चालू वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अतिरिक्त असेल, म्हणजेच २०२४ हे वर्ष लीप वर्ष आहे. प्रत्येक चार वर्षाला लीप वर्ष येते, असे म्हटले जाते. पण, हे लीप वर्ष म्हणजे नेमके काय? या लीप वर्षाची गरज का आहे? लीप वर्षाची सुरुवात कोणी केली? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या….
लीप वर्ष म्हणजे काय?
प्रत्येक लीप वर्षात एकूण ३६६ दिवस असतात. अन्य नियमित वर्षांत एकूण ३६५ दिवस असतात. म्हणजेच लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो. या एका अतिरिक्त दिवसाचा समावेश फेब्रुवारी महिन्यात केला जातो. नियमित वर्षांत फेब्रुवारीमध्ये २८ दिवस असतात. मात्र, लीप वर्षात फेब्रुवारीमध्ये २९ दिवस असतात.
लीप वर्षाचा समावेश का करण्यात आला?
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारे दिवस म्हणजेच एक वर्ष असे आपण समजतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एकूण ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवसांपेक्षा थोडा अतिरिक्त कालावधी लागतो. हाच अतिरिक्त कालावधी साधारण ६ तास आहे, असे आपण समजतो. म्हणूनच कालगणनेत चूक होऊ नये म्हणून प्रत्येक चौथ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका अतिरिक्त दिवसाचा समावेश केला जातो. तसे न केल्यास पिकांसाठीचा हंगाम, ऋतू हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कालावधीत येतील, ज्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
लीप वर्षाचा समावेश कधी करण्यात आला?
इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार कालगणना अधिक तंतोतंत करण्यासाठी इ.स. पूर्व ४६ मध्ये जुलियस सिझर यांच्यासोबत काम करणाऱ्या तज्ज्ञांनी कालगणनेत लीप वर्षाचा समावेश केला. पुढे ही कालगणना इ.सवी १२ मध्ये अधिक अचूक करण्यात आली.
इस्लामिक कॅलेंडरमध्येही लीप वर्ष
ज्यूलियन कॅलेंडरमध्ये एका वर्षात ३६५ दिवस होते. या कॅलेंडरमध्ये प्रत्येक चौथ्या वर्षी एका अतिरिक्त दिवसाचा समावेश केला जायचा, तर रॉयल म्युझियम ग्रीनविचच्या संकेतस्थळानुसार इल हिजरा या इस्लामिक कॅलेंडरमध्येही प्रत्येक लीप वर्षाला अल हिज्जा या १२ व्या महिन्यात एका अतिरिक्त दिवसाचा समावेश करण्यात येतो. कालगणना अचूक व्हावी, यासाठी प्रत्येक चौथ्या वर्षी एका अतिरिक्त दिवसाचा समावेश केला जात असला तरी ती कालगणनेची म्हणावी तेवढी अचूक पद्धत नव्हती. कारण लीप वर्षात एक दिवस वाढवण्यासाठी सहा तासांचा (पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेतील अतिरिक्त वेळ) जो हिशोब केला जात होता, तो खरा कालावधी ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद एवढाच होता. म्हणजेच सहा तासांपेक्षा काही मिनिटे कमी होते. त्याचाच अर्थ असा की, प्रत्यक्ष केली जाणारी कालगणना ही सौर वर्षाच्या काहीशी पुढे होती.
कालगणनेतून दहा दिवस कमी करण्याचा आदेश
ही बाब लक्षात आल्यानंतर १६ व्या शतकात सौर वर्ष आणि मानवाकडून केली जाणारी कालगणना ही योग्य आहे का याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून सौर वर्षापेक्षा आपण १० दिवस पुढे आहोत, असे समोर आले. त्यामुळे १५८२ मध्ये पोप ग्रेगरी (तेरा) यांनी कालगणनेतून दहा दिवस कमी करण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर ४ ऑक्टोबरनंतर थेट १५ ऑक्टोबर अशी तारीख करण्यात आली.
दर चार वर्षांनी लीप वर्ष का येत नाही?
पोप ग्रेगरी (१३) यांनी केलेली कृती ही तंतोतंत कालगणनेसाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे प्रत्येक शतकातील एक लीप वर्ष कमी करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी ज्या वर्षाच्या शेवटी दोन शून्य असतील, त्या वर्षाची निवड करण्यात आली.
शेवटी तोडगा निघाला
मात्र, हा उपायदेखील तंतोतंत कालगणना करण्यास पुरेसा नव्हता. शेवटी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ज्या वर्षाच्या शेवटी दोन शून्य आहेत आणि संबंधित वर्षाला ४०० या संख्येने भाग जातो, ते लीप वर्ष गृहित धरण्याचे ठरवण्यात आले. उदाहरणार्थ १९०० हे लीप वर्ष नव्हते. मात्र, २००० हे साल लीप वर्ष होते.