हस्तक्षेप केल्याचेही वृत्त आहे. त्यावेळी हसन रुहानी यांनी कट्टरपंथीयांवर विजय मिळवला होता. IRGC ने मतदानापूर्वी भीतीचे वातावरण निर्माण केले आणि परिषद अन् राजकीय नेत्यांवर दबाव आणल्याचे बोलले जाते. तसेच IRGC इराणच्या आर्थिक बाबतीतही महत्त्वाची भूमिका बजावते. IRGC सहाय्यक म्हणून ट्रस्टच्या मालकीद्वारे इराणच्या सुमारे एक तृतीयांश अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या २०२० च्या रिपोर्टनुसार, IRGC इराणमधील सर्व महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांचा सर्वात शक्तिशाली नियंत्रक बनला आहे. इराण-इराक युद्धात नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणी IRGC नेच केली आहे. तसेच ते बँकिंग, शिपिंग, उत्पादन आणि ग्राहक आयातीसह इतर अनेक उद्योगांचा विस्तार करीत आहेत. या एकत्रित घटकांमुळेच आज IRGC हा इराणमधील सर्वात महत्त्वाचा गट मानला जातो.