पश्चिम आशियातील संघर्ष पेटला आहे. मंगळवारी (१ ऑक्टोबर) इराणने इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. आता इस्रायलनेही इराणला परिणाम भोगण्यास तयार राहा, असा इशारा दिला आहे. इराणने सांगितले की, त्यांच्या क्षेपणास्त्ररोधक बचाव प्रणालीने सर्व क्षेपणास्त्रे निष्प्रभ ठरवली आहेत. इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा बहुस्तरीय आहे. कमी अंतरापासून हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रांपासून ते लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपर्यंत संरक्षण करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा पाठलाग करून, ती हवेतच नष्ट करण्याची क्षमता या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये आहे. त्यातील आयर्न डोम सर्वांत प्रसिद्ध आहे. परंतु, यावेळी देशाच्या संरक्षण यंत्रणेतील इतर घटकांनीही क्षेपणास्त्रे निष्प्रभ ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यात डेव्हिड स्लिंग, एरो-२ व ३ आणि आयर्न बीम यांचा समावेश आहे. या प्रणाली कसे कार्य करतात? जाणून घेऊ.

आयर्न डोम

इस्रायलने उभारलेली ही यंत्रणा एका मोठ्या बचावात्मक यंत्रणेचा भाग आहे. त्यात रडार आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली रहिवासी भागावर पडणार्‍या क्षेपणास्त्रांना हवेमध्येच नष्ट करते. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे ती टाकले गेलेले एखादे क्षेपणास्त्र रहिवासी भागावर पडेल की नाही याचा अंदाज करते आणि त्या क्षेपणास्त्राचा मागोवा घेऊन, ते नष्ट करते. ही क्षेपणास्त्रे मोर्टार (C-RAM), तसेच विमान, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहनांचा प्रतिकार करण्यासही वापरली जातात. २००६ साली इस्रायल-लेबनॉन युद्धादरम्यान इस्रायलने या प्रणालीवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्या युद्धादरम्यान हिजबुलने इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली होती; ज्यामुळे हजारो इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हाच इस्रायलने बचावात्मक यंत्रणा विकसित करण्याची घोषणा केली होती. ही प्रणाली इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने विकसित केली आहे. २०११ साली आयर्न डोमची पहिली यशस्वी चाचणी करण्यात आली होती, तेव्हा या यंत्रणेने यशस्वीरीत्या क्षेपणास्त्रे पाडली.

इस्रायलने उभारलेली ही यंत्रणा एका मोठ्या बचावात्मक यंत्रणेचा भाग आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : युद्ध इराण-इस्रायलचं, पण भुर्दंड जगाला! कच्च्या तेलाचे भाव वाढले, भारतावर नेमका काय परिणाम होणार?

डेव्हिड स्लिंग

डेव्हिड स्लिंगदेखील इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. या प्रणालीमध्ये आयर्न डोमपेक्षाही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे रोखण्याची क्षमता आहे. ही प्रणाली राफेलने अमेरिकेतील आरटीएक्स कॉर्पबरोबर मिळून विकसित केली आहे. त्यालाच पूर्वी ‘Raytheon’ म्हणून ओळखले जात होते. २०१७ पासून ही प्रणाली कार्यरत आहे. ‘रॉयटर्स’च्या म्हणण्यानुसार, “डेव्हिडची स्लिंग प्रणाली १०० किलोमीटर ते २०० किलोमीटर (६२ ते १२४ मैल) अंतरावरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना खाली पाडण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.” डेव्हिड स्लिंग प्रणालीतील स्टनर क्षेपणास्त्रांना वॉरहेड नाही. हे क्षेपणास्त्रे शत्रूच्या क्षेपणास्त्रांना थेट धडक देत नष्ट करतात. त्यामुळे याला ‘हीट टू किल’ म्हणूनही ओळखले जाते. जगातील घातक क्षेपणास्त्रांच्या यादीत स्टनरचाही समावेश आहे.

डेव्हिड स्लिंगदेखील इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. या प्रणालीमध्ये आयर्न डोमपेक्षाही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे रोखण्याची क्षमता आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

एरो २ व एरो ३

एरो २ व एरो ३ ही संरक्षण प्रणाली डेव्हिड स्लिंगनंतर येते. ही प्रणाली लांब पल्ल्याच्या पृथ्वीच्या वातावरणाबाहेर उडणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखू शकते. एरो २ व एरो ३ ही प्रणाली सरकारी मालकीच्या इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय)ने विकसित केली आहे. ‘आयएआय’च्या वेबसाइटनुसार, “एरो मॉड्युलर एअर डिफेन्स सिस्टीम विविध प्रकारची वॉरहेड्स आणि दूर अंतरावरून येणाऱ्या टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा शोध घेऊन, त्यांचा पाठलाग करते, त्यांना अडवते आणि नष्ट करते. त्यामुळे धोरणात्मक मालमत्ता आणि स्थानिक नागरिकांचे संरक्षण होते. नावीन्यपूर्ण एरो ३ इंटरसेप्टर लांब पल्ल्याच्या धोक्यांना रोखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. विशेषत: यात मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रे वाहून नेता येणे शक्य आहे.

आयर्न डोमप्रमाणेच आयर्न बीम ही प्रणाली १० किलोमीटरपर्यंतच्या क्षेपणास्त्रांसाठी विकसित करण्यात आले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : इराण विरुद्ध इस्रायल : कोणाचं सैन्य अधिक शक्तिशाली? कोण ठरणार वरचढ?

आयर्न बीम

आयर्न डोमप्रमाणेच आयर्न बीम ही प्रणाली १० किलोमीटरपर्यंतच्या क्षेपणास्त्रांसाठी विकसित करण्यात आले आहे. ही प्रणाली लक्ष्याला नष्ट करण्यासाठी लेसर बीमचा वापर करते आणि ते पारंपरिक क्षेपणास्त्र इंटरसेप्टर्सपेक्षा स्वस्तही आहे. ही प्रणालीदेखील राफेलने विकसित केली आहे. “आयर्न बीममध्ये प्रकाशाच्या वेगाने जाऊन लक्ष्याला नष्ट करण्याची क्षमता आहे. त्याची किंमत प्रति इंटरसेप्शनपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे ते अतिशय उपयुक्त आहे,” असे राफेलच्या वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.